Wednesday, September 2, 2026
Homeफलटणकमिन्स कंपनीत गेलेला २४ वर्षीय तरुण महिनाभरानंतर मृतावस्थेत सापडला; निंभोरे येथे लिंबाच्या...

कमिन्स कंपनीत गेलेला २४ वर्षीय तरुण महिनाभरानंतर मृतावस्थेत सापडला; निंभोरे येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला सडलेला मृतदेह

कमिन्स कंपनीत गेलेला २४ वर्षीय तरुण महिनाभरानंतर मृतावस्थेत सापडला; निंभोरे येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला सडलेला मृतदेह

फलटण प्रतिनिधी : कमिन्स कंपनीत कामासाठी गेल्यानंतर गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह निंभोरे गावच्या हद्दीतील एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अनिकेत राजेंद्र भोसले (वय २४, रा. मलटण, ता. फलटण) असे मृत तरुणाचे नाव आहे.

२८ जुलैपासून होता बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भोसले हा तरुण २८ जुलै २०२६ रोजी नेहमीप्रमाणे कमिन्स कंपनीत गेला होता. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

त्यानंतर अनिकेतची आई स्वाती राजेंद्र भोसले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मिसिंग क्रमांक ६१/२०२६ नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस आणि नातेवाईक अनिकेतचा शोध घेत होते.

निंभोरे परिसरात लिंबाच्या झाडाला मृतदेह आढळला

बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास, निंभोरे गावच्या हद्दीतील कुटे डेअरीसमोर, लोणंद-फलटण महामार्गाच्या उत्तर बाजूस असलेल्या एका कंपाऊंडमधील शेतात एका व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.

ही जागा गट क्रमांक ४१५ मध्ये असून, घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

कपडे, बूट आणि आयडी कार्डवरून झाली ओळख

मृतदेह अनेक दिवसांपासून झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने तो पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृतदेहाची थेट ओळख पटविणे कठीण झाले होते.

पोलिसांनी अनिकेतच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. यावेळी अनिकेतचे सावत्र भाऊ मनोजकुमार साहेबराव आढाव यांनी मृतदेहावरील कपडे, जवळ पडलेले बूट तसेच मोबाईलच्या कव्हरमध्ये मिळालेले ओळखपत्र पाहून मृतदेह अनिकेत भोसले याचाच असल्याची ओळख पटविली.

अकस्मात मृत्यूची नोंद; पुढील तपास सुरू

अनिकेत भोसले याने २८ जुलै ते २ सप्टेंबर या कालावधीत कधीतरी निर्जन ठिकाणी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद (UD क्रमांक ००९२/२०२६) करण्यात आली असून, फलटण ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments