Wednesday, September 2, 2026
Homeफलटणस्थान तेच, जिल्हा तोच, तालुका तोच! प्रशासकीय दबावाच्या आरोपांमुळे आणखी एका कर्तव्यदक्ष...

स्थान तेच, जिल्हा तोच, तालुका तोच! प्रशासकीय दबावाच्या आरोपांमुळे आणखी एका कर्तव्यदक्ष डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यूबोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणातील दबाव व प्रशासकीय छळाला कंटाळल्याचा आरोप; डॉ. संपदा मुंडे प्रकरणानंतर डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या मृत्यूने पुन्हा खळबळ

फलटण : स्थान तेच, जिल्हा तोच आणि तालुका तोच… काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या आणखी एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या मृत्यूने आरोग्य विभागासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. संपदा मुंडे यांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, फलटण परिसरात कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र (राज) रूपनवर (MBBS) यांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणासंदर्भात होत असलेला कथित दबाव तसेच प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या त्रासाला कंटाळून डॉ. रूपनवर यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्या हातावर लिहिलेली चिठ्ठी आढळून आल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणातील नेमकी कारणे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोग्य क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने काम करणाऱ्या डॉक्टरांवर नेमका कोणत्या स्वरूपाचा दबाव होता? बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणामागील वास्तव काय आहे? तसेच संबंधित डॉक्टरांवर कोणाकडून आणि कोणत्या कारणासाठी दबाव टाकला जात होता, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्या घटनेनंतर पुन्हा त्याच परिसरात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमधील परिस्थितीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व विविध स्तरांतून होत आहे.
दरम्यान, डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आणि संबंधित यंत्रणा तपास करीत असून, चिठ्ठीतील मजकूर, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे. तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूमागील कारणांबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
मात्र, एका पाठोपाठ एका डॉक्टरच्या अशा दुर्दैवी मृत्यूच्या घटनांनी फलटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
साहस Times

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments