विरोधकांना थेट भिडले संजीवराजे; श्रीरामच्या सभेत ‘शिवसेना स्टाईल’चा आक्रमक अवतार चर्चेत

0
6
विरोधकांना थेट भिडले संजीवराजे; श्रीरामच्या सभेत ‘शिवसेना स्टाईल’चा आक्रमक अवतार चर्चेत

विरोधकांना थेट भिडले संजीवराजे; श्रीरामच्या सभेत ‘शिवसेना स्टाईल’चा आक्रमक अवतार चर्चेत

फलटण : नेहमी शांत, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्वाची ओळख असलेले शिवसेना नेते तथा ‘श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे’ संचालक संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा काल फलटणकरांना एक वेगळाच आक्रमक अवतार पाहायला मिळाला. ‘श्रीराम सहकारी साखर कारखाना’ आणि जव्हार यांच्यातील भागीदारी करार संपुष्टात आल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर संजीवराजेंनी थेट आक्रमक भूमिका घेत विरोधकांना जशास तसे उत्तर दिले. त्यांच्या या ‘शिवसेना स्टाईल’ मर्दुमकीची चर्चा सध्या संपूर्ण फलटण तालुक्यात रंगली आहे.
कारखाना चालवण्यासाठी ‘श्री दत्त इंडिया साखर कारखाना, साखरवाडी’ आणि ‘शरयू साखर कारखाना, कापशी’ यांच्याकडून भागीदारीचे प्रस्ताव आले होते. यावर निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. सभेत बहुसंख्य सभासदांनी ‘दत्त इंडिया साखर कारखाना’सोबत भागीदारी करण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी दिली.
मात्र, मुख्य विषयावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. नरसिंह निकम, शिवरूपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले आणि शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेतील जुने मुद्दे उपस्थित करत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचे सभास्थळी पाहायला मिळाले.
संयम सुटला अन् संजीवराजेंनी घेतली आक्रमक भूमिका
सुरुवातीला संजीवराजे यांनी अत्यंत संयमी आणि शांत भूमिकेतून विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तरे दिली. मात्र, वारंवार त्याच मुद्द्यांवरून प्रश्नांचा भडिमार सुरूच राहिल्याने सभेतील वातावरण अधिकच तापले. विरोधकांचा वाढता आक्रमकपणा पाहून अखेर संजीवराजेंनीही थेट आक्रमक पवित्रा घेतला.
काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेल्या संजीवराजेंनी थेट व्यासपीठावरून खाली उतरून विरोधकांच्या घोळक्यात प्रवेश केला. बोलत असलेले नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हातातील माईक घेत त्यांनी विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या रुद्रावतारामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर चर्चा शांततेत पार पडली आणि सभा सुरळीतरीत्या संपन्न झाली.
“बाळासाहेब आणि शिंदेंचा खरा शिलेदार”
संजीवराजेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरा शिलेदार म्हणजे संजीवराजे,” अशा प्रतिक्रिया तालुक्यातील शिवसैनिकांकडून उमटत आहेत.
फलटणच्या राजकारणात नवा टप्पा?
सभेनंतर दिवसभर फलटण शहर व तालुक्यात संजीवराजेंच्या आक्रमक शैलीचीच चर्चा सुरू होती. “विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची गरज होती,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. संजीवराजेंच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे फलटणच्या राजकारणाला नवी धार मिळाल्याचे बोलले जात असून, आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे