लोक-संचित: नाही तरी गोष्टी बोलू नये…

0
19
लोक-संचित: नाही तरी गोष्टी बोलू नये…


  • Marathi News
  • Opinion
  • Rasik Supplementary Article Lok Sanchit Sadar Write By Praveen Dashrath Bandekar 

प्रवीण दशरथ बांदेकर4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

माणसांना गोष्टी सांगायला आवडतात, गोष्टी ऐकायला आवडतात. माणसांच्या व्यतिरिक्त कुणी गोष्टी सांगत असतील, हे संभवत नाही. गोष्टी म्हणजे ज्यात काही तरी कथानक असतं, पात्रं असतात, सुरुवात आणि शेवट असतो, अशाच फक्त गोष्टी असंही नाही. गोष्टी म्हणजे मनातलं गुज, हितगुज वा गुजगोष्टी. आमच्याकडे मालवणी बोलीत एक सुरेख शब्द आहे – गजाली. गुजगोष्टी म्हणजे गजाली. गजाली हे गुज या शब्दाचं अपभ्रंश होऊन आलेलं रूपही असू शकतं. कोकणी माणसांना आवडतं गजाली सांगत बसायला. तासन‌्तास देहभान हरपून, कामधंदा टाकून माणसं गजाली सांगत असतात.

‘गजालीन खाल्यान् घोव आणि फुरशान् खाल्यान् बाईल’ अशी एक म्हणही प्रचलित आहे या मुलखात. अर्थ असा की, माणसं गप्पागोष्टींमध्ये इतकी दंग झालेली असतात की त्या नादात आपला नवरा आपल्याला सोडून दुसरीसोबत नांदायला गेला आहे किंवा आपल्या बायकोला फुरसं डसलं आहे; थोडक्यात म्हणजे, आपल्यावर आपत्ती कोसळली आहे, आपली जवळची माणसं संकटात सापडली आहेत, याविषयीही त्यांना काही खबरबात नसते. मौखिक लोकसंचितातील अशा म्हणी वा वाक्प्रचार वगैरे अनेकदा त्या त्या मुलखातील लोकांची स्वभाववैशिष्ट्ये नोंदवणाऱ्याच असतात. एका अर्थी, हे मौखिक संस्कृतीतून घडणारं एक समाजदर्शनच असतं. त्या त्या प्रदेशांच्या बोली भाषेतील म्हणी पाहा, वाक्प्रचार लक्षात घ्या, लोकगीतं ऐका, स्त्रीगीतं ऐका, मिथ्यकथा, दंतकथा अनुभवा; तुम्हाला त्या त्या प्रदेशाचं स्वाभाविक मर्म सापडेल. तिथल्या सांस्कृतिक जगण्याचं बीजमूळ हाती येईल.

माहेरी येऊन राहिलेली माझी बालविधवा आत्या गात असे… मध्यान् रातीला शंख वाजविला गोविंद गोपाळ जागृत झाला जागृत होऊनि पाणीयासी गेला पाण्याचा विटाळ माशांनी केला… कशी करू देवा आता लिंगाची पूजा..? वरकरणी ऐकताना काही कळत नसे. बाकीच्या इतक्या स्त्रीगीतांसारखंच हेही एक गाणं, असंच वाटत असे कालपरवापर्यंत. पण, कधी तरी एका उदासवाण्या, अस्वस्थ रात्रीच्या जागरणानंतर पहाटे पहाटे कानांवर आलेल्या त्या तितक्याच करुण सुरांनी मनात काही तरी वेगळ्याच अर्थांची जाणीव करून दिली. ते तसं असेल वा नसेलही, पण मौखिक परंपरेतील अशा गाण्यांना जपणाऱ्या या स्त्रियांच्या मनाचा कोंडमारा, भावनिक आणि लैंगिक घुसमट, भल्याथोरल्या कुटुंबात स्वतःच्या भुकांचा, इच्छा -आकांक्षांचा शोध घ्यायलाही न मिळणारा अवसर अशा असंख्य गोष्टींची जाणीव त्या गीताने करून दिली होती. शोधली तर सापडतील अशी कैक गाणी, कैक अर्थपूर्ण म्हणी, नेमक्या वर्मावर बोट ठेवणारे वाक्प्रचार, अद्भुततेचं वलय असलेल्या सांगोवांगीच्या लोककथा, आणखीनही काय काय अन् किती किती…

माणसांनी किती पिढ्यांपासून हे धन साठवून ठेवलं आहे. आज आपल्याला जवळपास आयत्या मिळालेल्या या भाषेमध्ये अशा किती अद्भुत गोष्टी सामावलेल्या आहेत, हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. आपल्या किती एक अज्ञात पूर्वजांनी हा खजिना निर्माण केला, त्यात आपापल्या परीने भर घातली, आपल्यापर्यंत पोचवला. ज्ञानोबा – तुकोबांसारख्या संतांनी या सांस्कृतिक लोकसंचिताला तात्त्विक अधिष्ठान दिलं. आध्यात्मिक परिमाण दिलं. गावोगावच्या भजनी परंपरा, ग्रामदैवतांचे उत्सव, सण – परंपरा, लोकविधी अशा सगळ्या माध्यमांतून हा खजिना जतन केला गेला, एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित होत राहिला.

आज भाषेचंही प्रयोजन बदलत चाललं आहे. वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाने भाषेचा संकोच करणं सुरू केलं आहे. हळूहळू फक्त तोंडदेखल्या बोलाचालीच्या संपर्कापुरतीच भाषा शिल्लक राहील की काय, अशीही एक भयशंका अस्वस्थ करू लागली आहे. लोकसंचिताचा आपला हा अभिमानास्पद खजिनाही पुरेशा वापराअभावी नजीकच्या काळात लुप्त होऊन जाईल, असंही भय वाटत आहे. तसं झालं तर, आपला भूतकाळ, आपला इतिहास, आपली सांस्कृतिक आणि सामाजिक स्थित्यंतरे, यांविषयी जाणून घेण्यासाठी मदत करू शकणारा एक फार मोठा आधार आपण गमावून बसणार आहोत.

ग्राम्सी नावाचा समाजशास्त्राचा एक अभ्यासक म्हणतो तसं, खरं तर, आपल्या मौखिक परंपरेत जनसामान्यांचा आपल्यासमोर पुस्तकांतून न आलेला इतिहास दडलेला असतो. राजेरजवाडे, सरदार अशा बड्या लोकांचा पराक्रमाचा वा पराजयांचा इतिहास आपल्याला माहीत असतो. पण, त्या त्या राजवटीतले सामान्य लोक कसे जगत होते, त्यांच्या श्रद्धा, परंपरा, जाणिवा, मूल्ये, सांस्कृतिक विशेष अशा कितीतरी गोष्टी आपल्यापर्यंत पोचलेल्या नसतात. त्या समजून घ्यायचं झालं, तर मौखिक इतिहासाकडं जावं लागतं. हा मौखिक इतिहास लिखित इतिहासापेक्षा वेगळा असू शकतो. मौखिक परंपरेतील लोककथा, दंतकथा, सांगोवांगीच्या गोष्टी, स्त्रीगीते, उत्सव – परंपरा, लोकविधी अशांमधून व्यक्त होणारं लोकमानस, श्रद्धा, रुढी, समजुती, स्वभाववैशिष्ट्ये यांमध्ये हा इतिहास दडलेला असू शकतो.

इतिहास लिहून ठेवण्याची परंपरा आपल्याकडं नव्हती. पण, भूतकाळातील छोट्या – मोठ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आयुष्य जगलेल्यांच्या कहाण्या सांगण्याची परंपरा मात्र होती. या कहाण्या कधी पद्यरचनांमधून, तर कधी गोष्टींमधून, कधी नाट्यामधून, तर कधी नृत्यगीतांमधून पुढल्या पिढ्यांपर्यंत पोचवल्या जात होत्या, हस्तांतरित केल्या जात होत्या. हे मौखिक आविष्कार करमणुकीबरोबरच आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांची, कपट कारस्थाने, कुरघोड्या, चुका आणि पराभवांचीही जाणीव करून देत होते. पण एका अर्थी, या माध्यमातून एक प्रकारे आपला सामाजिक – सांस्कृतिक इतिहासच टिकवला जात होता, ते जास्त महत्त्वाचं होतं. अगदी सहजपणे लहान मुलांना झोपताना सांगितलेल्या रामायण – महाभारतातल्या गोष्टींमधूनही आपल्या इतिहासापर्यंत जाण्याची पायवाट निर्माण करून दिली जात होती.

मौखिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्रवणसंस्कृतीचा आपल्या नेणिवेवर आणि एकूणच मानसिकतेवर पगडा असल्यामुळेच बहुधा लिखित शब्द वाचण्याची आधुनिक काळातील वाचनसंस्कृती आपल्याकडं फारशी रुजलेली दिसत नाही. साक्षरतेचं प्रमाण आज बऱ्यापैकी वाढलेलं असलं, तरीही वाचणाऱ्यांचं प्रमाण मात्र वाढलेलं नाही. बघणं आणि ऐकणं या गोष्टी मात्र आपण आजही मनापासून करतो आहोत. पण, भालचंद्र नेमाडेंनी एक निरीक्षण नोंदवलंय त्याप्रमाणे, मौखिकता हे अडाणी, अशिक्षित, अविकसित लोकांचं लक्षण असल्याचा गैरसमज पसरवायला मात्र आपल्या या साक्षर असूनही वाचनाशी जवळीक नसलेल्या लोकांनी बऱ्यापैकी हातभार लावला आहे.

त्यामुळे शिकलेल्या मंडळींना आपलं हे मौखिक लोकसंचित म्हणजे मागासलेपणाचं, गावठीपणाचं काही तरी असल्याचा साक्षात्कार होतो. पण, त्यामुळं आपलं दुहेरी नुकसान होऊ लागलंय, हे मात्र या मंडळींच्या लक्षात येत नाहीय. म्हणजे एकीकडे पुस्तकं वाचत नसल्याने लिखित माध्यमांतून आपला भूतकाळ समजून घेण्यापासून आपण दूर जात आहोत नि दुसरीकडे मौखिक लोकसंचिताला मोडीत काढल्याने तो ठेवाही हळूहळू गमावत आहोत. अशा परिस्थितीत विचार करताना शेवटी इतकंच वाटतं की… तुका ह्मणे खरें, नेलें हातीचें अंधारें… असं होऊ नये म्हणजे मिळवलं.

(संपर्क- samwadpravin@gmail.com)



Source link