Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रवेब वॉच: ‘अग्नी’ फायर ब्रिगेडच्या शौर्याची ‘ज्वलंत’ कहाणी

वेब वॉच: ‘अग्नी’ फायर ब्रिगेडच्या शौर्याची ‘ज्वलंत’ कहाणी

वेब वॉच:  ‘अग्नी’ फायर ब्रिगेडच्या शौर्याची ‘ज्वलंत’ कहाणी

[ad_1]

सुहास किर्लोस्कर36 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘अग्नी’चा बराचसा भाग फायर ब्रिगेड विरुद्ध पोलिस अशा नाट्याने तापला आहे.

आपल्याकडे फायर ब्रिगेडच्या कामाचे कौतुक झाल्याची उदाहरणे कमीच आहेत. या दलातील जवानांच्या शौर्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. आग लागल्याची बातमी होते; पण ती कोणी, कशी आटोक्यात आणली, त्यांनी शौर्याने किती जणांचे प्राण कसे वाचवले, या विषयीच्या बातम्या ‘ब्रेकिंग’ मानल्या जात नाहीत. आग कोणाच्या हलगर्जीमुळे लागली, याचा तपास झाला, तरी त्याचा गवगवा होत नाही. शौर्य पदकांच्या बाबतीतही अनेकदा फायर ब्रिगेडच्या जवानांकडे दुय्यमपणे पाहिले जाते. आगीशी निरंतर खेळ सुरू असला, तरी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळत नाही, त्यांचे कौतुक होत नाही. अशा अनेक ‘ज्वलंत’ प्रश्नांचा वेध घेणारा ‘अग्नी’ हा सिनेमा नुकताच प्राइमवर रिलीज झाला आहे.

सिनेमासाठी उत्तम विषय निवडल्यावर पुढची पायरी असते पटकथा लेखनाची. अशा विषयावर पटकथा लिहिताना त्यातील बारकावे प्रेक्षकांना सांगण्यापूर्वी लेखकाला त्याचा अभ्यास करावा लागतो. आवेश न आणता हा अभ्यास दाखवण्यात पटकथा लिहिण्याचे कौशल्य असते. तांत्रिक बाबींची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना त्यात थोडा ‘ड्रामा’ही असावा लागतो, अन्यथा तो सिनेमाऐवजी डॉक्युमेंटरी होण्याचा धोका असतो. पण, हिंदी सिनेमांमध्ये अशा ड्रामेबाजीवर इतका भर दिला जातो, तितका मूळ विषयाचा अभ्यास दुर्लक्षित राहतो आणि तिथेच हे सिनेमे फसतात. ‘चार घटकाची करमणूक’ हे सूत्र सिनेमा थिएटरमध्ये चालण्यासाठी वापरले जाते, पण ओटीटीच्या प्रेक्षकांना ‘कंटेन्ट’ मिळाला नाही, तर ते रिमोटचा वापर करतात. राहुल ढोलकिया आणि विजय मौर्य यांनी फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांचे कार्य समोर आणताना, ‘नायक-खलनायक’ अशा पद्धतीने मांडणी करून ‘अग्नी’ची पटकथा सस्पेन्स थ्रिलर केली आहे. खलनायकाची भूमिका संबंधित कलाकाराने उत्तम केली असली, तरी ते पात्र हिंदी सिनेमाप्रमाणे मासलेवाईक झाले आहे. स्वतःची बाजू प्रेक्षकांना सांगण्याची संधी खलनायकाला दिली आहे. आग लागली असताना खलनायक स्वत:च, आपण हा गुन्हा का करतो आहे, हे वेळ काढून सांगत राहतो, हा प्रसंग फिल्मी झाला आहे.

अशा गोष्टींमुळे ‘अग्नी’ हा एरवी सर्वसाधारण सिनेमा झाला असता, पण कलाकारांची निवड उत्तमपणे केल्याने तो एकदा तरी बघावा असा झाला आहे. प्रतीक गांधीने साकारलेला फायर ब्रिगेड अधिकारी आणि दिव्येन्दु शर्माचा पोलिस अधिकारी त्या दोन पात्रांमधील हेवेदावे प्रसंग पेरल्यामुळे प्रेक्षणीय ठरले आहेत. अर्थात, या सिनेमाचा बराचसा भाग फायर ब्रिगेडच्या शौर्यापेक्षा फायर ब्रिगेड विरुद्ध पोलिस अशा नाट्याने तापला आहे. प्रतीक गांधीने ‘स्कॅम’ या वेब सिरीजमध्ये उत्तम काम केले होते. “प्यार का पंचनामा’,‘मिर्झापूर’ अशा अनेक कलाकृतींमधून दिव्येंदुने लक्षणीय अभिनय केला आहे. सई ताम्हणकरने फायर ब्रिगेड अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारताना केलेला संयत अभिनय आवर्जून बघावा असा आहे. मोजके संवाद, पण उत्तम रिअॅक्शनमधून तिने अभिनयाचे लाजवाब दर्शन घडवले आहे. ‘अग्नी’ हा मुंबई फायर ब्रिगेड संबंधित असल्यामुळे सिनेमातील संवाद हिंदी-मराठी आहेत. बरेच कलाकारही मराठी आहेत. जितेंद्र जोशीने न पटणारी भूमिका चांगली साकारली आहे. सखी गोखले, अनंत जोग यांच्या भूमिका उत्तम. संयमी खेरला उत्तम सिनेमांमध्ये जास्त फुटेजच्या भूमिका मिळतात. पण, त्यातील वैविध्य दाखवण्याची संधी तिने इथे वाया घालवल्याचे जाणवते.

राहुल ढोलकियांनी दिग्दर्शन करताना कथेतला ‘ड्रामा’ पुढे आणला आणि फायर ब्रिगेडचा प्रश्न मागे पडला आहे. “परझानिया’सारख्या दर्जेदार सिनेमाच्या दिग्दर्शकाने ‘रईस’सारख्या चित्रपटांचा मार्ग स्वीकारावा, हे जरा खटकते. प्रॉडक्शन डिझाइनमध्ये आणखी चांगले काम व्हायला हवे होते. आगीचे सर्वच प्रसंग व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरून दाखवले आहेत. त्यामुळे त्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा आणि भडकपणा जाणवतो. पोलिसाच्या रुपातील नायक आगीच्या ज्वाळांतून हेल्मेट आणि सुरक्षा साधनांशिवाय सुखरूप चालतो, पळतो, त्याला किरकोळ खरचटते, पण जराही भाजत नाही! बऱ्याच वेळा फायर ब्रिगेडचे कर्मचारी, विशेषतः प्रमुख कलाकार डोक्यावर हेल्मेट न घालता खुलेपणाने आगीतून जाता-येताना दाखवले आहेत. अशा गोष्टी या प्रकारच्या कथा विषयासाठी सर्वथा गैर आहेत.

भारतात २०२२ मध्ये पहिल्या महिला फायर ब्रिगेडची नेमणूक केली गेली. पण, ही कथा महिलेशिवाय कशी पुढे सरकणार, असा प्रश्न सिनेमा तयार करणाऱ्यांना पडला असावा. त्यामुळे ‘अग्नी’च्या फायर ब्रिगेडमध्ये एक नायिकाही आहे आणि याच टीममध्ये तिचे प्रेम प्रकरण रंगले आहे. म्हणून मग त्या दोघांचे एक गाणे ओघाने आलेच! त्यासाठी ‘जागी बदन में ज्वाला..’ किंवा ‘आग हैं लगी हुई..’ अशी जुनी गाणी रिमिक्स करून न वापरल्याबद्दल निर्माता-दिग्दर्शकांचे आभारच मानायला हवे!

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments