गुरुची पाठीवरची थाप यशाचा मार्ग दाखवते
शिक्षक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी रागावतात, शिक्षा करतात – सोमीनाथ घोरपडे
सस्तेवाडी : शिक्षक दिनानिमित्त कै. मल्हारराव सस्ते हायस्कूल, सस्तेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांनी गुरुचे महत्त्व विशद करताना, “माणसाच्या जडणघडणीत गुरुचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरु केवळ ज्ञान देत नाही, तर विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची, संकटांवर मात करण्याची आणि योग्य-अयोग्याची चिकित्सा करण्याची दृष्टी देतो,” असे प्रतिपादन केले.
घोरपडे म्हणाले की, कठोर मेहनत, चिकाटी आणि उदात्त ध्येय यांच्या पूर्ततेसाठी गुरुचे मार्गदर्शन आणि योग्य वेळी मिळणारी पाठीवरची थाप अत्यंत महत्त्वाची असते. आयुष्यात संकटे येतच राहतात; मात्र त्या संकटातून मार्ग काढून पुढे जाण्याचे बळ गुरुच्या विचारांतून मिळते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात मार्गदर्शक व्यक्तींचे विचार समजून घेऊन त्यातून स्वतःची वाट निर्माण केली पाहिजे.
संत कबीरांच्या जीवनाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, कबीरांनी रामानंदांना गुरुस्थानी मानले. मात्र गुरु स्वीकारणे म्हणजे अंधानुकरण करणे नव्हे. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून सत्याचा शोध घेण्याची आणि विवेक जपण्याची शिकवण कबीरांच्या जीवनातून मिळते. “गुरुने विचार दिला पाहिजे आणि शिष्याने त्या विचारांची चिकित्सा करून सत्य स्वीकारले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारविश्वाच्या जडणघडणीत तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि विवेक या मूल्यांना त्यांनी आपल्या जीवनकार्याचा आधार बनवले. बाबासाहेबांनी कोणत्याही विचाराचा स्वीकार केवळ परंपरेमुळे केला नाही; तर त्याची चिकित्सा करून मानवहिताला पूरक असलेले विचार स्वीकारले. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारण्याची आणि चिकित्सकपणे विचार करण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊ गुरुस्थानी होत्या. स्वराज्याचे स्वप्न, अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य, प्रजेविषयीची आस्था, स्त्रियांचा सन्मान आणि न्यायाची भूमिका यांचे संस्कार जिजाऊंनी बाल शिवबांच्या मनावर केले. एका आईने दिलेले संस्कार पुढे एका महान स्वराज्यनिर्मात्याच्या कर्तृत्वातून इतिहास घडविणारे ठरले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जडणघडणीत त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. राज्यकारभार, प्रशासन, न्यायबुद्धी, युद्धकौशल्य आणि प्रजेच्या हिताचा विचार करण्याची दृष्टी त्यांना त्यांच्या मार्गदर्शनातून मिळाली. पुढे अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्वातून आदर्श राज्यकर्ती म्हणून इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. गुरुचे मार्गदर्शन आणि स्वतःचे कर्तृत्व यांची सांगड घातली तर व्यक्ती असामान्य कार्य करू शकते, हे त्यांच्या जीवनातून दिसून येते.
अब्राहम लिंकन यांच्या जीवनातील गुलामगिरीविरोधी संघर्षाचा संदर्भ देताना घोरपडे यांनी सांगितले की, विद्यार्थी दशेत गुलामगिरीचे अमानुष वास्तव पाहून लिंकन यांच्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. माणसाची खरेदी-विक्री करणारी व्यवस्था त्यांच्या मनाला अस्वस्थ करून गेली आणि अन्यायकारक प्रथा नष्ट करण्याचा निर्धार त्यांच्या मनात दृढ झाला. पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी गुलामगिरीविरोधात निर्णायक भूमिका घेतली. अमेरिकेची एकता टिकविण्याच्या संघर्षात त्यांनी मोठी किंमत मोजली आणि अखेर त्यांची हत्या झाली. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची नैतिक ताकद शिक्षण, संस्कार आणि मार्गदर्शक विचारांमधून निर्माण होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे उदाहरण देताना घोरपडे म्हणाले की, देशाचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपद भूषविल्यानंतरही त्यांनी स्वतःची ओळख सर्वप्रथम शिक्षक म्हणूनच जपली. अध्यापनाविषयीची निष्ठा आणि शिक्षणाविषयीचा आदर त्यांनी आयुष्यभर जपला. मोठे पद मिळाले तरी शिक्षकत्वाची ओळख विसरू नये, हा त्यांच्या जीवनाचा प्रेरणादायी संदेश आहे.
विद्यार्थ्यांना उद्देशून घोरपडे म्हणाले, “शिक्षक तुम्हाला रागावतात, कधी शिक्षा करतात, तुमच्या चुका दाखवून देतात. परंतु त्या रागामध्ये द्वेष नसतो आणि त्या शिक्षेमध्ये शिक्षकाचा वैयक्तिक आनंद नसतो. तुमचे आजचे चुकणे उद्याच्या आयुष्यात मोठी अडचण बनू नये आणि तुमचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी शिक्षक तुम्हाला शिस्त लावतात.”
आजच्या डिजिटल युगात माहितीचे असंख्य स्रोत विद्यार्थ्यांच्या हातात उपलब्ध आहेत. मात्र माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रूपांतर करण्याचे काम शिक्षक करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना केवळ विषय शिकवणारी व्यक्ती न मानता जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक म्हणून पाहावे. शिक्षकांच्या सूचना, अनुभव आणि मार्गदर्शन यांचा सकारात्मक स्वीकार करून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अजित गायकवाड सर, संचालक, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, फलटण होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री. सोमीनाथ घोरपडे सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज भैय्या कदम (आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर) उपस्थित होते.
यावेळी श्री. अशोक रामचंद्र पिसाळ सर (माजी मुख्याध्यापक, राजेंद्र विद्यालय, खंडाळा), ग्रामीण कथाकथनकार श्री. रवींद्र कोकरे सर, विद्यालयाचे माजी शिक्षक श्री. आत्माराम सस्ते सर, संस्थेचे माजी शिक्षक श्री. कांतीलाल चव्हाण सर, उपशिक्षक श्री. रवींद्र शिंदे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील सूर्यवंशी सर, श्री. हनुमंत चव्हाण सर, श्री. विठ्ठल पवार सर, श्री. सुनील केंजळे सर, श्री. विश्वास घनवट सर, सौ. स्वाती पवार मॅडम, कु. रसिका जगताप मॅडम, श्रीमती अनिता बांबेरे मॅडम, श्री. बजरंग गायकवाड सर, लिपिक श्री. संतोष इंगळे, प्रभारी परिचर श्री. धनंजय सस्ते, शिपाई श्री. नारायण आवटे, शिपाई श्री. धनंजय शिंगाडे तसेच मुख्याध्यापिका कु. सलोनी मदने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प केला. “गुरुने दिलेले ज्ञान, संस्कार आणि विचार हीच विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिदोरी आहे,” या संदेशाने शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
