Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश

रसिक स्पेशल: ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश

रसिक स्पेशल:  ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश

[ad_1]

डॉ. सुखदेव उंदरे7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारत आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद अजिबात सहन करणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’मधून स्पष्ट झालेच आहे. पण, आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारत आता कोणत्याही सीमा पार करु शकतो, हा संदेशही त्यात दडला आहे. आणि तो उद्याच्या जगातील भारताच्या स्थानासाठी जास्त महत्त्वाचा आहे.

पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला म्हणजे सुरक्षेतील चूक होती का? या प्रश्नापेक्षाही पाकिस्तान पुरस्कृत दहशतीचा ना-पाक इरादा मध्येच डोके वर कसा काढतो, या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. हे मूळ शोधताना भारताने आजवर बहुतांश वेळा संयमी भूमिका स्वीकारली. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला एका विशिष्ट आणि मर्यादित स्वरुपात प्रत्युत्तर दिले होते. पण यावेळी मात्र भारताने आपल्यावरील जागतिक, राजनयिक, सैनिकी, भौगोलिक मर्यादा आक्रमकपणे ओलांडण्याचे धैर्य दाखवले. भारत – पाकिस्तानमध्ये संघर्षाच्या धुरांचे प्रचंड लोळ उठले असताना, त्यातून जगासाठीही एक संदेश ठळकपणे उमटला आहे.

‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ आणि त्यापुढे… : २०१६ च्या उरी येथील आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कूटनीतिक पावले उचलली. पण, त्यांची व्याप्ती मर्यादित ठेवली होती. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’चा दर्जा रद्द करून त्या देशाची आर्थिक कोंडी केली. पहलगाम हल्ल्यानंतर मात्र भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध आक्रमक व्यूहनीती अवलंबली. सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला, पाकिस्तानी नागरिकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या, त्या देशाच्या राजनयिक अधिकारी आणि नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले, पाकिस्तानसाठी हवाई हद्द बंद केली. हा ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ महत्त्वाचा असला, तरी तो कारस्थानी पाकला वठणीवर आणण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे भारत केवळ ही कूटनीतिक कारवाई करून थांबणे शक्य नव्हते. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंमलात आणत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करुन भारताने पहलगाम हल्ल्याचा हिशेब चुकता केला. मात्र, या हल्ल्यांमध्ये नागरी वसाहतींना किंवा लष्करी तळांना लक्ष्य केले नाही.

व्यूहात्मक, भौगोलिक प्रत्युत्तर : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या आत घुसून हल्ला केला. या आधीच्या बालकोटसारख्या हल्ल्यांमध्ये भारताने केवळ नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरवर आपले लक्ष केंद्रित केले होते. नियंत्रण रेषा ही सैन्याचा प्रचंड फौजफाटा असलेली सीमा आहे, परंतु यावेळी भारताने आपल्या रणनीतीमध्ये कोणतीही संदिग्धता न ठेवता थेट आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पाकिस्तानातील पंजाबमध्ये हल्ला केला. यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदची बहावलपूर, मुरीदकेमधील मुख्यालये आणि दहशतवाद्यांची प्रशिक्षण तळ लक्ष्य करण्यात आली. संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने सवाई नाला कॅम्प (मुझफ्फराबाद), सय्यदना बिलाल कॅम्प (मुझफ्फराबाद), गुलफूर कॅम्प (कोटली), बरनाला कॅम्प (भिंबर), अब्बास कॅम्प (कोटली) या पाकव्याप्त काश्मिरातील, तर सरजल कॅम्प (सियालकोट), मेहमुना जोया कॅम्प (सियालकोट), मरकझ तोयबा (मुरीदके), मरकझ सुभानअल्लाह (भवालपूर) या पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले. जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या मालमत्तांवर हल्ला करून त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. भारताची ही कृती म्हणजे पाकपुरस्कृत दहशतवादाला व्यूहात्मकदृष्ट्या व्यापक आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असे दिलेले प्रत्युत्तर होते.

पाकिस्तानने आता अशी दुष्कृत्ये करू नयेत आणि भारतीय उपखंडामध्ये तणाव वाढवण्याची आगळीक करू नये, असा भक्कम संदेश भारताने दिला. परंतु, विनाशकाले विपरीत बुद्धी.. या उक्तीप्रमाणे पाकिस्तानच्या उतावीळ लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने सीमेवरुन गोळीबार, बॉम्बहल्ले, ड्रोन हल्ले करून भारताला उलट उत्तर देण्याचे दु:साहस केले. त्यामुळे आपल्या सीमा आणि नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारताने पाकवर प्रतिहल्ले सुरू केले. युद्धज्वर चढलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागावर हल्ले सुरूच ठेवल्याने भारतानेही प्रत्युत्तरादाखल जोरदार हल्ला चढवला. या युद्धाचे परिणाम भविष्यात समोर येतील, तेव्हा ते भारत – पाकिस्तानप्रमाणेच जगासाठीही अत्यंत महत्त्वाचे असतील.

जगाचे कान उघडणारी रणभेरी : ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने दिलेले संदेश आणि संकेत केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर जगासाठीही महत्त्वाचे आहेत. भारत आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद अजिबात सहन करणार नाही, हे तर या कारवाईतून स्पष्ट झालेच आहे, पण या निमित्ताने जागतिक राजकारण, परराष्ट्र संबंध, संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षाविषयक धोरणात भारताने केलेला आक्रमक बदल अधिक उल्लेखनीय आहे. आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारत आता कोणत्याही सीमा पार करु शकतो, हा संदेश त्यातून दिला गेला आहे आणि तो उद्याच्या जगातील भारताच्या स्थानासाठी महत्त्वाचा आहे. भारताच्या या कारवाईचा संकेत पाकिस्तानसह दक्षिण आशियाई देशांसाठी तसेच अमेरिका, चीनसारख्या जागतिक राजकारणा‌र वर्चस्व ठेवण्यासाठी एकमेकांशी लढणाऱ्या देशांना इशारा देणारा आहे. भारत स्वत:च्या हितासाठी आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी जागतिक, आर्थिक, लष्करी वा अन्य कोणत्याही प्रकारच्या दबावाला भीक घालणार नाही, हे स्पष्ट करणारा हा संकेत आहे. एकूणच संघर्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असला, तरी त्या निमित्ताने भारताने फुंकलेली रणभेरी जगाचे कान उघडणारी आणि महासत्तांना भानावर आणणारी आहे. मोठ्या संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीतूनही पाकिस्तान शहाणा झाला नाही, तर भारताला रोखता येणार नाही, हे सांगणारा हा आवाज आहे.

(संपर्क – sukhadevsundare@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments