Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका...: दर्द !

गोष्ट सांगतो ऐका…: दर्द !

[ad_1]

अरविंद जगताप10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अचानक सदाचं लक्ष गेलं. त्या तरुणीने सदाकडं बघून ओठावर बोट ठेवलं. अंगठ्याच्या बाजूचं बोट. त्या बोटातली ती नाजूक अंगठी. एक क्षण फक्त.. ती पुन्हा नाचू लागली…

सदाचे सगळे मित्र कलाकेंद्रात जायचे. सदाला मात्र ते कधी आवडायचं नाही. मुळात सदा उपशास्त्रीय गाणं शिकलेला. मित्रांच्या वाढदिवसाला, नातेवाईकांच्या घरगुती कार्यक्रमाला हमखास भावगीतं म्हणायचा. सदाची दोन-चार गाणी झाली नाहीत, असा सोहळा त्याच्या खानदानात पार पडला नाही. नोकरीमुळे सदाला गाण्यात करिअर करता आलं नाही, याचं दु:ख सदापेक्षा नातेवाईकांना जास्त आहे. कारण आता सदाची गाणी त्यांनाच ऐकावी लागतात. सदा नोकरी एके नोकरीवाला माणूस आहे. संध्याकाळी कुणी गाणी म्हणायला बोलावलं तर जातो. पण, मित्र गाणी ऐकायला कलाकेंद्रात जातात, हे त्याला आवडत नाही. त्याने मित्रांना खूप वेळा समजावून सांगितलं. ‘पैशांची उधळपट्टी का करता?’ वगैरे उपदेश केले. पण, मित्र त्याला कायम एकच सांगतात.. ‘तू लावणी म्हण, आम्ही ऐकू.’ सदाला मात्र लावणी म्हणायची काही इच्छा होत नाही. त्याला काही खास कारण नाही. पण, त्याला लावणी आवडत नाही. त्याचे मित्र म्हणतात, ‘रुपेरी वाळूत, माडाच्या बनात..’ ही लावणीच आहे. पण, सदाला ते मान्य नाही.

मित्रांशी तो फार वाद घालत नाही. कारण मित्रांना गाण्यातलं काही कळत नाही, यावर तो ठाम आहे. मनातल्या मनात मात्र सदा कायम उदास असतो. आपल्या मित्रांनी गेल्या काही वर्षांत हजारो रुपये लावणी ऐकायला उधळलेत. अगदी लग्नात घोड्यासमोर नाचणाऱ्या लोकांनाही शेकडो रुपये वाटलेत. पण, आजपर्यंत कधी कुठल्या मित्राने त्याच्या गाण्याला दाद म्हणून दहा रुपयाची नोट दिली नाही. खरं तर यात मित्रांचा दोष नव्हता. सदाचा आवाज काही फार भारी नव्हता. त्यात जुनाट गाणी म्हणून सदा डोकं उठवायचा. आणि आणखी वैताग म्हणजे, सदा गाणं म्हणताना जे काही तोंड वेडवाकडं करायचा, त्यामुळं सदाला आवरायचं का हसू आवरायचं? हा प्रश्न ऐकणाऱ्याला पडायचा. पण, सदाने कधीच आपल्यावरची टीका मनावर घेतली नाही. तो गात राहिला.

सदा नेहमीसारखा मित्रांना चहासाठी भेटला. श्रावण सुरू होणार असल्याने ‘गटारी’ साजरी करण्याविषयी सगळ्यांची चर्चा चालू होती. सदा वर्षातून फक्त गटारीच्या दिवशी दारू पितो. मित्र असतातच. गटारीची सगळ्यात जास्त वाट पाहतो तो सदा. कारण त्या दिवशी तो वर्षभराची सगळी भडास काढतो. बेभान होतो. आणि बिनधास्त असतो, कारण सगळे जवळचेच मित्र असतात. यावर्षी पण त्याने असे बरेच मनसुबे रचले होते. ओळखीच्या मित्राचं फार्म हाऊस सांगून ठेवलं होतं. सगळ्यांनी मिळून पैसे टाकले, तर फार खर्च येणार नव्हता. पण, अचानक मित्रांनी सांगितलं की, यावर्षी गटारीला सगळे कलाकेंद्रात जाणार आहेत. सदा निराश झाला. मित्र आपला विचार न करता परस्पर योजना कशी काय बनवू शकतात, याचं फार दु:ख झालं त्याला. खूप वेळ सदा काहीच बोलला नाही. विचार करत राहिला. सगळे कलाकेंद्रात जातील, आपण काय करणार? मुख्य म्हणजे, एकटे कसे पिणार? सदाला बाकी कुणी मित्रही नव्हते फारसे. नात्यातल्या कुणाला दारूबद्दल बोलायची सोय नव्हती. सदाने सगळ्या शक्यतांचा विचार केला. आणि शेवटी मित्रांना म्हणाला, ‘मी पण कलाकेंद्रात येतो..’ सगळे मित्र हैराण झाले. अर्थात त्यांना आनंद झाला. सदाने एकदा तरी लावणी ऐकली पाहिजे, अशी त्यांचीही इच्छा होती. शेवटी कसा का होईना, सदा तयार झाला. अर्थात फक्त दारूसाठी. त्याला लावणी ऐकायची इच्छा नव्हतीच. त्या प्रकाराचा त्याला तिटकाराच होता.

सदा आणि मित्र त्या रात्री कलाकेंद्रात गेले. बैठक ठरली होती. बिअर आलेल्या होत्या. लावणी सुरू झाली. सदाला त्या छोट्या खोलीतला आवाज सहन होत नव्हता. सिनेमात दाखवतात तसं काही नव्हतं. नाचणारी बाई वेगळी आणि पेटीपाशी बसून लावणी म्हणणारी बाई वेगळी. सदाला त्या गाण्यात असंख्य चुका दिसत होत्या. ढोलकी वाजवणारा मन लावून ढोलकी वाजवत होता. पण सदाला वाटलं, तो ढोलकी फोडेल या वेगात.. घुंगरांचा आवाजसुद्धा भिंतीवर जोरजोरात आदळतोय, असं वाटू लागलं. मित्र मात्र आनंदात होते. ओरडून, शिट्ट्या वाजवून दाद देत होते. लावणीवर नाचणारी तरुणी एकदम प्रसन्न मुद्रेने सगळ्यांकडं बघत होती. तिच्या डोळ्यात जादू होती. सात-आठ मित्रांमध्ये सदा एकटाच होता, जो तिच्या लावणीला अजिबात दाद देत नव्हता. तिने बघितलं तर सदा नजर फिरवायचा. तिच्या लक्षात आली ती गोष्ट. पण, तिनं दुर्लक्ष केलं. बसलेल्या लोकांचं खानपान चालू होतं…

अचानक सदाचं लक्ष गेलं. त्या तरुणीने सदाकडं बघून ओठावर बोट ठेवलं. अंगठ्याच्या बाजूचं बोट. त्या बोटातली ती नाजूक अंगठी. एक क्षण फक्त. पुन्हा ती नाचू लागली.. विजेच्या वेगानं.. सदाला ती तरुणी दिसेनाशी झाली. नुसती वीज चमकतेय की काय, असं वाटू लागलं. एवढा वेळ इकडंतिकडं बघणारा सदा आता अधूनमधून लावणी बघू लागला. आतापर्यंत तो त्या तरुणीपेक्षा भिंतीकडं जास्त बघत होता. ढोलकीकडं जास्त बघत होता. आणि आतापर्यंत त्याला त्या खोलीतलं काहीच आवडत नव्हतं. फक्त दोष आणि दोषच दिसत होते त्या खोलीत. आणि पुन्हा एकदा त्या तरुणीने सदाकडे बघून तशीच खूण केली. सदाने शेजारीपाजारी पाहिलं. मित्र अंतर सोडून होते. सदाला वाटलं त्यांच्याकडं बघून इशारा करत असेल. पण, तसं काही नव्हतं. मनोमन खुश होऊनही सदा शांत राहिला. आता त्या तरुणीसोबत आणखी तीन-चार जणी नाचायला आल्या. मित्रांचा गोंधळ वाढला. त्यांच्या ओळखीच्या होत्या सगळ्या. त्या गोंधळात पुन्हा एकदा त्या तरुणीने सदाकडं बघून ओठांवर बोट ठेवलं. सदाला खात्री झाली की, ही केवळ आणि केवळ आपल्यासाठी केलेली खूण आहे. अचानक सदाला त्या कोंदट खोलीत अत्तराचा वास यायला लागला.

ढोलकी एकदम भारी वाटू लागली. पेटी एकदम सुरेल वाटू लागली. घुंगरांचा आवाज अचानक मधुर वाटू लागला. सदा एकटक तिच्याकडं बघू लागला. त्याच्या मनात इच्छा होती, काही पैसे तरी त्या तरुणीला द्यावेत. पण, त्याची हिंमत झाली नाही. मित्र त्याला आयुष्यभर हसले असते. सदा शांत राहिला. बैठक संपली. सगळे निघाले. सदा गाडी काढताना अचानक म्हणाला, ‘चावी विसरलो..’ तो धावत खोलीकडं गेला. ती तरुणी घाम पुसत बसलेली दिसली. सदा तिच्याजवळ गेला. ती हसली. सदाने हिंमत करून तिला विचारलं, ‘तुम्ही माझ्याकडं बघून असा इशारा करत होता, ते खूप आवडलं.’ असं म्हणून सदाने त्याच्याकडं असलेले पाच हजार तिच्या हातात ठेवले. तसाच उभा राहिला. सदाने पुन्हा खात्री करून घेण्यासाठी विचारलं, ‘माझ्याकडं बघूनच इशारा करत होता ना?’ ती ‘हो’ म्हणाली. सदाने लाजून विचारलं. ‘का?’ ती हसून म्हणाली, ‘मला वाटलं, तुम्हाला बोलता येत नाही. म्हणून ओठावर बोट ठेऊन विचारत होते, बोलता येतंय का नाही?’ सदाच्या स्वप्नांची इमारत एका क्षणात ढासळली…सदा पुन्हा कधी कलाकेंद्रात गेला नाही. पण, त्याच्या भावगीतात आता पूर्वीपेक्षा जास्त ‘दर्द’ असतो, असं मित्र म्हणतात.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments