Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: शाश्वत शेतीच्या दिशेने...

रसिक स्पेशल: शाश्वत शेतीच्या दिशेने…

[ad_1]

डॉ. नागेश टेकाळे12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेली १०९ संकरित वाणे केवळ बांधापर्यंतच नव्हे, तर शेतांमध्ये नेण्याची जबाबदारी आता राज्यांच्या कृषी विभागाबरोबरच कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांवर आहे. त्यांनी ती व्यवस्थितपणे पार पाडली तर कृषी विज्ञानाच्या शाश्वत प्रकाशात देशातील शेतकरी आणि सामान्य लोकांचे आयुष्य उजळून निघेल.

गेल्या रविवारी, ११ ऑगस्टला देशातील शेतजमिनीवर श्रावणसरींच्या साथीने खरीप पिकांचा सृजनोत्सव सुरू असताना, दिल्लीत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) विकसित केलेल्या शेत आणि बागायती पिकांच्या १०९ जातींचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण झाले. देशभरातील कृषी शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा फक्त ही वाणे देशाला अर्पण करण्याचा नव्हता, तर पंतप्रधानांनी उद्घाटनानंतर प्रत्यक्ष प्रायोगिक शेतावर जाऊन या सर्व वाणांची पाहणी केली आणि तेथे उपस्थित शेकडो शेतकऱ्यांशी संवाद साधला. जगातील जवळपास निम्म्या देशांना दररोज ताजा भाजीपाला आणि फळे पोहचवणाऱ्या चिमुकल्या इस्त्रायलमध्येही नेमके असेच घडते. अशा प्रकारचा एक प्रयोग मी अमेरिकेच्या टेक्सास कृषी विद्यापीठात पाहिला होता. शेतकऱ्यांशी संवाद साधणारे असे कृषी तंत्रज्ञान विकसित राष्ट्रांच्या भूमीवरुन आता आपल्याकडेही येत आहे, हा एक चांगला संकेत मानला पाहिजे.

उत्पादन अन् उत्पन्नवाढीची हमी
या सर्व विकसित जातींचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना पूर्ण वाढीसाठी लागणारे कमी पाणी, वाढती उत्पादन क्षमता, हवामान बदलाचे परिणाम सहन करण्याची शक्ती आणि शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळण्याची हमी. तब्बल ६१ वेगवेगळ्या पिकांच्या या १०९ संकरित जातींमध्ये ३४ शेतपिके आणि २७ बागायती पिके समाविष्ट आहेत. या विकसित जातींमधील ६९ शेतपिकांमध्ये २३ प्रकारची तृणधान्ये, ११ प्रकारची कडधान्ये, तेलबियांची ७, कापसाची ५, चारा पिकांची ७ आणि उसाची ४ वाणे आहेत. तर, ४० बागायती पिकामध्ये आंबा, डाळिंब, पेरु, टोमॅटो, खरबूज, कलिंगड, बटाटा यांचा समावेश आहे. फुलांच्या विकसित जातींमध्ये झेंडू, निशिगंध, अबोली याबरोबरच खाजकुयरी, अश्वगंधा आणि मंडुकपर्णी या औषधी वनस्पतीही आहेत.

प्रतिकूलतेवर मात करणारे संशोधन
भारत हा भात उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. प. बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र, पंजाब आणि तमिळनाडू यात आघाडीवर आहेत. असे असूनही दरवर्षी मुसळधार पावसामुळे जवळपास निम्मे भात पीक वाहून जाते. त्यामुळे तिथे पुन्हा लावणी करावी लागते. त्यातही महाराष्ट्रात कोकण, ओरिसा, प. बंगाल आणि आंध्रमध्ये समुद्राच्या आत खोलवर येणाऱ्या पाण्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचे भात उत्पादन कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी आता समुद्रकिनारे, अतिपावसाचा भूप्रदेश, खारट जमिनी यांवरही शाश्वत उत्पादन देणारी भाताची तब्बल ९ वाणे विकसित केली आहेत. जेमतेम चार महिन्यांत कापणीला येणाऱ्या या जाती हेक्टरी ४४ क्विंटलपर्यंत उत्पादन देवू शकतात. ‘पुसा सरबती’ ही गव्हाची जात खास महाराष्ट्र आणि कर्नाटकची सध्याची भौगोलिक परिस्थिती आणि बदलते वातावरण पाहून विकसित केली आहे, जी ३३ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देऊ शकते आणि ते सुद्धा ११० दिवसांतच. विशेष म्हणजे, ही वाणे रोगप्रतिबंधक आहेत.

तेल उत्पादनातून स्वावलंबन
भारतीय कृषी संशोधन संस्थेने (पुसा) विकसित केलेल्या मक्याच्या सहा सुधारित जातींचे महत्त्व येथे जास्त अधोरेखित होते. भारत येत्या दशकात कच्च्या तेलाची कमीत कमी आयात करण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील मका पिकाच्या उत्पादनातून इथेनॉल निर्मिती करुन, त्याचे खनिज तेलात २० टक्के मिश्रण करुन इथेनॉल उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचा देशाचा प्रयत्न आहे. मक्याच्या या सर्व सुधारित जातींमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी पाणी आणि खते वापरुन जेमतेम ११० दिवसांत ७० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते. महाराष्ट्रातील; विशेषत: विदर्भातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन या सध्याच्या अशाश्वत पीक पद्धतीला थोडे बाजूला ठेवून हमखास उत्पन्न देऊ शकणाऱ्या या सुधारित मका वाणांचा पर्याय निवडण्याची गरज आहे. त्याचवेळी, या संशोधनातील करडईच्या दोन वाणांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आजही महाराष्ट्र आणि कर्नाटकात जवळपास १५ टक्के रब्बीचे क्षेत्र करडई पिकाला दिले जाते. पोषक थंडीत या पिकाची चांगली वाढ होते. मात्र, मावा रोग करडईचा शत्रू आहे. शास्त्रज्ञांनी नव्याने तयार केलेल्या या दोन जाती रोगप्रतिबंधित तर आहेतच; शिवाय त्या जेमतेम १२० दिवसांत हेक्टरी १७ क्विंटल उत्पादन देऊन तेलाचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत ठेवतात. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी येत्या रब्बीसाठी करडईच्या या सुधारित वाणांकडे लक्ष ठेवायला हवे. सध्या शहरी लोकांचा करडईच्या तेलाकडे; त्यातही लाकडी घाण्याच्या तेलाकडे अधिक कल आहे. त्यामुळे गटशेतीच्या माध्यमातून या सुधारित वाणांची शेती करुन, गावपातळीवरच तेल निर्मितीचा कुटिरोद्योग सुरू केला आणि गावाचा स्वत:चा ब्रँड तयार केला, तर ही मोठी यशोगाथा होऊ शकते.

मसाला, फळ-फुलपिकांतून सुबत्ता
या सुधारित वाणांमध्ये अनेक भरड धान्ये, तूर , मसूर, वाटाणा, मूग, उडीद यांचाही समावेश आहे. आपल्याकडे अनेक शेतकरी खरिपामध्ये मूग, उडीद करतात. पण, शेतात पाणी साठणे, कीड पडणे यामुळे त्यांचे उत्पादन कमी होते. ही सर्व नवीन वाणे रोगप्रतिबंधक असून, शेतात साठलेल्या पाण्यातही ती ताठ उभी राहतात. काही वाणे पावसाचा दीर्घ ताणही सहन करू शकतात. या वाणांमध्ये यावेळी प्रथमच ४० बागायती पिके आहेत. त्यामध्ये अंबिका आणि अरुणिका या आंब्याच्या नवीन जातीही आहेत. केशर आंब्याला काही ठिकाणी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. आणखी एक विशेष म्हणजे, या नवीन वाणांमध्ये जायफळ, लहान वेलची, बडिशेप, ओवा आणि आंबेहळद यांचाही समावेश आहे. ही सगळी निर्यातक्षम मसाला पिके आहेत. अनेक शेतकरी; विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात झेंडू, निशिगंध लागवडीत विशेष रस घेतात. शेतकऱ्यांनी झेंडूच्या ‘पुसा बहार’ आणि निशिगंधाच्या ‘वैभव’ या वाणांकडे विशेष लक्ष द्यावे. टिकवण क्षमता, आकर्षक लाल रंग आणि वजन असलेल्या टोमॅटोच्या पुसा शक्ती आणि पुसा हायब्रीड ६ ही दोन वाणेही महत्त्वाची आहेत.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेली ही संकरित शेत आणि बागायती पिके शेतकऱ्यांच्या फक्त बांधावरच नव्हे, तर प्रत्यक्ष त्यांच्या शेतात नेण्याची मोठी जबाबदारी आता राज्यांच्या कृषी विभागाबरोबरच कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांवर आहे. ‘पुसा’च्या प्रयोगशाळेत तयार झालेली ही सर्व १०९ वाणे प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्याच्या शेतात नीट पोहोचवली, तर कृषी विज्ञानाच्या शाश्वत प्रकाशात देशातील शेतकरी आणि सामान्य लोकांचे आयुष्य उजळून निघेल.

हवामान बदलाशी दोन हात
हमखास आणि भरघोस उत्पादन, रासायनिक खते आणि पाण्याची कमीत कमी गरज, हवामान बदलामुळे सतत येणारे ताण सहन करण्याची क्षमता आणि जेमतेम तीन ते चार महिन्यांत (ऊस, फळपिके वगळता) उत्पादन ही या सर्व सुधारित वाणांच्या विकसनामागची प्रमुख उद्दिष्टे आहेत. रासायनिक खतांची सबसिडी कमी करुन शासनाचा आर्थिक भार शिथिल करतानाच, शेती आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक सक्षम बनवणे, हाही यामागचा उद्देश असल्याचे दिसते.

(संपर्कः nstekale@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments