Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रमाढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांसाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जोरदार पाठपुरावा

माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांसाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जोरदार पाठपुरावा

पुणे : प्रतिनिधी — पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक आज पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पार पडली. या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्नांचा जोरदार पाठपुरावा केला. प्रवाशांच्या सुविधा, नवीन रेल्वे स्थानके, रखडलेले प्रकल्प, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कार्गो टर्मिनल आणि नवीन रेल्वे सेवांच्या विस्तारासंदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या.

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सेवा सुरू करावी, तसेच पंढरपूर-देहू मेमू सेवा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पंढरपूर-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न तातडीने सोडवून प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणीही मोहिते-पाटील यांनी केली.

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे GCT कार्गो टर्मिनल सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. शेतकरी आणि कृषी मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची असलेली बंद किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.

याशिवाय लातूर-कुडूवाडी-सोलापूर तसेच मिरज-कुडूवाडी-दौंड कॉर्ड लाईन प्रकल्पांना गती देण्याची मागणी करण्यात आली. मिरज-कुडूवाडी-लातूर रोड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासह आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली.

माढा व जेऊर रेल्वे स्थानकांवर हुतात्मा, उद्यान, कोईमतूर-मुंबई आणि पनवेल-नांदेड एक्सप्रेसला थांबा देण्याचा मुद्दाही रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात आला. तसेच माढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांतील जवळा, बामणी, बाभुळगाव, म्हैसगाव आणि लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या स्थानकांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.

रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन पाइपलाइन क्रॉसिंगचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नियोजनपूर्वक योग्य उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच कुडूवाडी-पंढरपूर जुन्या मीटरगेज रेल्वेमार्गालगत उपलब्ध असलेल्या रिक्त जागेचा विकासकामांसाठी उपयोग करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.

फलटण-लोणंद-पुणे रेल्वेमार्गावरील सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत करून रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्याची मागणीही खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.

माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सुविधांचा विस्तार, प्रवाशांच्या प्रलंबित मागण्या आणि रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी बैठकीत विविध मुद्द्यांचा सविस्तर पाठपुरावा करण्यात आला.

या बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक कुश किशोर मिश्रा, पुणे मंडल व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, सोलापूर मंडल व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments