Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशभारताचा पाकिस्तानवर निर्णायक हल्ला, 'ऑपरेशन सिंदूर'ला शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा; मात्र चीनच्या...

भारताचा पाकिस्तानवर निर्णायक हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ला शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा; मात्र चीनच्या भूमिकेबाबत चिंता

साहस टाईम्स :- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी जोरदार हवाई कारवाई केली. या कारवाईत 90 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

भारतीय हवाई दलाची सीमा न ओलांडण्याची खबरदारी

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, “गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये जे काही घडलं त्यामुळे देशभर अस्वस्थता निर्माण झाली होती. निष्पाप नागरिकांचा बळी गेला. भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कॅम्पवर हल्ला करून योग्य कृती केली. मात्र या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नाही, ही बाब उल्लेखनीय आहे.”

स्थानिक काश्मिरी जनतेचा दहशतवादाविरोधात उभा राहणे महत्त्वाचे

पवार म्हणाले की, “काश्मीरमधील हल्ल्यानंतर स्थानिक जनतेने आणि नेत्यांनी दहशतवादाचा निषेध केला. विधानसभा ठराव, ओमर अब्दुल्लांची भूमिका यामुळे काश्मीरमधील बदललेली मानसिकता दिसून आली आहे. पाकिस्तानच्या आर्थिक नाकेबंदीचं धोरण हे योग्य दिशेने आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’ला सर्वपक्षीय पाठिंबा

शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं की, “सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय बैठकीत सहभाग घेतला होता. अशा वेळी राजकारण न करता आम्ही सरकारसोबत आहोत. काल रात्री जी कारवाई झाली, तिच्या पाठी आमचा पाठिंबा आहे.”

चीनच्या भूमिकेबाबत शंका आणि इशारा

मात्र या सर्व सकारात्मक भूमिका घेत असताना, पवारांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “अमेरिका, जपान आणि इतर देशांनी भारताच्या या कारवाईला पाठिंबा दिला. पण चीनने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे चिंतेचं कारण आहे. पाकिस्तानची क्षमता वेगळी आणि भारताची वेगळी आहे, पण चीनचा पवित्रा पाहता आपण सावध राहण्याची गरज आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments