Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रTET 2026 परीक्षा पुढे ढकलली; पेपरफुटीच्या संशयामुळे राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

TET 2026 परीक्षा पुढे ढकलली; पेपरफुटीच्या संशयामुळे राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

पुणे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संशयितांकडे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील एकूण १,०२८ परीक्षा केंद्रांवर TET परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. NEET २०२६ परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन परीक्षा पूर्णपणे सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

मात्र, २७ जून रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी काही संशयितांवर धाड टाकली. तपासादरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांकडे असलेल्या माहितीची पडताळणी केली असता, ती शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळतीजुळती असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी २८ जून रोजी होणारी TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेने म्हटले आहे.

परीक्षेसंदर्भातील सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments