Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका...: घाटी!

गोष्ट सांगतो ऐका…: घाटी!

गोष्ट सांगतो ऐका…:  घाटी!

[ad_1]

अरविंद जगताप6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

इंद्रनील टाइप करता करता थांबला. एवढा वेळ खोलीत फक्त की बोर्डचा आवाज येत होता. तोसुद्धा शांत झाला. धनंजयला आता घाम फुटायचा बाकी होता…

धनंजयची अभिनेता व्हायची इच्छा होती. खूप संघर्ष केला. पण, गर्दीत उभं राहण्याशिवाय दुसरी कुठली संधी त्याला मिळाली नाही. कॅमेरा आणि तो कायम दूर राहिले. वय वाढत होतं. मग त्यानं पत्रकार होऊन टीव्हीवर चमकायचा प्रयत्न सुरू केला. पण, तिथंही संधी मिळाली नाही. कारण कॅमेरा समोर आला की, त्याला आत्मविश्वासानं बोलता यायचं नाही. शब्द साथ सोडून द्यायचे. वय वाढत होतं आणि संधी मिळत नव्हती. दरम्यान त्याच्या लक्षात आलं की, आपल्याला बातमी सांगता येत नसली, तरी बातमी लिहिता येते. आणि चांगल्या इंग्रजीत लिहिता येते. त्याच्या मित्राने एका इंग्रजी वर्तमानपत्रात त्याची ओळख करून दिली. धनंजय तिथे पत्रकार म्हणून काम करायला लागला. पोलिसांमध्ये थोड्या फार ओळखी असल्यानं त्याला क्राइम बीट मिळालं. रोज नवे गुन्हे, नव्या भानगडी.

धनंजय आपल्या कामात रमला. जास्त कष्ट करून बातम्या गोळा करू लागला. त्याच्या बातम्यांचं इतर सहकारी कौतुक करू लागले. पण, लोकांना कसं कौतुक असणार? कारण लोकांना माहीतच नव्हतं की या बातम्या धनंजय लिहितो. धनंजयची बायलाइन कधी येतच नव्हती. नुसतीच बातमी. कुणी लिहिलीय? कुणी शोधलीय? कधीच लिहून येत नाही. एका बातमीत सात-आठ पोलिसांची आणि चार-पाच गुन्हेगारांची नावं छापून यायची. पण, बातमी लिहिणाऱ्याचं नाव यायचं नाही. धनंजयला खूप उत्सुकता होती बातमीवर आपलं नाव यावं याची. पण, संपादक असलेला इंद्रनील अतिशय खडूस. त्याला बोलायची कुणाची हिंमत नव्हती. खरं तर कुठल्याच पत्रकाराचं नाव छापून आलं नसतं, तर कुणाला काही वाटलं नसतं. पण, इंद्रनीलच्या मर्जीतल्या पत्रकारांची बातमी त्यांच्या नावाने यायची. बाकीच्या बातम्या निनावी. मराठी पत्रकारांवर तर इंद्रनीलचा जास्तच राग. धनंजयने ठरवलं की शांत बसायचं नाही. कॅमेऱ्यासमोर येऊ शकलो नाही, पण किमान वर्तमानपत्रातल्या बातमीवर नाव यायला काय हरकत आहे?

धनंजय आपल्या सहकारी पत्रकारांशी बोलला की आपण सगळे मिळून संपादकांशी बोलू. पण, बाकीचे सहकारी इंद्रनीलला ओळखून होते. त्याच्या केबिनमध्ये जायची त्यांची इच्छा नसायची. त्याच्या डोक्यात जायचा तर ते विचारसुद्धा करू शकत नव्हते. धनंजय निराश झाला. शेवटी हिंमत करून एक दिवस तो एकटाच इंद्रनीलच्या केबिनमध्ये गेला. इंद्रनील त्याला बघून हैराण झाला. त्याने बोलवल्याशिवाय कुणी स्वतःहून त्याच्या केबिनमध्ये यायचं नाही. इंद्रनीलने धनंजयला बसायलाही सांगितलं नाही. खरं तर तो ऑफिसमधल्या कुणालाच बसायला सांगायचा नाही. सेल्स आणि मार्केटिंगवाले सोडले तर. त्यांना मात्र इंद्रनील डोक्यावर बसवायला तयार असायचा. पण, पत्रकारांना मात्र नोकरासारखा वागवायचा. आताही इंद्रनीलने धनंजयकडं अतिशय तुच्छतेनं पाहिलं.

धनंजयने धीर एकवटत, ‘मला काही बोलायचंय,’ असं सांगितलं. इंद्रनील म्हणाला, ‘मी बिझी आहे, जे काय आहे ते थोडक्यात सांग..’ धनंजय म्हणाला, ‘कामासंदर्भातच आहे..’ पण, तो काही बोलायच्या आधीच इंद्रनील म्हणाला, ‘काम झेपत नसेल, तर राजीनामा दे.. उगीच कारणं देत बसू नको. आणि सुटी वगैरे पाहिजे असेल, तर अर्ज करायच्या भानगडीत पडू नको. सरळ राजीनामा दे..’ धनंजयला काही क्षण काय बोलावं तेच कळत नव्हतं. तरीही तो तिथंच उभा राहिला. इंद्रनील काहीतरी टाइप करत होता. त्यानं जरा वेळानं धनंजयकडं, तू अजून गेला नाहीस? या अर्थानं बघितलं. धनंजय तरीही उभा राहिला. शब्द जुळवत. मग म्हणाला, ‘माझ्या बातमीवर माझं नाव आलं पाहिजे’. इंद्रनील टाइप करता करता थांबला. एवढा वेळ खोलीत फक्त की बोर्डचा आवाज येत होता. तोसुद्धा शांत झाला. धनंजयला आता घाम फुटायचा बाकी होता. इंद्रनीलने धनंजयला बसण्याचा इशारा केला.

धनंजय नाही – हो करता करता बसला. इंद्रनीलने काम बाजूला ठेवलं. धनंजयकडं एकटक बघू लागला. इंद्रनील खूप वेळ असाच धनंजयकडं बघत राहिला. मग काही वेळाने त्याने शांतपणे बोलायला सुरूवात केली. धनंजय कसा मूर्ख आहे, त्याच्या बातमीत कशा व्याकरणाच्या चुका असतात, त्याची इंग्रजी किती गावठी वळणाची आहे, त्याला अजूनही हेडलाइन कशी असावी हे कळत नाही.. अशा पन्नास एक चुका इंद्रनीलने एका दमात सांगितल्या. खरं तर इंद्रनील अतिशयोक्ती करत होता. धनंजय शांतपणे ऐकून घेत होता. काही चुका तर धनंजयने कधीही केल्या नव्हत्या. आणि ऑफिसमध्ये धनंजयएवढी उत्तम इंग्रजी असलेला एखाद-दुसराच पत्रकार होता.

तरीही इंद्रनील त्याला दोष देत होता. धनंजय एक शब्द बोलला नाही. संपादक म्हणून तो इंद्रनीलला मान देत राहिला. नसलेल्या चुका कबूल करत राहिला. पण, रागाच्या भरात म्हणा किंवा खरा स्वभाव उफाळून आला म्हणून म्हणा; इंद्रनील एक वाक्य बोलून गेला.. ‘तुझ्यासारख्या घाटी लोकांचं नाव माझ्या वर्तमानपत्रात कधीच येणार नाही. अशा घाटी लोकांची बायलाइन छापून मला माझ्या पेपरचा दर्जा घालवायचा नाही..’ धनंजयला घाटी शब्द अजिबात आवडला नाही. इंद्रनीलने हा शब्द वापरायची काही गरजच नव्हती. इंद्रनील अमराठी होता. पण, मराठी माणसाला हिणवायला ‘घाटी’ हा शब्द वापरायचा, हे मुंबईत आल्यापासून त्याला माहीत झालं होतं.

त्यानंतरही इंद्रनील धनंजयला बोलत राहिला. पण, धनंजयचं त्याच्या बोलण्याकडं लक्षच नव्हतं. त्याला सतत फक्त ‘घाटी’ हा एकच शब्द ऐकू येत होता. इंद्रनीलचे फक्त ओठ हलताना दिसत होते. आणि तो काहीही बोलत असला, तरी धनंजयला ऐकू येत होता तो फक्त एकच शब्द… घाटी.

धनंजय मार्केटमध्ये फिरत होता. तासभर तरी झाला असेल. काहीतरी शोधत होता. आपण इंद्रनीलच्या केबिनमधून कधी बाहेर पडलो? या मार्केटला कसं आलो? त्याला काहीच आठवत नव्हतं. त्यानं एक मशीन विकत घेतलं. खूप वेळ फिरल्यावर त्याला एका दुकानात हवा तो माणूस सापडला. त्या माणसाशी जवळपास दोन तास धनंजय बोलत राहिला. तो माणूस धनंजयचं काम करायला तयार नव्हता. पण, धनंजयने त्याला सगळी गोष्ट सांगितली. खरी खरी. आजची. तो माणूसही एका क्षणी तयार झाला. दोघे निघाले. थेट इंद्रनीलच्या घरी पोचले. रात्र झाली होती. एक वाजला असेल. इंद्रनीलच्या घरी सगळे झोपले होते. इंद्रनील एका रूममध्ये. दुसऱ्या रूममध्ये त्याची दोन मुलं आणि बायको. इंद्रनीलला दोन जुळी मुलं होती. धनंजयने चावीवाला सोबत आणला होता. त्यानं दोन मिनिटांत घराचं कुलूप उघडलं. दोघं आत गेले. अर्ध्या तासाने बाहेर पडले. शांतपणे. पहाटे लक्षात आलं. इंद्रनीलचं कपाळ बघून त्याची बायको जोरजोरात रडू लागली. बायको सीसीटीव्ही बघायला लागली. इंद्रनीलने तिला थांबवलं. तो म्हणाला, ‘मला माहितीय कुणी केलंय हे..’ बायकोने विचारलं, ‘कसं काय?’ त्यानं कपाळाकडं बोट दाखवलं. त्यावर मोठ्या अक्षरात ‘घाटी’ असं गोंदवलं होतं. आणि त्याला बेडशीटने बांधून ठेवलं होतं. कुठंही इजा नव्हती. तोंडावर रुमाल होता. शरीरावर इजा नसली, तरी इंद्रनीलच्या मनात खोल जखम झाली होती. हा शब्द आता आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवणार होता. कपाळावरून खोडून टाकला, तरी मनातून कसा खोडणार?

(संपर्कः jarvindas30@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments