कबीररंग: अपन पौ आपु ही बिसरो…

0
24
कबीररंग: अपन पौ आपु ही बिसरो…


हेमकिरण पत्की2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जन्मभर आपण देहामनानं बांधलेले असतो. पण, खरंच आपला देह किंवा आपलं मन आपल्याला बांधून ठेवत असतं? की आपण कुठल्या ना कुठल्या सुखाच्या इच्छेमुळे स्वतःला बांधून घेत असतो? आपण बंधनात अडकलेले आहोत. सारंच आपल्या हातात नाही, हा अनुभव आपल्यासाठी नित्याचाच असतो. आपल्यातले फारच थोडे जण देहामनाच्या बंधनांचा वास्तविक पातळीवर विचार करत असतात. कोण बांधून ठेवतं आपल्याला? कशानं बांधले जातो आपण? वाट्याला आलेली परिस्थिती आपल्याला बांधून ठेवते की आपल्या मनाची स्थिती बांधून ठेवते? कधी कधी तर आपण दैवगतीचं कारणही पुढं करत असतो. आपल्या ध्यानात येतं की, आपलं सुखामागं धावणारं मनच आपल्याला बांधून ठेवतं. रोजच्या जगण्याच्या गरजा न कळालेलं मन जमा केलेल्या धनानं बांधलं जातं. आपण राहण्यासाठी घर बांधतो आणि नंतर घर आपल्याला बांधून ठेवतं.

आपलं मन अस्थिर असतं म्हणून स्थावराकडून बांधलं जातं. आपलं मन आपल्या ताब्यात राहू शकत नाही म्हणून दुसऱ्याला ताब्यात ठेवू पाहतं. आपली आंतरिक परम स्वतंत्रता ही एकच वस्तू अशी असते की, जी कुणालाही वश होऊ शकत नाही. या स्वतंत्रतेला जाणण्यासाठी कबीरांचे दोहे, गीतं आरसा बनून समोर येतात. आपले स्वतःविषयीचे ग्रह, समज, मतं, संकल्पना जरा बाजूला सारून कबीरांच्या गीतांतल्या प्रतिकांना जाणून घेतलं, तर आपल्याला आपल्या ‘मी’चे, ‘अहम्’चे आणि जीवनविरोधी इच्छांचं दर्शन घडू शकतं. स्वतःला पाहणं – जाणणं याहून काय वेगळं असतं! आपल्याला आजन्म बांधलेपणाचा अनुभव येतो. या अनुभवामुळं ‘स्व’रूपाचा विसर पडतो. कबीर म्हणतात… अपन पौ आपु ही बिसरो जैसे श्वान कांच मंदिर मह, भरमते भुंकि मरो आपण स्वत:, स्वत:विषयी निर्माण केलेल्या किंवा इतरांनी आपल्याविषयी तयार केलेल्या प्रतिमांच्या जगात जगत असतो. या प्रतिमेहून एक आपलं रूप आहे, हेच आपल्या दृष्टीत येत नाही. हे रूपच आपली खरी ओळख असते. बरेचदा आपण लोकप्रतिष्ठित ओळखीला घेऊन जगत असतो. खरं माणूसपण या बाहेर प्रस्थापित झालेल्या प्रतिमेहून वेगळं असतं. स्वरूपाचा आपल्याला विसर पडतो; तेव्हा आपली स्थिती कशी असते ते कबीर प्रतिकांच्या प्रत्ययकारी माळेतून दर्शवतात. एखादा श्वान कांच मंदिरातच अडकून राहावा आणि त्यानं भवतीच्या आरशात आपल्या अनेक प्रतिमा पाहाव्यात, घाबरून गोंधळून जावं, तसंच स्वरूप न उमजल्यानं आपणही भ्रान्तचित्त होतो. तो श्वान त्या स्वतःच्याच प्रतिमांच्या गर्दीत गतप्राण होतो. स्वतःला जाणून न घेणाऱ्या माणसाची गत अशीच होते, असं कबीर या प्रतिकातून सुचवतात.

आपली आंतरिक स्थिती, आपलं खरं रूप आपल्याला नातेसंबंधांच्या आरशात दिसतं. यासाठी मात्र आपली दृष्टी, जाणीव आणि संवेदना विकारवश असायला नको. हे कबीरांचं सूचन आपल्याला आपणच निर्माण केलेल्या बंधनातून मोकळं करू शकतं. चोख, विशुद्ध नातेसंबंधांतील आरशात प्रतिबिंबित होणारी आपली प्रतिमा ‘प्रमाण’ असते. आपल्या जीवनस्मृतीतून स्वरूप वेगळं झाल्यावर, म्हणजेच स्वतःचा विसर पडल्यावर भ्रमलेल्या माणसाची दशा कशी होते, त्याविषयी कबीर पुढल्या प्रतीकांची योजना करतात… जौ केहरि बपु निरखि कूपजल, प्रतिमा देखी परो। वैसे ही गज फटिक सिला पर, दसनन्हि आनि अरो।।

विहिरीच्या पाण्यातली आपली प्रतिमा खरी समजून, त्या प्रतिमेला आपला शत्रू मानून सिंह पाण्यात उडी घेतो आणि आपला प्राण गमावतो. हत्ती जेव्हा स्फटिकशिळेमध्ये आपली प्रतिमा पाहतो, तेव्हा तो त्यावर माथ्याने प्रहार करतो आणि आपले दात तोडून घेतो. या प्रतिकांतून आपली आभासी प्रतिमा आपल्यासाठी किती घातक ठरू शकते, हे कबीरांचं तळमळीचं सांगणं आहे. आपली प्रतिमाच पाहायची असेल, तर माणसानं ती नातेसंबंधांच्या आरशात पाहावी, नाही तर सर्वांमधला एक समजून आत्मगत असलेल्या चेतनेला जाणून घ्यावं. वस्तुस्थिती, आत्मस्थिती न कळणं हाच तर भ्रम आहे. हा भ्रम जोवर आपल्या वृत्तीत असतो तोवर ‘त्या’ श्वानासारखी, सिंहासारखी, हत्तीसारखी आपली स्थिती असणार.

कबीर आणखी दोन प्रतिकांतून आपल्या प्रतिमांचे जग गडद करतात… मरकट मूठि स्वाद नहिं बिहुरै, घर घर रटत फिरो; कह कबीर ललनी के सुगना तोहि कवने पकरो? भांड्यामध्ये अडकलेली मूठ घेऊन माकड दारोदार रडत फिरतं आणि पिंजऱ्यातल्या नळीवरला पोपट नळीलाच धरून राहतो. त्याला कोण बांधून ठेवतो?

प्राण्यापक्ष्याची ही प्रतीके योजून कबीरांनी स्वतंत्र बुद्धी असलेल्या माणसाच्या भ्रामकतेला, त्यातून त्यानेच निर्माण केलेल्या अस्तित्वहीन बंधनांना अधोरेखित केलं आहे. स्वतःची भ्रामक प्रतिमा उमजली की मग कसली देहामनाची बंधनं! आपल्या ठायी असलेल्या आंतरिक परम स्वतंत्रतेची अनुभूती हीच तर अंतिम मुक्ती! असंच कबीरांना सुचवायचं आहे.

(संपर्क- hemkiranpatki@gmail.com)



Source link