Monday, August 17, 2026
Homeसातारापंचायत समितीवर महायुतीची मोठी मुसंडी; सभापतीपदावरही दावा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा ठाम...

पंचायत समितीवर महायुतीची मोठी मुसंडी; सभापतीपदावरही दावा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा ठाम विश्वास

फलटण प्रतिनिधी :-  फलटण तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीने आपली ताकद अधिक भक्कम केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या एकूण १६ पैकी ८ जागा जिंकत महायुतीने निम्म्याला निम्मे यश संपादन केले असून, फलटण विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ४ जागा निवडून आल्या आहेत. विधानसभा आणि नगरपालिका आधीच महायुतीकडे असल्याने आता पंचायत समितीच्या सभापतीपदावरही आमचाच दावा असल्याचा ठाम विश्वास माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केला.
निवडणूक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रणजितसिंह निंबाळकर पुढे म्हणाले की, “गेल्या निवडणुकीत आमचा केवळ एक जिल्हा परिषद सदस्य होता. मात्र, यावेळी ही संख्या चारवर पोहोचली आहे. तसेच पंचायत समितीचे ८ सदस्य निवडून आल्याने तालुक्यात आम्ही ‘निम्म्याला निम्मे’ झालो आहोत. हा आमचा आलेख प्रगतीचा आणि विकासाचा आहे.”
सभापतीपदाचा निर्णय चिठ्ठीद्वारे होणार असला तरी, फलटणच्या विकासासाठी दैव आणि नशीब आमच्याच बाजूने राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळातील भूमिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पंचायत समितीत विरोधात बसावे लागले तरी आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करू आणि जर सभापतीपद मिळाले तर विकासात्मक कामांना गती देऊ.
काही ठिकाणी, विशेषतः विडणीसारख्या जागा अत्यंत निसटत्या मतांनी गमावल्या असल्या तरी एकूण निकालाने महायुतीला मोठी बळकटी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, ज्येष्ठ नेते अजितदादांच्या निधनामुळे कोणताही विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय जाहीर करत त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व मतदारांचे मनापासून आभार मानले.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनीही जनतेचे आभार मानताना सांगितले की, “फलटण तालुक्याने परिवर्तनाचा जो निश्चय केला होता, त्याला या निवडणुकीतही मतदारांनी भाजप-राष्ट्रवादी महायुतीला भरभरून पाठिंबा देत दुजोरा दिला आहे. पंचायत समितीसाठी तालुक्याने दोन्ही बाजूंना समान न्याय दिला असला, तरी सभापतीपदाची चिठ्ठी परमेश्वराच्या इच्छेने आमच्याच बाजूने निघेल, अशी आमची भावना आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments