Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीत उभारले जाणार अजित पवार यांचे भव्य स्मारक; ५० मीटर उंचीच्या टॉवरमधून...

बारामतीत उभारले जाणार अजित पवार यांचे भव्य स्मारक; ५० मीटर उंचीच्या टॉवरमधून पाहता येणार विकासाचा आलेख

बारामतीत उभारले जाणार अजित पवार यांचे भव्य स्मारक; ५० मीटर उंचीच्या टॉवरमधून पाहता येणार विकासाचा आलेख

बारामती | प्रतिनिधी :- बारामती शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बारामती नगरपरिषदेने भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला.

नगराध्यक्ष सचिन सातव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, स्मारक परिसरात सुमारे ५० मीटर उंचीचा टॉवर उभारण्यात येणार असून, त्यावरून बारामती शहराचा सर्वांगीण विकास पाहता येणार आहे. अजित पवार यांच्या कार्याची उंची लक्षात घेता हा स्मारकस्तंभही शहरातील सर्वाधिक उंच ठरणार आहे.

प्रशासकीय भवनाशेजारील जागेत तीन मजली अत्याधुनिक संग्रहालय (म्युझियम) उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात अजित पवार यांना विविध क्षेत्रांत मिळालेले सन्मान, भेटवस्तू आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण वस्तू जतन केल्या जाणार आहेत.

अजित पवार यांची जनतेशी असलेली जवळीक आणि ‘जनता दरबार’ ही त्यांची विशेष ओळख लक्षात घेऊन त्याची प्रतिकृतीही स्मारकात साकारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जन्मापासूनच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रवासाचा संपूर्ण जीवनपट आधुनिक दृकश्राव्य माध्यमांद्वारे नागरिकांसमोर उलगडण्यात येणार आहे.

बारामतीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळावी आणि अजित पवार यांचे कार्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात येत असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

सभेदरम्यान विविध नगरसेवकांनीही काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. स्वच्छता हा अजित पवार यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतचा त्यांचा पुतळा उभारावा, त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करावी तसेच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी राज्य शासनाकडे शिफारस करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

अजित पवार यांचे स्मारक हा बारामतीकरांच्या भावनांशी निगडित विषय असून, या प्रकल्पाला लवकरात लवकर मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सभागृहात दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments