Monday, August 31, 2026
Homeसाताराराज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय : फलटण व पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडीला...

राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय : फलटण व पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडीला अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर


फलटण :- फलटणच्या प्रशासकीय वाटचालीत आज एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत फलटण (Phaltan) आणि पंढरपूर (Pandharpur) येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तर साखरवाडी (Sakharwadi) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.
या निर्णयामुळे फलटणकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वतंत्र जिल्ह्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी सांगितले की, “फलटणला स्वतंत्र जिल्हा करण्याचे आमचे स्वप्न आहे. आज मंजूर झालेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे त्या दिशेने टाकलेले पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आगामी काळात जिल्हास्तरीय सर्व महत्त्वाची कार्यालये टप्प्याटप्प्याने फलटणमध्ये आणण्याचा आमचा संकल्प आहे.”
याचबरोबर, फलटण येथे टाऊन प्लॅनिंग ऑफिस आणण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने लवकरच हे कार्यालय फलटणला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत.
या निर्णयामुळे आता नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी साताऱ्याला जाण्याची गरज भासणार नाही. फलटणमध्येच अनेक महसूल व प्रशासकीय कामे पूर्ण होतील. तसेच साखरवाडीसारख्या ग्रामीण भागात अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांच्या महसूलविषयक कामांना वेग मिळणार असून प्रशासन अधिक गतिमान होणार आहे.
फलटण, पंढरपूर आणि साखरवाडीच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा निर्णय निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments