सातारा : सातारा जिल्ह्यातील पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. ऊस, भाजीपाला, धान्य पिकवणाऱ्या जमिनीत आता थेट सफरचंद बहरलं आहे. दोन एकर क्षेत्रात तब्बल सहाशे सफरचंदाची झाडं लावून बापू भिलारे यांनी शेतीत नवा इतिहास घडवला आहे. त्यांच्या या प्रयोगाची आता राज्यभर चर्चा रंगली असून अधिकारी, पर्यटक आणि शेतकरी प्रत्यक्ष बाग पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
महाबळेश्वर-पाचगणीच्या कुशीत वसलेला पसरणी घाट, थंड हवामान, डोंगररांगा आणि निसर्गरम्य परिसर. याच भागात बापू भिलारे या शेतकऱ्याने हटके प्रयोग करत दोन एकर क्षेत्रात सहाशे सफरचंदाची झाडं लावली आहेत. अनेकांनी हा प्रयोग अशक्य असल्याचं सांगितलं. पण जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज ही बाग फळांनी डवरली आहे.
पारंपरिक शेतीला फाटा देत नव्या पिकांकडे वळण्याची प्रेरणा
लालचुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक भेट देत आहेत. फक्त पाहणीच नाही, तर शेतकरीही हा प्रयोग समजून घेण्यासाठी पसरणीकडे धाव घेत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत नव्या पिकांकडे वळण्याची प्रेरणा या बागेतून मिळत आहेत. या यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनानेही घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त, आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतावर जाऊन पाहणी केली. बापू भिलारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या जिद्दीचे अभिनंदन केले. अधिकाऱ्यांनी शेतातील ताज्या सफरचंदाचा आस्वाद घेत गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेचेही कौतुक केले आहे.
दोन एकरामध्ये सहाशे सफरचंदाची झाडे
दोन एकरामध्ये सहाशे सफरचंदाची झाडे लावली आहेत. महाराष्ट्रातला पहिला अनोखा प्रयोग आहे. काश्मिरी सफरचंदाच्या तोडीचा कोणतेही कमतरता नसलेलं एकदम ज्यूसी सफरचंद आहे. यशस्वी प्रयोग करत दिशादर्शक काम बापू भिलारे यांनी केला असल्याचं मत पश्चिम महाराष्ट्र महसूल आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील वातावरण विविध फळपिकांसाठी पोषक आहे. शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगशील शेतीकडे वळावे. बापू भिलारे यांचा प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं.
जिद्द, मेहनत आणि आधुनिक विचार एकत्र आले तर अशक्यही शक्य होतं
सफरचंद शेतीचा प्रयोग करताना अडचणी आल्या, हवामानाचं आव्हान होतं. खर्चही मोठा होता. पण हार न मानता बापू भिलारे यांनी चिकाटी कायम ठेवली. त्यातूनच आज साताऱ्यात सफरचंद बागेची किमया साकार झाली आहे. पसरणीत फुललेली ही सफरचंद बाग आता साताऱ्यातील प्रगतशील शेतीचा नवा चेहरा बनली आहे. शेतकऱ्यांची जिद्द, मेहनत आणि आधुनिक विचार एकत्र आले तर अशक्यही शक्य होतं. हेच बापू भिलारे यांनी करून दाखवलं आहे.
आणखी वाचा







