SP तुषार दोशी अडचणीत? स्वतःच्या बदलीच्या दिवशीच सहा-सात पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप

0
4


सातारा : नुकतीच सांगलीत बदली झालेले पोलीस अधीक्षक तुषार (Tushar Doshi) दोशी हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी साताऱ्यातून बदली झाली त्याच दिवशी तुषार दोशींनी नियमबाह्य पद्धतीने जिल्ह्यातील सहा ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप केला जात आहे. या संबंधी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जंयवंतराव शेलार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहित या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 

साताऱ्यात वादग्रस्त कारकीर्द राहिलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. त्या आधी ते सक्तीच्या रजेवर होते. मात्र सांगलीमध्ये बदलीचे आदेश आलेल्या दिवशीच तुषार दोशी यांनी नियमबाह्य पद्धतीने, त्याच्या अधिकारात नसतानाही साताऱ्यातील सहा ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

तुषार दोशी यांनी केलेल्या या बदल्या नियमबाह्य आहेत अशी तक्रार करत सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहिलं आहे. दोशींनी केलेल्या या बदल्यांची चौकशी करावी आणि त्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

तुषार दोशी यांची सांगलीला बदली

तुषार दोशी यांची सातारच्या पोलीस अधीक्षक पदावरून सांगलीत बदली करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना सातारा पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आणि पोलिसांच्या मदतीने भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यानंतर विधिमंडळात विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची शिफारस केली होती. 

एका अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तुषार दोशी यांची बदली हा प्रतिष्ठेचा विषय करण्यात आला होता. अखेर शिवसेनेच्या नाराजीची दखल घेतल्याचं दाखवत तुषार दोशी यांची बदली करण्यात आली. मात्र जिथे तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे तो सांगली जिल्हा साताऱ्यापेक्षा मोठा असल्याने त्यांना त्यांच्या कामगिरीची शिक्षा मिळालीय की बक्षीस असाही प्रश्न निर्माण होत आहे. 

तुषार दोशींच्या जागी पुणे क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त असलेल्या निखिल पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल पिंगळे यांच्यावरही रोहिणी खडसे यांचे पती खेवलकर पार्टी प्रकरणी आरोप करण्यात आले होते.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link