Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: गावांमध्ये... घरांपर्यंत का येताहेत वन्यप्राणी?

रसिक स्पेशल: गावांमध्ये… घरांपर्यंत का येताहेत वन्यप्राणी?

रसिक स्पेशल: गावांमध्ये… घरांपर्यंत का येताहेत वन्यप्राणी?

[ad_1]

किशोर रिठे4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात नाशिकच्या मध्यवस्तीतील एका घरात शिरून बिबट्याने कपाटावर असे ठाण मांडले होते. (छाया : विवेक बोकील)
  - Divya Marathi

गेल्या आठवड्यात नाशिकच्या मध्यवस्तीतील एका घरात शिरून बिबट्याने कपाटावर असे ठाण मांडले होते. (छाया : विवेक बोकील)  

घनदाट जंगलांमध्ये सुरू झालेला मानवी वावर आणि आसपासच्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांमुळे, तसेच डांबरी रस्ते, रेल्वेमार्ग, महामार्ग, कालवे आणि आधुनिक दळणवळणाची साधने यांमुळे जंगलांवर प्रचंड जैविक दबाव निर्माण झाला आहे. परिणामी वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांना सुरक्षित राहता येईल अशी आकाराने मोठी आणि माणसाचा वावर नसलेली जंगले कमी झाली आहेत. त्यातूनच वन्यप्राणी आणि माणूस यांच्या सहजीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत वन्यजीव आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष, त्यातून वन्यजीवांकडून माणसावर होणाऱ्या हल्ल्यांत झालेली वाढ, ते थांबवण्यासाठी केलेल्या मानवी उपाययोजना वन्यजीवांच्या जिवावर बेतणे याबाबत एक विदारक चित्र समोर उभे राहिले आहे. या संघर्षाची तीव्रता कमी करायची असेल, तर मुख्यत्वे विकास साधताना वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचाही गंभीरपणे विचार करावा लागेल. वन्यजीवांचे मृत्यू अथवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले, तरी त्यामागची कारणे नैसर्गिक आहेत. कारण मानव आणि वन्यजीव दोघांसाठी हा जगण्याचा संघर्ष आहे. विशेषत: वाघ आणि बिबटे अलीकडे मानवी वस्तीत शिरून हल्ले करण्याच्या घटनांत वाढ होत अाहे. याला कारण विकास करताना पहिली कुऱ्हाड जंगलावर म्हणजे वन्यप्राण्यांच्या अधिवासावरच चालते. हे अनियंत्रित शहरीकरण आपल्या मुळावर उठू लागले आहे.

नैसर्गिक अधिवास की विकास? वन्यजीवांच्या मृत्यूंमागील सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आणि होऊ घातलेला विकास यांतील असमतोल हे आहे. त्यातूनच नवीन अधिवासाच्या शोधात असताना मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष होऊन जीवितहानी होते. रस्ते, धरणे, इमारती, नवीन नगरे, वसाहतींसाठी पहिला बळी जंगलांचा जातो. परिणामी वाघ असो वा बिबट; ते मानवी वस्तीजवळ येत आहेत. या संघर्षाची तीव्रता कमी करायची असेल, तर मुख्यत्वे विकास साधताना वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का बसणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. पण, नेमके तेच होताना दिसत नाही. ताजे उदाहरण द्यायचे तर अमरावती येथील लोकप्रतिनिधी दाम्पत्याने आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेसाठी शहराला लागून असलेल्या पोहरा मालखेड या प्रस्तावित अभयारण्यातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. परिणामी तेथे आश्रयाला असलेले बिबट्यांसारखे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याचे दिसत आहे.

जंगलात माणसाची घुसखोरी : ‘रॉयल बेंगाॅल टायगर’ म्हणजेच ‘पट्टेदार वाघ’ हा मुळातच रुबाबदार आणि ऐटदार प्राणी! त्याचं जंगलात असणं हे संपन्नतेचं प्रतीक. भारताच्या जंगलांतील जिवंतपणा सांभाळून ठेवणारा आणि तेथील जैवविविधता जपणारा तो एक महत्त्वाचा घटक आहे. महाभारतातही, ‘वनाशिवाय वाघ जगू शकत नाही आणि जंगलात वाघ असल्याशिवाय जंगलांचा नाश थांबवू शकत नाही. म्हणून वाघाने जंगलाला वाचवले पाहिजे आणि जंगलाने वाघ पोसला पाहिजे,’ असा संबंध मांडला आहे. पण, त्यांच्यासाठी जंगलात असे ‘वाघ’ बनून रुबाबात फिरणे सोपे कधीच नसते. आजच्या आधुनिक काळात जगताना त्यांना अनेक अडथळे पार करावे लागतात. घनदाट जंगलांमध्ये सुरू झालेला मानवी वावर आणि आसपासच्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांमुळे, तसेच डांबरी रस्ते, रेल्वे मार्ग, महामार्ग, कालवे आणि आधुनिक दळणवळणाची साधने यांमुळे जंगलांवर प्रचंड जैविक दबाव निर्माण झाला आहे. परिणामी वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांना सुरक्षित राहता येईल अशी आकाराने मोठी आणि माणसाचा वावर नसलेली जंगले कमी झाली आहेत. सोप्या भाषेत सांगायचे, तर मानवी वावर आता जंगलाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे, किंबहुना तो वाढला आहे. त्यातून वाघासह वन्यप्राणी आणि माणूस यांच्या सहजीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

आपली ‘हद्द’ ओळखा! विदर्भात आणि त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात कुणी ठार झाल्याची घटना घडली नाही, असा आठवडा जात नाही. अनेकदा अशा वाघाला स्थानिक पुढारी, माध्यमे नरभक्षक वगैरे ठरवून ठार मारण्याची मागणी लावून धरतात. बहुतांश प्रकरणांत वाघाला जेरबंद करून अन्य एखाद्या प्राणिसंग्रहालयात वा दुसऱ्या जंगलात सोडले जाते. क्वचित प्रसंगी मारण्याची परवानगी दिली जाते. पण, वाघ नरभक्षक का झाला, याच्या मुळाशी कुणीच जात नाही. मानवी हल्ल्यांसाठी जबाबदार धरलेल्या वाघांना पकडताना वन खात्याकडून काही चुका होतात. मग त्या हेरून माध्यमे आणि राजकीय पक्षांकडून टीका होते. त्यामुळे मूळ प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना यापासून आपण भरकटत दूर जातो. म्हणूनच वाघ, बिबट्यांसह अन् वन्यप्राणी आणि माणूस यांच्यामध्ये निर्माण झालेल्या या संघर्षाकडे शास्त्रीय व कायदेशीर आधाराने पाहायला हवे. मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या सर्वाधिक घटना नोंदवलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभागातील सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास करता काही विशिष्ट वाघच मानवावर असे हल्ले करतात, हे ध्यानात येते. उर्वरित बहुतांश प्रकरणांमध्ये केवळ अपघाताने माणूस वाघाच्या जंगलात शिरल्याने त्याच्यावर हल्ले झाले असल्याचे दिसून येते.

हल्लेखोर वाघांना पकडण्याचे किंवा मारण्याचे आदेश निघाले की मोठी ओरड होते. अशा सर्व घटनांमध्ये भूल देणारे इंजेक्शन मारून त्यांना पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतरच नाइलाजाने त्यांना मारण्याचे प्रयत्न होतात. झाडीमध्ये बंदुकीची गोळी जशी थेट घुसते, तसे भूल देणाऱ्या इंजेक्शनच्या रबरी डार्टचे नसते. त्यामुळे हल्लेखोर वाघांना भूल देणारे इंजेक्शन देऊन पकडण्यात जास्त अडचणी येतात. त्यामुळे मग वाघांना पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा आणि शक्य न झाल्यास अखेरचा पर्याय म्हणून मारावे अशी परवानगी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून दिली जाते. महाराष्ट्रात आतापर्यंत घडलेल्या दीडशेच्या वर घटना पाहता, कुठेही वाघाने गावात घुसून माणसाला मारले असे झाले नाही. त्यामुळे माणसानेही आपली ‘हद्द’ ओळखली पाहिजे. गावालगतच्या वन क्षेत्रात शौचास बसलेले, चुलीसाठी सरपण आणणारे, गुरांना चरायला जंगलात गेलेले गुराखी आणि तेंदू पाने, मोहफुले इत्यादी गौण वनोपज गोळा करण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांचा वाघांच्या हल्ल्यात बळी गेला आहे. वनाला खेटून असणाऱ्या शेतांमध्ये काम करणाऱ्या शेतकरी / शेतमजूर यांचाही यात समावेश होतो.

संघर्ष कसा टाळता येईल? असे हल्ले होऊ नयेत, यासाठी वनाच्छादित गावांमधील कुटुंबांना शौचालय आणि स्वयंपाकाचा गॅस या सुविधा पुरवल्यास त्यांचे शौचासाठी आणि सरपणासाठी जंगलात जाणे थांबवता येऊ शकते. परिणामी वाघ – बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडण्याच्या घटना निश्चितपणे कमी होतील. या गावांतील गुरांना गोठ्यातच चारा पुरवल्यास, भाकड गुरांऐवजी दुभती गुरे दिल्यास गुराखी गुरे घेऊन चराईसाठी जंगलात जाणार नाहीत. गावांमधील युवकांना वन्यजीव पर्यटनासारख्या व्यवसायात रोजगार दिल्यास त्यांचे परिवार वनोपज गोळा करायला जंगलात जाणार नाहीत. वाघाचे साम्राज्य निर्माण झालेल्या गावाजवळच्या जंगलात आणि शेती क्षेत्रात काम करताना काय खबरदारी घ्यायची, पाळीव गुरांवर हल्ले झाल्यानंतर काय करायचे, याबद्दल या सर्व गावांची जनजागृती करणेही आवश्यक ठरते. याशिवाय, मागील काही वर्षांत जंगलांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर होऊ लागला आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ आला की मोबाइलमध्ये घंटी वाजेल, अशी यंत्रणा गावांशेजारच्या वन क्षेत्रात लावल्यास वन विभाग लोकांना सतर्कतेचा आगाऊ इशारा देऊ शकेल. अशी यंत्रणा व्याघ्र अधिवासांच्याजवळ लावल्यास दुर्घटना टाळता येऊ शकतात.

(लेखक सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक आहेत.)

(संपर्क – satpuda2001@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments