Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रस्वारगेट बसस्थानकात धक्कादायक प्रकार – शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार

स्वारगेट बसस्थानकात धक्कादायक प्रकार – शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार

पुणे – पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर पहाटेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

घटनाक्रम कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे ५.३० वाजता स्वारगेट बसस्थानकात पोहोचली. यावेळी ती एका ठिकाणी उभ्या असलेल्या शिवशाही बसजवळ गेली. त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी बस दुसरीकडे उभी असल्याची बतावणी केली. पीडितेने त्यास नकार दिला, मात्र आरोपीने तिची दिशाभूल करत टॉर्च लावून बसमध्ये जाण्यास सांगितले.

पीडित बसमध्ये प्रवेश करताच नराधमही तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेनंतर पीडित तरुणीने काही अंतर गेल्यानंतर हिंमत एकवटत स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्वरित कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली.

आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, राहणार शिक्रापूर) असे असून त्याच्या विरोधात जबरी चोरीचे दोन गुन्हे आधीच दाखल आहेत.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणी पुणे पोलिसांनी तत्काळ ८ विशेष पथके स्थापन केली असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेनंतर पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वारगेटसारख्या प्रमुख बसस्थानकावर पहाटेच्या वेळीही अशा घटना घडत असल्याने सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी महिलांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments