Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रदेश - परदेश: अमृतकाळातील ‘आदर्श’ गाव!

देश – परदेश: अमृतकाळातील ‘आदर्श’ गाव!

देश – परदेश:  अमृतकाळातील ‘आदर्श’ गाव!

[ad_1]

ज्ञानेश्वर मुळे9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकीकडे आपल्या गावात आर्थिक प्रगती आणि वाढते बकालपण असे विरोधाभासी चित्र दिसते, तर दुसरीकडे नागालँडमधील खोनोमा तसेच ओडिशातील कालराबंक अशा गावांत कमालीच्या स्वच्छता – सुविधांचे दर्शन घडते. तिथे श्रीमंतीचा झगमगाट नाही, पण गरिबीचे दर्शनही नाही. दृष्ट लागावी अशी ही गावे आहेत!

दिल्लीत असलो तरी मी अगदी नियमितपणे माझ्या गावाची वारी करतो. अगदी एखादा महिना चुकला तरी पुढच्या महिन्यात जातो. वर्षातून सात – आठ तरी भेटी निश्चितच होतात. माझी ऊर्जा अक्षय ठेवण्यात गावाच्या या भेटी फार मोठी भूमिका निभावतात. मी उल्हसित होऊन दिल्लीच्या प्रदूषित वातावरणाचा सामना करायला परत येतो. या नियमित भेटींमुळे गावात होणारे सूक्ष्म आणि स्थूल असे दोन्ही बदल माझ्या नजरेतून सुटत नाहीत.

गांधीजींनी ‘गावाकडे चला’ अशी घोषणा दिली, मात्र गेल्या पंचाहत्तर वर्षांत शहरांकडे जाणारे लोंढे थांबले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील माझ्या गावाबद्दल बोलायचे तर विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत आमच्या भागातील गावे संपन्न आहेत. माझ्या गावाची आर्थिक प्रगती वाखाणण्यासारखी आहे. सहकारी (आणि आता खासगी) साखर कारखाने, मुबलक पाणी यांच्या बळावर शेतकऱ्यांच्या खिशात बऱ्यापैकी पैसा आहे. गावात शाळा – कॉलेज आहेतच; पण अनेक मुलं – मुली शेजारच्या इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली शहरातही शिकायला जातात. गावातील पन्नासच्या वर युवक सैन्यात आहेत आणि ७०० ते ८०० युवक – युवती देशात व देशाबाहेर अधिकारपदावर आहेत. प्रत्येक घरापुढे चारचाकी नसेल, पण दुचाकी नक्की दिसेल. चारचाकी वाहनांप्रमाणेच ट्रक – ट्रॅक्टर, रिक्षा, स्कूल बस यांचीही रेलचेल आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर अनेकदा छोटी – मोठी वाहतूक कोंडीही होते. कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनही घरोघरी पोहोचले आहेत. उत्तम प्रकारे सहकारी संस्था चालवल्या जात आहेत. साक्षरतेचे प्रमाणही ९५ ते ९७ टक्के असावे. या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. सर्वांनाच अभिमान वाटावा अशी ही प्रगती आहे.

पण, याचा अर्थ सगळे आलबेल आणि अभिमानास्पद आहे, अशातला भाग नाही. गावात प्रवेश करण्याच्या थोडे आधी एक छोटा ओढा आहे. तिथे पूर्वी पाणी प्रवाहित असायचं आणि पावसाळ्यात वरच्या बाजूला छोटे मासेही दिसायचे. आता तिथे प्लॅस्टिकच्या बाटल्या, कोकचे कॅन, टाकाऊ वस्तू, जुन्या गाद्या अशा गोष्टींनी हा भाग व्यापलेला दिसतो. गेल्या दोन वर्षांत त्यामध्ये भरच पडली आहे. जातपात पूर्वीही होती, आता शिक्षण घेऊनही गावातल्या संस्था जातवार विभागताना दिसतात. प्रत्येक निवडणुकीत जात आणि पैसा याच कसोट्या जुने आणि नवे, युवा नेते वापरतात. ग्रामपंचायतीतही भ्रष्टाचार घुसल्याची चर्चा असून, राजकारणातील स्पर्धात्मकता टोकाला पोहोचली आहे. नदीच्या प्रदूषणाचे रडगाणे गेली दोन – तीन दशके तसेच आहे. आणि नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आताही नाक धरुनच जावे लागते. ‘हागणदारीमुक्त’ अशा गावात संडासमध्ये पाणी नसणे आणि सुरक्षित दरवाजे नसणे ही समस्या आहे. अधूनमधून स्वच्छ करण्याचे प्रयत्न करुनही गावतलावातील जलपर्णी वाढतेच आहे आणि ते पाणी पिण्याोग्यही नाही. प्रत्येक घरात नळाचे पाणी आहे, तरी जमिनीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पोटाचे विकार बळावले आहेतच; शिवाय आमचा सगळा तालुकाच कॅन्सरच्या रुग्णसंख्येत अग्रस्थानी पोहोचला आहे. आमच्या युवकांना आजूबाजूच्या भागात लग्नासाठी जोडीदार मिळत नाही, पण पैसे देऊन सुदूर प्रांतांतून मुली आणल्या जातात. एरवी कट्टर जातिवाद पाळणारे गावकरी अशावेळी मात्र जातपात बघत नाहीत. गावाच्या बाहेर असलेल्या कचरा डेपोतील अस्ताव्यस्त पसरलेला कचरा जणू गााच्या भविष्याविषयी सावधानीचा इशारा देतो आहे.

या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये मी दोन आदर्श गावे पाहिली. त्यांच्याविषयी लिहिणे आवश्यक आहे. नागालँडची राजधानी कोहिमा या शहरापासून केवळ काही अंतरावर असलेल्या खोनोमा नावाच्या गावाला आशियातील सर्वांत स्वच्छ गाव मानले जाते. डोंगराच्या कुशीतील हे गाव स्वच्छ तर आहेच; पण प्रत्येक घरासमोर सुंदर हिरवळ, बाग, फुलझाडे बहरलेली दिसतात. पारंपरिक घरे, शेती, शाळा, वन संरक्षण अशा सर्वच बाबतीत मन मोहवून टाकणारे हे गाव आहे. मी पाहिलेले दुसरे गाव ओडिशाच्या राजधानीपासून सव्वा तासाच्या अंतरावरचे कालराबंक. या गावाला अनेक जण आदर्श गाव तर मानतातच, पण हे देशातील पहिले ‘स्मार्ट गाव’ मानले जाते. निसर्गरम्य परिसरातील या गावात १०० टक्के साक्षरता आहेच; शिवाय गावात उत्तम प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. सर्व ग्रामस्थांकडे आरोग्य विमा आहे. ओडिया आणि इंग्रजी माध्यमातील उत्तम शाळा, पोलिस चौकी, पोस्ट ऑफिस, मोफत वाय फाय, पथदिवे, हागणदारीमुक्त परिसर, पाण्यासाठीचा कृत्रिम तलाव आणि युवकांना नोकरीची उपलब्धता ही या गावाची काही वैशिष्ट्ये. मी भेट दिली तेव्हा तिथला शंभर खाटांचा दवाखाना तयार होत आलेला दिसला. विशेष म्हणजे, हे स्वप्न अच्युत सामंत आणि त्यांची बहीण इतिराणी सामंत या भावंडाच्या प्रयत्नाने साकार झाले आहे. या गावात श्रीमंतीचा झगमगाट नाही, पण गरिबीचे दर्शनही नाही. खोनोमा असो की कालराबंक; दृष्ट लागावी अशी ही गावे आहेत!

(संपर्कः dmulay58@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments