Monday, August 17, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यात राजेगटाचा दमदार पुनरागमन; जिल्हा परिषदेत ५, पंचायत समितीत ८ जागांवर...

फलटण तालुक्यात राजेगटाचा दमदार पुनरागमन; जिल्हा परिषदेत ५, पंचायत समितीत ८ जागांवर विजयसभापती पदाचा फैसला चिठ्ठीवर; राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता

फलटण | प्रतिनिधी  :- फलटण तालुक्यात तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापवले आहे. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकांमध्ये शिवसेना राजेगटाने जिल्हा परिषदेत आठपैकी पाच जागा जिंकत मोठा राजकीय करिश्मा केला, तर पंचायत समितीच्या १६ जागांपैकी शिवसेना राजेगट व भाजप यांनी प्रत्येकी ८ जागा जिंकत बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता पंचायत समिती सभापती पदाचा निर्णय चिठ्ठीद्वारे होणार असून, संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

जिल्हा परिषद गटांचे निकाल – चुरशीची लढत, दिग्गजांना धक्का
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप व शिवसेना यांच्यात तुल्यबळ लढती पाहायला मिळाल्या.
कोळकी गटातून स्व. माजी आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
वाठार निंबाळकर गटातून भाजपचे विष्णू लोखंडे विजयी झाले.
गुणवरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. ऋतुजा अभिजित जगताप, तर बरड गटातून शिवसेनेच्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी विजय मिळवला.
हिंगणगाव गटात दोन वेळा मतमोजणी होऊनही भाजपाच्या अ‍ॅड. सौ. किरण निलेश नलावडे यांनी माजी जि.प. सदस्या सौ. सारिका ताई अनपट यांचा धक्कादायक पराभव केला.
तरडगाव गटातून शिवसेनेचे गिरीश बनकर यांनी एकतर्फी विजय मिळवला, तर विडणी गटात सौ. ज्योती गौतम मोरे यांनी अत्यल्प फरकाने बाजी मारली.
पंचायत समितीत अटीतटीची लढत; दोन्ही गटांना ८-८ जागा
पंचायत समितीच्या १६ जागांमध्ये राजेगट शिवसेना व भाजप यांना प्रत्येकी ८ जागा मिळाल्या आहेत.
तरडगाव गणातून सौ. योगिता दीपक गायकवाड, पाडेगाव गणातून राहुल दादासो नरुटे, साखरवाडी–पिंपळवाडी गणातून कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी विजय मिळवला.
सस्तेवाडी गणातून गणेश मल्हारी तांबे, विडणी गणातून सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे, गुणवरे गणातून सौ. वनिता धनाजी आढाव, बरड गणातून सौ. स्वाती हणमंत आटोळे यांनी भाजप उमेदवारांना धक्का दिला.
हिंगणगाव, सुरवडी, सासवड, जाधववाडी, वाठार निंबाळकर यांसह अनेक गणांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचे निकाल लागले. अखेर दोन्ही गटांना समसमान आठ जागा मिळाल्याने सभापती पदासाठी चिठ्ठीचा मार्ग निश्चित झाला आहे.
पराभवाचा वचपा काढत राजेगटाची मुसंडी
मागील विधानसभा व नगरपालिका निवडणुकांतील पराभवानंतर राजेगट शिवसेनेने या निवडणुकीत जोरदार पुनरागमन करत जिल्हा परिषदेत पाच जागा जिंकल्या. पंचायत समितीतही आठ सदस्य निवडून आल्याने आगामी काळात फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments