
घरालगत गांजाची लागवड उघड; फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, ७ किलोहून अधिक गांजाची झाडे जप्त
फलटण, दि. २७ (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील गुणवरे येथील घुलेवस्ती परिसरात घरालगत गांजाची लागवड केल्याचा प्रकार फलटण ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची सुमारे ३४ हजार ६५० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जून २०२६ रोजी मौजे गुणवरे (ता. फलटण, जि. सातारा) येथील घुलेवस्ती परिसरात एका घराच्या शेजारी गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
छाप्यामध्ये घरालगत गांजाची लागवड केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ३४ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी अंकुश रामचंद्र कोळेकर (रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, संतोष मठपती, पोलीस हवालदार शांतीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, पोलीस नाईक सागर अभंग तसेच पोलीस कॉन्स्टेबल तुषार नलवडे, अमोल देशमुख आणि अविनाश शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.









