Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रलोककल्याणकारी: राज्यकारभाराचा आदर्श

लोककल्याणकारी: राज्यकारभाराचा आदर्श

[ad_1]

संजय सोनवणी11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

देश जोडण्याची स्वप्ने पाहत अहिल्यादेवींनी मंदिरे तर उभारलीच, पण रस्तेही बांधले, घाट-बारवांची निर्मिती करत एका अर्थाने राष्ट्रबांधणीचा पाया घातला. त्यांच्या या द्रष्टेपणाचा, उत्तुंग कार्याचा आदर्श ठेवला, तर खऱ्या अर्थाने स्त्री-स्वातंत्र्याचा आणि लोककल्याणकारी सुशासनाचा जागर होईल. काल (दि. ३१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी झाली. त्या औचित्याने त्यांच्या असामान्य व्यक्तित्वाचे आणि अद्वितीय कर्तृत्वाचे स्मरण…

“अठराव्या शतकातील जगातील सर्वोत्कृष्ट प्रशासिका” असा बहुमान ब्रिटिश पार्लमेंटने दिलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे हे ३०० वे जयंती वर्ष. नाना फडणवीस त्यांना ‘गंगा-जल निर्मळ’ असे संबोधत, तर टिपू सुलतानाने त्यांना “तत्त्वज्ञ महाराणी” हे बिरुद बहाल केले होते. खरे तर, अहिल्यादेवी या दुष्काळी भागातील एका धनगर कुटुंबातील साधी मुलगी. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर हेही तरुणपणी मेंढपाळ होते. स्वपराक्रमाने आणि मुत्सद्दीपणाचे गुण असल्याने त्यांनी आधी माळव्यावर हुकूमत निर्माण केली. त्यामुळे प्रभावित झालेल्या पहिल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना आपल्या सोबत घेत, ‘सुभेदार’ ही पदवी देऊन त्यांच्याकडे उत्तरेचा कारभार सोपवला. अहिल्यादेवी मल्हाररावांच्या स्नुषा बनल्या आणि वंचित-शोषित कुटुंबातून आलेल्या या स्त्रीने आपली कर्तबगारी आणि प्रजाहितकारी सुशासनाच्या जोरावर राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प पूर्ण केला.

महिला सबलीकरणाचा रचला पाया : भारतातील स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार करुन, त्याप्रमाणे पहिल्यांदाच प्रत्यक्ष कृती केली ती अहिल्यादेवींनी. ज्या काळात महिलांना गोषातच राहावे लागे, शिक्षणावर बंधने होती, त्याकाळी मल्हाररावांसारख्या खऱ्या पुरोगाम्याने त्यांना शिकवले. नुसते लिहिणे-वाचणेच नव्हे, तर भालाफेकीतही त्या तरबेज झाल्या. अहिल्यादेवी तेथेच थांबल्या नाहीत. त्यांनी अन्य महिलांनाही लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू केले. महिलांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी जगात निघालेले हे पहिले विद्यालय. त्या काळात देशभर संतती नसलेल्या विधवांची मालमत्ता सरकार दरबारी जमा करायचा कायदा होता. अहिल्यादेवींनी तो कायदा रद्द तर केलाच, पण विधवांना दत्तक घेण्याचीही कायदेशीर तरतूद केली. महेश्वरला वस्त्रोद्योगामध्ये आघाडीवर आणतानाच महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करुन आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे, तर जो तरुण माळव्यातील दरोडेखोरांचा उपद्रव नष्ट करेल, अशा कोणाही युवकाशी तिचा विवाह लावून देईन, असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते. महिला सबलीकरण म्हणजे काय, हे अहिल्यादेवींनी अठराव्या शतकात कृतीतून दाखवले.

स्त्रियांच्या जागतिक लढ्याच्या मानबिंदू : युरोपात एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रिया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्री-स्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या, तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना सर जॉन माल्कममुळे अहिल्यादेवी माहीत झाल्या. या महिलांसाठी हे नुसते आश्चर्यच नव्हते, तर त्यांनी अहिल्यादेवींमध्ये आपले आदर्श पाहिले. जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने तर अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. युरोपातील स्त्रियांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी या जागतिक स्त्री-स्वातंत्र्याच्या लढ्याचा मानबिंदू ठरल्या. तथापि, त्यांचा हा खरा आदर्श पुढच्या पिढ्यांच्या समोर आला नाही. तसे झाले असते, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेत भारतीय स्त्रिया आज अधिक आत्मसामर्थ्याने उभ्या राहिल्या असत्या. सहृदयी, संवेदनशील राज्यकर्ती : कोणाच्या हातून काही काढून घेतले, तर त्याला पर्यायही दिला पाहिजे, हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. त्या काळात डोंगराळ भागातील आदिवासी हे व्यापारी आणि यात्रेकरुंना लुटून उपजीविका चालवत. अहिल्यादेवींनी त्यांना पकडून शिक्षा न देता त्यांच्या गुन्ह्यांचे कारण शोधले आणि त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. व्यापारी आणि यात्रेकरुंकडून ‘भिलकवडी’ नावाचा कर घ्यायची परवानगी त्यांना दिली. एवढेच नव्हे, तर त्यांना कसायला जमिनीही दिल्या. आता भारतातील वंचितांचे असंख्य पारंपरिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले असले, तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याच पारंपरिक व्यवसायांमध्ये पोहोचले नाही, हे आपले आजचे दुर्दैव! अहिल्यादेवी मात्र नेहमी काळाच्या पुढे राहिल्या.

अलौकिक नैतिक अधिष्ठान : अहिल्यादेवींचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना आपला पती, माता-पित्याचे प्रेम देणारे सासू-सासरे, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवाचे मृत्यू डोळ्यासमोर पाहावे लागले. पण, त्यांनी व्यक्तिगत संकटांना आणि दु:खांना आपल्या कर्तव्यावर स्वार होऊ दिले नाही. मल्हाररावांनी त्यांना प्रशिक्षितच तसे केले होते. आपला पुत्र खंडेरावाचा कुंभेरी वेढ्यात लढताना मृत्यू झाल्यानंतर मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता त्यांनाच पुत्र मानून त्याचे स्थानही दिले. मल्हारराव हयात असताना त्यांना युद्धांत युद्धसामग्री पुरवणे, व्यापारी रस्ते मोकळे करणे यांसाठी अहिल्यादेवींना अनेक लढाया लढाव्या लागल्या. गादीवर आल्यानंतर त्यांनी रामपुऱ्याचा संस्थानिक चंद्रावताशीही युद्ध केले. मुस्लिम राजवटी असतानाही त्यांच्या प्रदेशात सोमनाथ, अयोध्या, वाराणशी आदी तीर्थस्थळी मंदिरे बांधली. पण, कोणाही मुस्लिम शासकाने त्यांना विरोध केला नाही, एवढे नैतिक अधिष्ठान अहिल्यादेवींनी प्राप्त केले होते.

देश जोडण्याची स्वप्ने पाहत अहिल्यादेवींनी मंदिरे तर उभारलीच, पण रस्तेही बांधले, घाट-बारवांची निर्मिती करत एका अर्थाने राष्ट्रबांधणीचा पाया घातला. कोणीही आपल्या राज्याच्या बाहेर काही पाहात नव्हते, असा तो काळ होता, हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या तमाम महिला आणि राज्यकर्त्यांसह आपण साऱ्यांनी अहिल्यादेवींच्या या द्रष्टेपणाचा, उत्तुंग कार्याचा आदर्श ठेवला पाहिजे. तसे झाले तरच खऱ्या अर्थाने स्त्री-स्वातंत्र्याचा आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा जागर होईल!

अभिवादन संजय सोनवणी sanjaysonawani@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments