Friday, August 21, 2026
Homeसाताराचक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज - दादासाहेब भोसले

चक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज – दादासाहेब भोसले

चक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज – दादासाहेब भोसले


फलटण : चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2330 व्या जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार, कोळकी येथे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा राज्य शाखेचे संघटक तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व सातारा-पुणे जिल्ह्याचे प्रभारी आयुष्यमान दादासाहेब भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की, सम्राट अशोक यांच्यासारखा शौर्यवान, नीतिवान, धैर्यशील आणि बुद्ध धम्माचा विचार, आचार व संस्कार संपूर्ण जगभर पोहोचवणारा महान शासक इतिहासात दुसरा झाला नाही. अखंड भारताची संकल्पना साकार करणारे सम्राट अशोक हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. भारतीय बौद्ध महासभेने सम्राट अशोकांचा फोटो आदर्शांच्या यादीत समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक कार्यक्रमातून व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.
भोसले पुढे म्हणाले की, समाजातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आज गरज आहे. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्मासाठी केलेला त्याग, समर्पण आणि प्रचार-प्रसार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘BSI मिशन 25’ अंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. सम्राट अशोक जयंतीनिमित्त केंद्र व राज्य पातळीवरून सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी भविष्यात अशोकांच्या सन्मानासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी सम्राट अशोकांचा बौद्ध धम्माकडे झालेला प्रवास, कलिंग युद्धानंतर घडलेला परिवर्तनाचा टप्पा आणि त्यांनी केलेला धम्माचा व्यापक प्रसार यावर सखोल विवेचन केले. त्यांनी अशोकांच्या धम्मनीतीतून समाजाला मिळणाऱ्या मूल्यांचा विशेष उल्लेख केला.

फलटण तालुका शाखेचे माजी अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी आपल्या भाषणात सम्राट अशोकांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या राज्यकारभारातील जनकल्याणकारी धोरणे, न्यायप्रियता आणि धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व अधोरेखित केले.

बौद्धाचार्य व साहित्यिक भीमराव लोंढे यांनी सम्राट अशोकांच्या कार्याचे तत्त्वज्ञानात्मक विश्लेषण करत त्यांच्या धम्मकार्याची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली.

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अशोक भोसले यांनी सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आढावा घेत, अशा परिस्थितीत सम्राट अशोकांच्या जयंतीचे आयोजन करण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका महिला शाखेच्या अध्यक्षा आयुनि रंजना रणवरे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांचे व त्यांच्या धम्मकार्याचे कौतुक केले.

महिला विभागाच्या अध्यक्षा आयुनि सुजाता गायकवाड यांनी सम्राट अशोकांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, विशेषतः तरुणांनी पुढे येऊन या विचारप्रवाहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी महिला व युवकांनी संघटनात्मक कार्यात अधिकाधिक सहभाग नोंदवण्याची गरज व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांनी कार्यक्रमाचे नियोजन केंद्र व राज्याच्या सूचनांनुसार काटेकोरपणे पार पाडल्याचे सांगत, आगामी काळात सम्राट अशोक जयंती अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमात विजय लोंढे यांनी कविता व गीतांच्या माध्यमातून सम्राट अशोकांना अभिवादन करत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्याचे ऑडिटर आयु. साहेबराव गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमास आयु. दादासाहेब भोसले, आयु. साहेबराव गायकवाड, आयु. नानासो मोहिते, आयु. सुजाता गायकवाड, सोमीनाथ घोरपडे, संपत भोसले, शिवाजी सावंत, आबा भोसले, रंजना रणवरे, अशोक भोसले, राजकुमार रणवरे, विजय लोंढे, भीमराव लोंढे तसेच माता रमाई ग्रुपच्या महिला सदस्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महिला प्रमुख चित्राताई गायकवाड, अश्विनी अहिवळे, ज्येष्ठ समाज सेविका कांताताई काकडे, रजनी माने, आरती काकडे आणि मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments