Tuesday, August 18, 2026
Homeफलटणश्रीराम कारखान्याच्या सभेत हायव्होल्टेज ड्रामा; संजीवराजेंचा ‘रुद्र अवतार’, दत्त इंडियाचा ठराव बहुमताने...

श्रीराम कारखान्याच्या सभेत हायव्होल्टेज ड्रामा; संजीवराजेंचा ‘रुद्र अवतार’, दत्त इंडियाचा ठराव बहुमताने मंजूर

श्रीराम कारखान्याच्या सभेत हायव्होल्टेज ड्रामा; संजीवराजेंचा ‘रुद्र अवतार’, दत्त इंडियाचा ठराव बहुमताने मंजूर


फलटण (प्रतिनिधी): फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी (१८ मे) कारखाना स्थळावर अत्यंत वादळी वातावरणात पार पडली. मागील भागीदार ‘जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखाना’ यांनी मुदतपूर्व करार रद्द केल्यानंतर आगामी १५ वर्षांसाठी कारखाना सहयोगी तत्त्वावर चालविण्यासाठी ‘दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी’ यांच्या नावाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. मात्र या सभेत करारातील अटी, शेतकऱ्यांचे हित आणि जुन्या व्यवहारांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये अभूतपूर्व खडाजंगी पाहायला मिळाली.
सभेदरम्यान नेहमी शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि थेट स्टेजवरून खाली उतरून विरोधकांना दिलेले प्रत्युत्तर हे संपूर्ण सभेचे केंद्रबिंदू ठरले.
जव्हार कारखान्याने करार मोडला; ८ कोटींची भरपाई मिळणार
सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी पार्श्वभूमी स्पष्ट करत सांगितले की, २००६ पासून कारखाना चालवणाऱ्या जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखान्याने बदलती जागतिक बाजारपेठ, साखरेचे अस्थिर दर आणि वाढत्या आर्थिक तोट्यामुळे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कारखाना पुढे चालविण्यास असमर्थता दर्शवणारे पत्र दिले होते.
यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत सात वर्षांचा ‘लॉकिंग पिरियड’ असताना जव्हार कारखाना कराराच्या मुदतीपूर्वी कसा बाहेर पडू शकतो, असा सवाल उपस्थित केला. यास उत्तर देताना प्रशासनाने स्पष्ट केले की, करार मधेच मोडल्यामुळे जव्हार कारखान्याकडून ८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात येणार असून ती त्यांच्या देणे-घेण्यातून समायोजित केली जाईल.
कारखान्याचे नेटवर्थ उणे १६ कोटी ४४ लाख रुपये असल्याने बँकांकडून कर्ज नाकारण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या ५ मे २०२६ च्या आदेशानुसार ही विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आल्याचेही प्रशासनाने सांगितले.
‘दत्त इंडिया’चा प्रस्ताव अधिक फायदेशीर
कारखान्याने मागवलेल्या ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) प्रक्रियेत दोन कंपन्यांचे प्रस्ताव आले होते.
दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड :
पहिल्या ५ वर्षांसाठी वार्षिक ५.५ कोटी रुपये भाडे
पुढील ५ वर्षांसाठी ६ कोटी रुपये
शेवटच्या ५ वर्षांसाठी ६.५ कोटी रुपये भाडे
जव्हार कारखान्याची देणी भागवण्यासाठी तातडीने ३५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी
दीड वर्षात कारखान्याची क्षमता ५ हजार मेट्रिक टनांवरून १० हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन
शरयू कार्स :
साधारण ४.५ ते ५ कोटी रुपयांच्या वार्षिक भाड्याचा प्रस्ताव
आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर प्रस्ताव असल्याने सभासदांनी बहुमताने ‘दत्त इंडिया’च्या बाजूने ठराव मंजूर केला.
सभेत हायव्होल्टेज नाट्य; संजीवराजेंचा आक्रमक अवतार चर्चेत
सभेत जुन्या करारातील अटी, नफ्याचे वाटप आणि कथित आर्थिक नुकसानीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली. नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नरसिंह निकम यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरत एकापाठोपाठ प्रश्न उपस्थित केले.
२०२२ च्या करारात मंत्री समितीच्या सूचनेनुसार जव्हार कारखान्याकडून नफ्यातील प्रति टन २०० रुपये श्रीराम कारखान्याला का मिळाले नाहीत, असा सवाल करत विरोधकांनी तब्बल ४४ कोटी रुपयांच्या नुकसानीचा आरोप केला.
याच दरम्यान वातावरण अधिक तापले आणि स्टेजवर उपस्थित असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अचानक आक्रमक झाले. विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी थेट स्टेजवरून खाली उतरून विरोधी सभासदांच्या दिशेने मोर्चा वळवला. संजीवराजेंचा हा ‘रुद्र अवतार’ पाहून काही काळ सभागृहात एकच खळबळ उडाली.
“सभासदांची दिशाभूल करू नका”
माईक हातात घेत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना थेट इशारा देत म्हटले की,
“जुने करार आणि मागील प्रश्न उकरून काढून सामान्य सभासदांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. आजची सभा कारखाना पुढे कसा चालवायचा यासाठी आहे.”
यानंतर त्यांनी संयम दाखवत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उद्देशून सांगितले,
“तुम्ही विचारत असलेल्या प्रत्येक प्रश्नाची सविस्तर उत्तरे आमच्याकडे आहेत. आम्ही काहीही लपवत नाही. कारखाना वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण शांततेत बसून सर्व शंकांचे निरसन करूया.”
गदारोळातच ठराव मंजूर
चेअरमन आणि प्रशासनाने स्पष्ट केले की, नवीन करारामुळे श्रीराम कारखान्यावर कोणतीही अतिरिक्त कर्जाची जबाबदारी येणार नाही. शेतकऱ्यांचे ऊस बिल आणि कामगारांचे पगार वेळेत देण्यासाठी कारखाना सुरू राहणे अत्यावश्यक असल्याचे सांगत सत्ताधारी गटाने बहुमताने ‘दत्त इंडिया’चा ठराव मंजूर केला. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.
सभेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments