Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: राहत इंदोरींनी सिनेमासाठी दिला होता नकार, सिनेगीतांच्या मोबदल्यापेक्षा...

माझ्या हिश्श्याचे किस्से: राहत इंदोरींनी सिनेमासाठी दिला होता नकार, सिनेगीतांच्या मोबदल्यापेक्षा मुशायऱ्यांमधून करायचे जास्त कमाई

[ad_1]

रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमधील गीतकार आणि शायरांच्या या मालिकेत आज एका अशा गीतकाराविषयी बोलू ज्यांच्या शायरीने देश-विदेशातील मुशायरे तर गाजवलेच; पण हिंदी सिनेमातील त्यांच्या गाण्यांमध्येही कसदार शायरी ऐकायला मिळायची. हे शायर – गीतकार म्हणजे राहत इंदोरी.

मला अजूनही आठवतेय. ही साधारण १९७० च्या दशकाअखेरची गोष्ट असेल. भोपाळच्या रवींद्र भवनमध्ये ऑल इंडिया रेडिओने एक मुशायरा आयोजित केला होता. मी त्याला उपस्थित होतो. मुशायऱ्यात उद्घोषणा झाली.. ‘अब आपके सामने तशरीफ़ ला रहे हैं इंदौर से आये एक नौजवान शायर जनाब राहत इंदोरी..’ राहत भाई माइकसमोर आले आणि त्यांना पाहून सभागृहातले काही लोक हसले. राहत भाई म्हणाले, ‘लोकहो, माझ्याकडे नको, माझ्या शायरीकडे पाहा. आणि माझा दावा आहे की, माझ्या रचना ऐकल्यावर तुमच्यासमोर उभ्या असलेल्या या राहत इंदोरीबद्दल तुम्हाला प्रेम वाटले नाही, तर मी शायरी सोडून देईन. मी त्या सायंकाळच्या मैफिलीचा साक्षीदार आहे, त्यांनी आपल्या रचना सादर करायला सुरूवात केली आणि अक्षरश: मुशायरा गाजवला. सगळे ‘वाह, वाह’ करत होते. जे त्यांच्यावर हसले होते, ते खजील झाले. या गोष्टीवरुन मला राहत इंदोरी यांचाच एक शेर आठवतोय…

अभी गनीमत है सब्र मेरा,

अभी लबालब भरा नहीं हूँ,

वो मुझको मुर्दा समझ रहा है,

उससे कहो मैं मरा नहीं हूँ।

ही गोष्ट २००२ किंवा २००३ ची असावी. माझ्या एका सिनेमाचे काम सुरू होणार होते. त्याची कहाणी लिहितानाच आम्ही ठरवले होते की अानंद बक्षीजींकडून गाणी लिहून घ्यायची. पण, हे नियोजन सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे कुणाकडून गाणी लिहून घ्यायची, असा विचार सुरू असताना, राहत इंदोरी साहेबांना घ्यावे, असे सर्वांनी ठरवले. त्यामुळे मी राहत भाईंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते हाती लागत नव्हते. बाहेर आहेत, मुशायऱ्याला गेले आहेत, हेच प्रत्येक वेळी सांगितले जायचे. महिनाभरानंतर माझे राहत भाईंशी बोलणे होऊ शकले. तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनच बोलेन, असे मी त्यांना म्हणालो. ते माझ्याकडे आले. मी विचार केला की, तुमच्याकडून गाणी हवी आहेत, असे सांगितल्यावर ते खूप खुश होतील. मी त्यांना तसे सांगितले. ते म्हणाले, ‘रूमी भाई, तुम्हाला माझ्याविषयी माहीत नसावं. मी सिनेमाची गाणी लिहिणं बंद केलं आहे. आता मी गाणी लिहीत नाही.’

मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, ‘काय सांगता?’ त्यावर राहत भाईंनी सांगितले की, मी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’साठी शेवटचे लिहिले, त्यानंतर आता लिहीत नाही. मी विस्मयाने पुन्हा विचारलं की, तुम्ही सिनेमांसाठी गाणी लिहिणार नाही तर मग पैसाअडका – खर्चपाण्याचं काय..? हे एेकून ते खूप हसले. म्हणाले, ‘रूमी मियां, तुम्ही सिनेमावाले मला काय पैसे देणार? इथल्यापेक्षा मी खूप जास्त कमावतो.’ आता पूर्वीसारखे फारसे मुशायरेही होत नसावेत, असं मला वाटलं. म्हणून मी ‘कसं काय?’ असं विचारलं. ते म्हणाले, मी मुशायऱ्यांतून किती कमावतो, हे तुम्हाला माहीत आहे का? मी ‘नाही’ म्हणालो. त्यांनी सांगितलं की, मी अमेरिकेची एक टूर करतो. तिथे माझे मानधन ठरलेले असते. मी शनिवार-रविवारी मुशायरे करतो आणि आठवड्यांतील इतर दिवशी तिथले लोक मला स्नेहभोजनासाठी बोलावतात, भेटवस्तू देतात, कधी कधी लिफाफेही देतात. मी एकदम खुश आहे, सन्मानाने जगभरात फिरतो आहे.

मी विचारलं, पण गाणी न लिहिण्याचा निर्णय तुम्ही अचानक कसा घेतला? मुशायऱ्यांसोबत गाणीही लिहित राहिला असतात.. त्यावर राहत भाई म्हणाले की, एका खूप मोठ्या निर्माता-दिग्दर्शकाने माझ्या गाण्याचा तिसरा मुखडा रिजेक्ट केला, तेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडताना मी एक शेर ऐकवला होता.. बहुत मुश्किल है ग़ज़लों की रोटियाँ खाना, बेहरे को भी शेर सुनाना पड़ता है.. त्या दिवसापासून सिनेमासाठी गाणी लिहायची नाहीत, असे मी ठरवले.

एवढं सांगून राहत भाई परत गेले. दरम्यान असेच काही दिवस निघून गेले. २०११ मध्ये मी पुन्हा त्यांना फोन केला आणि मला काही बोलायचंय, कृपया माझ्या घरी या, असे सांगितले. राहत भाई माझ्याकडे आले. त्यांना म्हणालो की, मी ‘गली गली चोर है’ नावाचा एक सिनेमा सुरू करतोय. त्याचे लेखन आणि दिग्दर्शनही मीच करणार आहे. हा सिनेमा भ्रष्टाचारावर आहे. तुम्ही नेहमी व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात लिहून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करता, त्यामुळे या कथेसाठी गाणेही तुम्हालाच लिहावे लागेल. हे एेकून माझ्या प्रेमाखातर त्यांनी होकार दिला. वास्तविक हे खरे आहे की, सरकार कोणत्याही पक्षाचे असो; ते व्यवस्था आणि सरकारच्या विरोधात लिहीत राहायचे, त्यामुळे त्यांना देशाचा कोणताही नागरी सन्मान किंवा पद्म पुरस्कार मिळाला नाही. पण, त्यांना या गोष्टीचा खेद वा खंत नव्हती. त्यांनी खरा पुरस्कार देशातील जनतेची मने जिंकून मिळवला होता. त्यामुळे लोक आजही त्यांचा आणि त्यांच्या लेखनाचा सन्मान करतात. आज राहत इंदोरी साहेब आपल्यात नाहीत. त्यांचे पुत्र सतलज राहत इंदोरी हेही उत्तम युवा शायर आहेत आणि तेही वडिलांप्रमाणे मैफिली गाजवत आहेत.

आज राहत इंदोरीजींच्या आठवणीत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील त्यांनी लिहिलेले हे गाणे ऐका, पाहा आणि चांगला, मोठा शायर एखादे आयटम साँग लिहितो, तेव्हा त्यातही किती खोल अर्थ दडलेला असतो, याचा अनुभव घ्या.

देख लें,

आँखों में आँखें डाल

सीख लें,

हर पल में जीना यार…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments