महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याला जागतिक गौरव; गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५

0
2
महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याला जागतिक गौरव; गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५

महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याला जागतिक गौरव; गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५


फलटण | प्रतिनिधी.   ग्रामीण भागातील महिलांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोविंद फाउंडेशनला प्रतिष्ठेचा नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात आला आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे हा आंतरराष्ट्रीय सन्मान संस्थेला बहाल करण्यात आला.
भारतामधील नेदरलँड्सच्या राजदूत मा. एच. ई. मारिसा जेरार्ड्स (Marisa Gerards) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवपूर्ण सोहळ्यात गोविंद फाउंडेशनच्या संचालिका सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, अजयसिंहराजे नाईक निंबाळकर, धर्मेंद्र भल्ला तसेच डॉ. शांताराम गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या प्रतिनिधींनी भावना व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान केवळ गोविंद फाउंडेशनचा नसून संस्थेशी जोडलेल्या सर्व सहकारी, कार्यकर्ते, लाभार्थी महिला, स्वयंसेवक आणि हितचिंतकांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांना आणि उपक्रमांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील पोचपावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोविंद फाउंडेशनने दुग्ध व्यवसाय क्षेत्रात महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक संधी आणि स्वावलंबनाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.
संस्थेच्या वतीने या यशासाठी सर्वांचे प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या पुरस्कारामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने, व्यापक स्वरूपात आणि समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही सांगण्यात आले.
ग्रामीण विकास, महिला सबलीकरण आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने कार्य करणाऱ्या संस्थांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार असून, गोविंद फाउंडेशनच्या कार्याचा जागतिक स्तरावर झालेला हा सन्मान फलटणसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे