Saturday, October 24, 2026
Homeफलटणखेळ पैठणीचा’तून महिलांच्या आत्मविश्वासाला मिळाली नवी उभारी!

खेळ पैठणीचा’तून महिलांच्या आत्मविश्वासाला मिळाली नवी उभारी!

समता नगर (विडणी) येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना, बुद्ध विहार नामकरण व वर्षावास सांगता समारंभानिमित्त ‘खेळ पैठणीचा, उत्सव आनंदाचा’ उत्साहात

विडणी : बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना, बुद्ध विहार नामकरण आणि वर्षावास सांगता समारंभाच्या निमित्ताने न्यू पंचशील तरुण मित्र मंडळ, समता नगर (विडणी) यांच्या वतीने आणि सम्यक प्रोडक्शन निर्मित ‘खेळ पैठणीचा, उत्सव आनंदाचा’ या महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांना आनंदाचे क्षण मिळावेत, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळावे, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘खेळ पैठणीचा, उत्सव आनंदाचा, साज मराठमोळा, अभिमान महाराष्ट्राचा’ या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमात ज्ञान, मनोरंजन, उत्साह आणि खिलाडूवृत्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन समाज प्रबोधनकार महावीर भालेराव आणि उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक, व्याख्याते तथा उत्कृष्ट सूत्रसंचालक बाबासाहेब जगताप यांनी केले. रामचंद्र मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा रयत च्या गुरुकुल प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर, माजी संस्कार सचिव आयु. अमोल भोसले सर यांनी संयोजन व परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रश्नमंजुषेने झाली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई, अंतराळवीर कल्पना चावला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नांनी महिलांच्या ज्ञानाला आणि सामाजिक जाणिवेला उजाळा मिळाला.

यानंतर संगीताच्या तालावर ‘तळ्यात-मळ्यात’, हातांचा वापर न करता दोऱ्याला बांधलेली जिलेबी खाणे, कपाळावर ठेवलेले बिस्किट तोंडापर्यंत नेणे, तसेच पत्रावळीच्या साह्याने मेणबत्ती विझविणे अशा विविध मनोरंजक खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली. विविध फेऱ्यांनंतर ‘इडली-वडा’ या अंतिम खेळातून पाच अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेत आयु. काजल अजय मोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘होम मिनिस्टर’चा मान पटकावला आणि मानाची पैठणी जिंकली. आयु. अनुराधा अतुल मोरे यांनी द्वितीय, आयु. अश्विनी रामचंद्र मोरे यांनी तृतीय, आयु. साक्षी विलास मोहिते यांनी चतुर्थ, तर आयु. शुभांगी राजेंद्र भोसले यांनी पाचवा क्रमांक पटकावला.

बक्षिसांपेक्षा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, त्यांचा आनंद आणि आत्मविश्वास यांना या उपक्रमात विशेष महत्त्व देण्यात आले. दैनंदिन कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असलेल्या महिलांना स्वतःसाठी वेळ मिळावा, एकमेकींशी संवाद साधता यावा, आपली कौशल्ये व्यक्त करता यावीत आणि नव्या मैत्रीचे बंध निर्माण व्हावेत, या दृष्टीने हा उपक्रम विशेष ठरला.

बुद्ध विहाराच्या नव्या अध्यायाला सुरुवात करताना महिलांच्या आनंद, सहभाग आणि आत्मविश्वासालाही या कार्यक्रमातून स्थान मिळाले. त्यामुळे ‘खेळ पैठणीचा’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता सामाजिक बांधिलकी, स्त्री-सन्मान आणि सामूहिक आनंदाचा सुंदर उत्सव ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी न्यू पंचशील तरुण मित्र मंडळ, समता नगर (विडणी) यांच्या कार्यकर्त्यांसह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments