फलटणमध्ये पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
फलटण : प्रतिनिधी — फलटण शहर परिसरात विनानंबरच्या दुचाकीवरून पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन तरुणांना फलटण शहर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत कारतूस आणि विनानंबर युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण १ लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा सापळा
दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विनानंबरच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून दोन तरुण पिस्तूल विक्रीसाठी फलटण शहरात आले आहेत.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी डी.बी. पथकाला सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, फलटण शाखेजवळ सापळा रचला. संशयित दुचाकी आढळताच पोलिसांनी ती थांबवून दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले.
कमरेला खोचलेले पिस्तूल अन् जिवंत कारतूस
दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. तसेच पिस्तुलाच्या मॅगझिनमध्ये एक जिवंत कारतूस असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी शस्त्र व कारतूस तात्काळ जप्त करून दोन्ही संशयितांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जय दयानंद मागाडे (वय २०, रा. आंबेडकरनगर, साखरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) आणि प्रदीप संतोष गोरे (वय २२, रा. खामगाव रोड, साखरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी आहेत.
१ लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, २०० रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस आणि १ लाख १५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची विनानंबर युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण १ लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०३/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे, सपोनि एस. व्ही. शिंदे तसेच डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाळे, मुकेश घोरपडे, जितेंद्र टिके आणि अतुल बडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.
