Wednesday, September 2, 2026
Homeफलटणडॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यूप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश; पाच जणांवर गुन्हे दाखल करून अटकेची...

डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यूप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश; पाच जणांवर गुन्हे दाखल करून अटकेची मागणी

एसआयटी चौकशी, कुटुंबाला एक कोटींची मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी; मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबीयांचा ठाम पवित्रा

फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या नातेवाईकांसह नातेपुते, माळशिरस व सदाशिवनगर परिसरातील हजारो नागरिकांनी बुधवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर तीव्र जनआक्रोश आंदोलन केले. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली.

या प्रकरणात आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीना मदने यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील सायन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना ३० ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फलटणसह माळशिरस तालुक्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, त्यांच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

या आंदोलनात डॉ. भगवान पवार, डॉ. लीना मदने यांच्यासह माजी मंत्र्यांचे कथित स्वीय सहाय्यक प्रसाद कोंडे-देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचे कथित स्वीय सहाय्यक दत्तात्रय मोहिते तसेच कुमार परदेशी यांच्यावर तत्काळ गुन्हे नोंदवून अटक करण्याची मागणी करण्यात आली.

बारामती चौक परिसरात तणावपूर्ण वातावरण

जनआक्रोश आंदोलनामुळे फलटण शहरातील बारामती चौक व उपजिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. भर उन्हात आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करणे, डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देणे तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेणे, या मागण्यांचा समावेश होता.

दरम्यान, धमकी आणि धक्काबुक्कीच्या कथित घटनेवेळी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत असलेल्या दत्तात्रय मोहिते यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी डॉ. रुपनवर यांच्या नातेवाईकांनी लावून धरली. या मागणीमुळे फलटण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

उपजिल्हा रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरूप

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. रुग्णालयाकडे येणाऱ्या विविध रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसराला काही काळ छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

बॅरिकेडिंग आणि रस्ते बंद केल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्येही नाराजी व संतापाचे वातावरण दिसून आले. मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनस्थळी उपस्थित असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग काही काळ बंद राहिला असल्याची माहिती मिळाली. मात्र, अतिदक्षता विभागासह अत्यावश्यक आरोग्यसेवा सुरू ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर श्रद्धांजली फलक

उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवंगत डॉ. राजेंद्र रुपनवर यांना श्रद्धांजली अर्पण करणारा फलक लावण्यात आला होता. हा फलक पाहून रुग्णालयातील कर्मचारी, नागरिक आणि उपस्थित नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली.

डॉ. रुपनवर यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून, त्यांच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य समोर आणण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबीयांचा निर्णय

दरम्यान, डॉ. रुपनवर यांचे बंधू सागर रुपनवर आणि कुटुंबीयांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित सर्व संशयितांविरोधात कठोर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा ठाम पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.

या आंदोलनामुळे फलटणमध्ये राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून, प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रांताधिकारी आंबेकर आंदोलनस्थळी; मागण्या शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन
दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असताना प्रांताधिकारी आंबेकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक व डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध मागण्या प्रांताधिकारी आंबेकर यांच्यासमोर मांडल्या.
आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत त्या मागण्या शासन दरबारी पाठवून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी आंबेकर यांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनामुळे फलटणमध्ये राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून, प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments