Saturday, October 10, 2026
Homeफलटणकोळकीच्या सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळचा फलटणमध्ये होणार भव्य नागरी गौरव!

कोळकीच्या सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळचा फलटणमध्ये होणार भव्य नागरी गौरव!

भारतीय महिला हॉकी संघाच्या ऐतिहासिक सुवर्णयशात मोलाचे योगदान; १२ ऑक्टोबरला मुधोजी हायस्कूलच्या प्रांगणात सन्मान सोहळा, दुपारी ३.३० वाजता शहरातून निघणार भव्य मिरवणूक

फलटण प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदकाची कमाई करत देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावला. या ऐतिहासिक कामगिरीत उल्लेखनीय योगदान देणारी फलटण तालुक्यातील कोळकी येथील कन्या कु. ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिच्या यशाचा गौरव करण्यासाठी फलटणमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या कर्तृत्वाने देशाच्या क्रीडाक्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या ऋतुजाच्या स्वागतासाठी फलटणनगरी सज्ज होत आहे.

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी हा गौरव सोहळा पार पडणार असून, दुपारी ३.३० वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून ऋतुजा पिसाळ हिची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीतून शहरवासीयांना आपल्या लाडक्या क्रीडाकन्येचे स्वागत आणि अभिनंदन करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण येथील प्रांगणात तिचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे मा .सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोळकीपासून आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंतचा अभिमानास्पद प्रवास!

ग्रामीण भागातील मुलींमध्येही जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे, हे ऋतुजा पिसाळ हिच्या यशाने अधोरेखित केले आहे. तिच्या कामगिरीमुळे फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, स्थानिक क्रीडापटू आणि विशेषतः हॉकी खेळणाऱ्या मुलींना तिच्या यशातून नवी प्रेरणा मिळणार आहे. तिचा गौरव म्हणजे मेहनत, जिद्द, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीच्या ध्यासाचा सन्मान ठरणार आहे.

फलटणच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण असलेल्या या सोहळ्याला तालुक्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, नागरिक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण तालुका क्रीडा समिती व महात्मा शिक्षक संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments