Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: 'मुचकुंद दुबे' कठीण काळात कसब दाखवणारा अधिकारी

वेध मुत्सद्देगिरीचा…: ‘मुचकुंद दुबे’ कठीण काळात कसब दाखवणारा अधिकारी

वेध मुत्सद्देगिरीचा…:  ‘मुचकुंद दुबे’ कठीण काळात कसब दाखवणारा अधिकारी

[ad_1]

  • Marathi News
  • Opinion
  • ‘Muchkund Dubey’ An Officer Who Showed Courage In Difficult Times Rasik Article By Dr. Rohan Chaudhary

डॉ. रोहन चौधरी8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जागतिक राजकारणामध्ये घडणाऱ्या स्थित्यंतराला नेटाने सामोरे जाणे हे १९८० आणि १९९० च्या दशकात भारतीय परराष्ट्र धोरणासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. जागतिक राजकारणातील हे स्थित्यंतर अनपेक्षित तर होतेच; पण ते अत्यंत गुंतागुंतीचेही होते. आपल्या अनुभवाच्या जोरावर ज्या मुत्सद्यांनी या बदलांचे आव्हान पेलले, त्यामध्ये मुचकुंद दुबे यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांच्या या अनुभवामुळेच १९९० – ९१ या अत्यंत कठीण काळात त्यांना देशाच्या परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. १९५७ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंच्या काळात भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केलेल्या दुबे यांना पुढे राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह आणि पी. व्ही. नरसिंह राव यांसह अनेक पंतप्रधानांसोबत भारतीय परराष्ट्र धोरणाची धुरा सांभाळण्याची अत्यंत दुर्मिळ अशी संधी मिळाली.

आपल्या मुत्सद्देगिरीच्या कौशल्यावर दुबे यांनी या प्रत्येक संधीचे सोने केले. ज्यावेळी त्यांनी परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी सांभाळली, त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत म्हणजेच २ ऑगस्ट १९९० ते २८ फेब्रुवारी १९९१ या काळात इराक आणि कुवेत यांच्यात युद्ध सुरू झाले. अशावेळी भारतीयांना देशात सुखरूप परत आणणे, हा भारतीय परराष्ट्र विभागासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. व्ही. सी. शुक्लांसारख्या अननुभवी नेत्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी होती. शुक्लांचे उपमंत्री आणि पहिल्यांदाच खासदार झालेले दिग्विजयसिंग यांनाही परराष्ट्र धोरणाविषयी अनुभव नव्हता. परराष्ट्र मंत्रालयातील या समस्येबरोबरच भारतीय राजकारणातही अस्थिरता होती. आघाड्यांच्या राजकारणाची नुकतीच सुरूवात झाली होती. शुक्लांना मिळालेले परराष्ट्रमंत्रिपद हा आघाडीच्या राजकारणाचाच परिपाक होता.

या पार्श्वभूमीवर दुबे यांचा अनुभव तर दांडगा होताच; पण तटस्थपणा ही त्यांची ताकद होती. या ताकदीच्या जोरावरच त्यांनी इराण-कुवेत युद्धात अडकलेल्या भारतीयांची विक्रमी संख्येने सुटका केली. ‘ऑपरेशन अजय’ नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेल्या या मोहिमेत सुमारे १ लाख ७० हजार भारतीयांना साधारण ५०० विमानांच्या फेऱ्यांद्वारे भारतात सुखरूप आणण्यात आले. हवाई वाहतुकीच्या मर्यादा, अपुरी कागदपत्रे आणि विस्कळीत संवाद यंत्रणा यांवर मात करून दुबेंनी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अशा प्रकारची सर्वांत मोठी मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. भारत जगातील कोणत्याही संकटातून भारतीयांना सुखरूप बाहेर काढू शकतो, हा संदेश यातून जागतिक समुदायाला दिला गेला.

परराष्ट्र सेवेतून निवृत्ती झाल्यावरही दुबे यांनी आपल्यातील मुत्सद्द्याला निवृत्त केले नाही. आज प्रचलित असलेल्या ‘ग्लोबल साउथ’ संकल्पनेविषयी अर्थात अतिविकसनशील आणि विकसनशील देशांच्या समस्यांविषयी ते खूप संवेदनशील होते. त्यासाठी सामाजिक विकास, शिक्षण आणि न्याय यासाठी ते प्रचंड आग्रही राहिले. जात, वर्ग, लिंग आणि धर्म यावर आधारित कोणताही भेदभाव न करता गुणवत्तेवर आधारित शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी सामान्य शालेय शिक्षण प्रणालीचा पुरस्कार केला. ही शिक्षण प्रणाली हाच विकसित देशाचा पाया आहे, असे त्यांचे मत होते. बिहारच्या कॉमन स्कूल कमिशनचे अध्यक्ष म्हणून २००७ मध्ये त्यांनी जो अहवाल सादर केला, त्यामध्ये त्यांनी या प्रणालीवर विशेष भर दिला होता. मात्र, ही प्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाविषयी त्यांनी खंतही व्यक्त केली होती.

शिक्षणाच्या अधिकाराच्या विकृतीकरणामुळे ते अत्यंत चिंतित होते. दुबे यांचे सामान्य शालेय शिक्षण प्रणालीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले नसले, तरी ते स्वतः न्याय, समानता आणि प्रामाणिकतेचे प्रतीक होते. मुत्सद्देगिरीचे कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रातील तळमळ याबरोबरच त्यांनी साहित्य आणि अनुवादाच्या क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध केले. १९५३ मध्ये त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’चा हिंदीत अनुवाद केला. त्याचप्रमाणे, बांगलादेशातील प्रसिद्ध कवी शम्सउर रहमान आणि सूफी संत लालन शाह फकीर यांच्या कवितांचाही त्यांनी अनुवाद केला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डी. लिट्. या पदवीने सन्मानित केले. दक्षिण आशियातील देशांचे संबंध हे राजकारणापुरते सीमित असू नये, तर त्यांच्यात सांस्कृतिक ऋणानुबंध असले पाहिजेत, ही भावना त्यांच्या या अनुवाद कार्यामागे होती. अलीकडेच २६ जूनला, वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. देशाला परराष्ट्र धोरणात यश मिळवून देण्यासाठी मुत्सद्देगिरीसोबतच राजकारण, शिक्षण, साहित्य या गोष्टी किती आवश्यक आहेत आणि एखादा राजनयिक अधिकारी त्यांचा आपल्या विचारात व कृतीत समावेश करुन, देशाला त्याचा कसा लाभ मिळवून देऊ शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ मुचकुंद दुबे यांनी घालून दिला आहे.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments