
फलटण :- प्रामाणिकपणा म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण फलटण एसटी आगारातील चालक अक्षय राजेंद्र जाधव यांनी घालून दिले आहे. प्रवाशाने बसमध्ये विसरलेली अडीच लाख रुपयांची सोन्याची पर्स सापडल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती आगार प्रशासनाकडे सुपूर्द केली. त्यांच्या या प्रामाणिक कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साताऱ्याहून फलटणकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये एक प्रवासी आपली सोन्याचे दागिने असलेली पर्स विसरून गेला होता. बस फलटण आगारात पोहोचल्यानंतर चालक अक्षय जाधव यांना ही पर्स सापडली. तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याचा नेकलेस आणि अंगठी आढळली. दागिन्यांची किंमत सुमारे ₹2.5 लाख इतकी होती.
यासंदर्भात तत्काळ माहिती देत, चालकाने ती पर्स आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. नंतरच्या चौकशीत दागिने संजय संपतराव भोईटे (रा. हिंगणगाव, ता. फलटण) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक संजय नाळे, सुरक्षारक्षक गुंजवरे, आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत दागिने मूळ मालकाला परत देण्यात आले.
ही घटना समजताच प्रवाशाने चालकाचे मनःपूर्वक आभार मानले. एसटी विभागाने अक्षय जाधव यांचा सत्कार केला असून आगार प्रमुख मुला मॅडम, मुखदेव अहिवळे, धीरज अहिवळे व इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
आजच्या काळात जिथे प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे, तिथे अक्षय जाधव यांचे कृत्य हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.







