कचरा डेपोसाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव नगरपरिषद सभेत सर्वानुमते मंजूर; राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण
अकलूज प्रतिनिधी : ग्रामदैवत अकलाई देवी मंदिर परिसर तसेच नीरा नदीपात्रालगत साचलेल्या कचऱ्याच्या प्रश्नावर अकलूजमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या परिसरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी अकलूज नगरपरिषदेने व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वीच अधिकृत निर्णयप्रक्रिया सुरू करून प्रस्ताव मंजूर केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे निर्णय झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली व्हिडिओ प्रसिद्धी ही केवळ राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेतील नोंदीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ३ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, गणपूर्तीअभावी ही सभा तहकूब करण्यात आली होती.
त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी तहकूब सर्वसाधारण सभा पार पडली. नगराध्यक्षा सौ. रेश्मा अडगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत घनकचरा व्यवस्थापनासाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिडिओ प्रसिद्धीवरून राजकीय वाद
वैधानिक प्रक्रिया पूर्ण होऊन नगरपरिषदेने निर्णय घेतल्यानंतर काही भाजप पदाधिकाऱ्यांनी अकलाई देवी मंदिर परिसरातील कचऱ्याचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे सांगण्यात येत आहे. या माध्यमातून नगरपरिषद निष्क्रिय असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
नगरपरिषदेच्या स्तरावर निर्णय झाल्यानंतर व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून या प्रश्नाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा अकलूज शहरात रंगली आहे. त्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यावर राजकीय प्रसिद्धी मिळविण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीकाही केली जात आहे.
‘१४ वर्षांतील विकासकामांचा हिशेब द्या’
या वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटाने भाजप पदाधिकाऱ्यांना थेट सवाल उपस्थित केला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असून जिल्ह्याला भाजपचे पालकमंत्री लाभलेले असताना गेल्या १२ ते १४ वर्षांच्या कालावधीत अकलूजच्या विकासासाठी किती निधी आणण्यात आला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
यासोबतच गेल्या १४ वर्षांमध्ये अकलूजमध्ये झालेल्या किमान १४ प्रमुख विकासकामांचा तपशील आणि त्यासाठी मिळालेल्या निधीचा पुराव्यासह हिशेब जनतेसमोर जाहीर करावा, असे खुले आव्हानही विरोधकांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
भाजपने निधी आणावा; केवळ आरोप नकोत
कॅमेऱ्यासमोर आरोप करून किंवा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून प्रश्न सुटणार नाहीत, असा टोला लगावत भाजपने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अकलूजच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अकलूजसाठी अत्याधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी आणण्याची जबाबदारी राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्वीकारावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
नगरपरिषदेकडून तातडीने अंमलबजावणीची मागणी
दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अकलाई देवी मंदिर परिसर आणि नीरा नदीपात्रालगत साचलेला कचरा युद्धपातळीवर हटवून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.
तसेच कचरा डेपोसाठी निवडण्यात येणाऱ्या जागेबाबत आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या पुढील प्रक्रियेबाबत कालबद्ध आराखडा जाहीर करावा, अशीही मागणी पुढे आली आहे.
अकलूजमध्ये भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर विकासकामे वेगाने सुरू असताना संपूर्ण शहर विकासाच्या बाबतीत मागे पडल्याचा अपप्रचार जनतेकडून स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही विरोधी गटाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, अकलाई देवी परिसर आणि नीरा नदीपात्रातील कचऱ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी संबंधित असल्याने राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्रितपणे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
