Saturday, September 12, 2026
HomeUncategorizedफलटणमध्ये निवासी अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय

फलटणमध्ये निवासी अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय

फलटणमध्ये निवासी अतिक्रमण नियमितीकरणाचा मोठा निर्णय
फलटण शहर व तालुक्यात शासकीय जागांवर बांधकाम केलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत 500 ते 1500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या निवासी अतिक्रमणांना शासनाच्या धोरणानुसार नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंचायत समिती फलटण येथे झालेल्या या बैठकीत सर्व शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण नियमित करताना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे निंबाळकर यांनी अधोरेखित केले.
आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा स्तरावर आढावा समिती स्थापन केली जाणार असून, अतिक्रमण नियमितीकरणासाठी आमदारांची शिफारस आवश्यक असेल. भूमी अभिलेख विभागाला खासगी मोजणीदारांच्या मदतीने तातडीने मोजणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील एकही पात्र घर या योजनेपासून वंचित राहू नये, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेर सिंह यांनी शहरातील खुल्या जागांची (ओपन स्पेस) मोजणी करून त्या नगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचे आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचे निर्देश दिले. प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनीही संबंधित विभागांच्या संयुक्त प्रयत्नातून हे काम पूर्ण केले जाईल, असे सांगितले.
यावेळी प्रशासनाला अतिक्रमणाबाबत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. काही नागरिक अतिक्रमित घरे भाड्याने देऊन स्वतः इतरत्र राहत असल्याचेही निदर्शनास आले असून, अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी महसूल विभागाकडून सर्व आवश्यक सहकार्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments