Wednesday, September 16, 2026
HomeफलटणMKCLच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.च्या २५ वर्षांच्या प्रवासाची...

MKCLच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.च्या २५ वर्षांच्या प्रवासाची राष्ट्रीय पातळीवर दखल

‘संगणक साक्षरतेकडून सार्थकतेकडे’ या ऐतिहासिक ग्रंथात संस्थेच्या संघर्षमय व यशस्वी वाटचालीचा गौरव

प्रतिनिधी : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MKCL) रौप्य महोत्सवी सांगता समारंभात ‘संगणक साक्षरतेकडून सार्थकतेकडे’ या ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथामध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.च्या गेल्या २५ वर्षांच्या संघर्षमय, सातत्यपूर्ण आणि यशस्वी प्रवासाची नोंद करण्यात आली आहे. संस्थेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे हा संस्थेसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

या विशेष सोहळ्यास भारतातील संगणक क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक आ. विवेक सावंत तसेच एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आ. समीर पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या २५ वर्षांच्या काळात डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.ने शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचविण्याच्या उद्देशाने सातत्याने काम केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतानाच त्यांना ‘Learning कडून Earning कडे’ घेऊन जाण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला.

डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ते सक्षम व्हावेत, यासाठी संस्थेने विविध उपक्रम राबविले. या प्रवासात एमकेसीएलच्या दूरदर्शी विचारसरणीचे आणि मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास, प्रेम व सहकार्य हे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले. तसेच संस्थेच्या कार्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानामुळे हा प्रवास अधिक व्यापक आणि यशस्वी झाला असल्याचे नमूद करण्यात आले.

‘संगणक साक्षरतेकडून सार्थकतेकडे’ या ग्रंथात संस्थेच्या कार्याची दखल घेतली गेल्याने डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.च्या २५ वर्षांच्या वाटचालीला एक वेगळी राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. या गौरवामुळे संस्थेच्या पुढील वाटचालीस नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देत त्यांचे भविष्य घडविण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या सन्मानाबद्दल डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.च्या वतीने एमकेसीएलचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. संस्थेवर दाखविलेला विश्वास आणि २५ वर्षांच्या संघर्षमय प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही ओळख पुढील कार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments