
फलटण | प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून पक्ष स्थापना दिन साजरा करत आहेत. यानिमित्त फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार मोरे यांनी राज्यातील सध्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, शिक्षणाची आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारांची भूमी असताना आज राज्याची ओळख भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेशी जोडली जात असल्याची खंत वाटते. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला धक्का पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा उल्लेख केला. अशा घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही सत्ताधारी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे लोकशाही मूल्यांचे अवमूल्यन होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी या घटनेतील सर्व पैलूंची निष्पक्ष चौकशी होण्याची गरज व्यक्त केली. तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी आणि अन्य गंभीर घटनांमध्ये अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा उल्लेख करताना त्यांनी ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे स्मरण केले. अंधश्रद्धाविरोधी कायदा करणाऱ्या महाराष्ट्रातच अंधश्रद्धाविरोधी लढा देणाऱ्यांना न्याय मिळण्यात विलंब होणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी संत कबीर यांच्या विचारांचा दाखला देत समाजाने केवळ बाह्य दिखावा न करता मन शुद्ध करण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजातील ढोंगीपणा, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शेवटी महाराष्ट्राची पुरोगामी ओळख टिकवण्यासाठी संविधानिक मूल्ये, सामाजिक सलोखा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, राज्याला कलंकित करणाऱ्या प्रवृत्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे नंदकुमार मोरे यांनी म्हटले.
– आपलं सुंदर फलटण… हरित फलटण… मी फलटणकर









