
राजश्री शाहू पुरस्काराने प्रा. डॉ. राजकुमार शेलार यांचा गौरव
इंदापूर | प्रतिनिधी (गणेश धनवडे) :-कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. राजकुमार शेलार यांना लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘राजश्री शाहू पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिक्षण, समाजकार्य, संशोधन आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला.
डॉ. शेलार यांनी भगवान इंगळे यांच्या ‘ढोर’ या दलित आत्मकथनावर एम.फिल. पदवी, तसेच ‘भटक्या विमुक्त जमातींची आत्मकथने : स्वरूप आणि चिकित्सा’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या ‘दलित आत्मकथने आणि भगवान इंगळे यांचे ढोर आत्मकथन’ या ग्रंथाला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे.
ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक व व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कैलास कदम, प्रा. कृष्णा ताटे, आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सन्मान स्वीकारताना डॉ. शेलार यांनी हा पुरस्कार आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची जबाबदारी अधिक वाढविणारा असल्याचे सांगितले. शिक्षण, संशोधन, साहित्यनिर्मिती आणि समाजप्रबोधनासाठी भविष्यातही अधिक समर्पितपणे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था व अध्यक्ष पत्रकार शिवाजी शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.
या पुरस्काराबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. राजकुमार शेलार यांचे अभिनंदन केले.









