


मुंबई : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा चाळीशीपार गेला असून उन्हाच्या झळांनी राज्य पोळले आहे. मुंबईसह किनारपट्टी भागांत तुलनेने कमाल तापमान कमी आहे. मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये सध्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला असला तरी वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांची गेले काही दिवस काहिली होत आहे. मंगळवारी मुंबईचा पारा सोमवारपेक्षा कमी होता. तरी आर्द्रतेमुळे अस्वस्थता जाणवली. गेल्या आठवड्यापासून शहरात उष्णतेमुळे सुरू असलेली काहिली मंगळवारीही कायम होती. मागील काही दिवस मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. पुणे-नागपूरमधील तापमानाच्या तुलनेत तापमान कमी असूनही घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण होतात.
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी अकोला येथे झाली आहे. येथे ४४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नंदुरबार (४३.५) जळगाव (४३.३), अमरावती ४३ आणि मालेगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला २२ कोटी ६ लाख रुपयांचा थकीत मिळकतकर भरण्यासाठी पुणे महापालिकेने नोटीस बजाविली आहे. नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांत थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे दीनानाथ रुग्णालय गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे. धर्मादाय रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकतकर थकविला असल्याची माहिती समोर आली होती. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सोमवारी महापालिका भवन येथे घेतलेल्या बैठकीत प्रशासनावर टीका केली. सर्वसामान्य नागरिकांनी कर थकविल्यास त्यांच्या दारासमोर महापालिका बँड वाजविते. मग कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या या रुग्णालयावर महापालिकेने कोणती कारवाई केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तसेच या थकीत मिळकतकराबाबत महापालिकेने योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
महापालिकेचा कोणताही कर रुग्णालयाने थकविला नसल्याचा दावा रुग्णालयाचे वैद्याकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी केला. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाने मिळकतकर थकविल्याप्रकरणी रुग्णालयाला मंगळवारी नोटीस बजाविली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या व्यवस्थापकांच्या नावाने ही नोटीस काढण्यात आली आहे. महापालिकेने २०१६-१७ मध्ये रुग्णालयाला केलेली करआकारणी मान्य नसल्याने फाउंडेशनने पुणे महापालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. महापालिकेकडून आकारण्यात आलेल्या सर्वसाधारण करामध्ये ५० टक्के सवलत आणि उर्वरित अन्य कर महापालिकेकडे भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला मिळकतकराची रक्कम कळविली जाते. त्यांपैकी आतापर्यंत १५ कोटी रुपयांची रक्कम त्यांनी भरलेली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडे २२ कोटी ६ लाख ७६ हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. दोन दिवसांत थकबाकी न भरल्यास पुढील कार्यवाही केली जाईल. – प्रतिभा पाटील, उपायुक्त, मिळकतकर विभाग, पुणे महापालिका



जामनगर हवाई तळावरून जॅग्वार विमान गेल्या बुधवारी रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेसाठी आकाशात झेपावले होते. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे काही वेळेतच ते कोसळले. अपघाताचे कारण आणि तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी हवाई दलाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ चौकशी सुरू केली आहे. महिनाभरात तांत्रिक बिघाडामुळे हवाई दलाच्या जॅग्वार लढाऊ विमान अपघाताची ही दुसरी घटना आहे. मार्चमध्ये अंबाला येथे दिवसाच्या प्रशिक्षणासाठी निघालेले विमान ‘ऑनबोर्ड’ प्रणालीत बिघाड झाल्यामुळे कोसळले होते. यापूर्वी वेगवेगळ्या कालखंडात सहा जॅग्वार विमाने अपघातग्रस्त झाली. यातील २०१८ मधील एका अपघातात हवाई दलाच्या अत्यंत अनुभवी लढाऊ वैमानिकांपैकी एक शहीद झाला होता.
ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्तपणे विकसित केलेले जॅग्वार हे ‘स्वनातीत’ म्हणजे ध्वनीहून अधिक वेगाने (सुपरसॉनिक) उड्डाण करणारे विमान आहे. ते कमी उंचीवरून मार्गक्रमण करते. एक अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या करारांन्वये १९७९ मध्ये ही विमाने हवाई दलात समाविष्ट झाली होती. ‘समशेर’ म्हणून त्यांचे नामकरण झाले. दोन इंजिनांमुळे हवेत संचार करण्याची क्षमता अधिक आहे. आखूड आणि अंशत: बांधलेल्या धावपट्टीवरूनही ती उड्डाण करू शकतात. मार्गक्रमणातील अचूकता आणि लक्ष्यभेदी हल्ला प्रणाली असे दुहेरी गुण ही तत्कालीन तंत्रज्ञानातील मोठी झेप ठरली. सुमारे ४५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या जॅग्वार विमानांचा जगात भारतीय हवाई दल एकमेव वापरकर्ता आहे. त्याची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सने शेवटचे जॅग्वार २००५ मध्ये, तर ब्रिटनने २००७ मध्ये सेवेतून निवृत्त केले.
साडेचार दशकांत हिंदुस्तान एरॉनॉटिक्स (एचएएल) आणि संरक्षण संशोधन संस्था (डीआरडीओ) यांच्या सहकार्याने जॅग्वारची दूरवरून हल्ला, अचूक लक्ष्यभेद आणि पुरेशा इंधन साठ्यासह तळावर परतण्याची क्षमता सातत्याने अद्यायावत केली गेली. तीन टप्प्यांत ही प्रकिया पार पडणार होती. तिसऱ्या टप्प्यात जॅग्वारचे इंजिन बदलण्याचाही प्रस्ताव होता. परंतु अमेरिकन बनावटीचे इंजिन खरेदी करून ते बसविण्यास मोठा खर्च असल्याने तो विषय बाजूला ठेवला गेल्याचे तज्ज्ञ सांगतात. आधुनिक रडार प्रणाली, जॅमर, परदेशी-स्वदेशी प्रणालीने सुसज्जतेकडे लक्ष दिले गेले. अनेक कारवायांत जॅग्वारने महत्त्वाची कामगिरी बजावली. २०१९ मध्ये, पाकिस्तानमधील बालाकोट हल्ल्यादरम्यान, जॅग्वारचा वापर पाकिस्तानी हवाईदलाच्या अत्याधुनिक एफ-१६ चे लक्ष विचलित करण्यासाठी केला गेला. त्यामुळे एफ-१६ विमानांनी जॅग्वारला रोखण्यासाठी नियोजन केले. यातून मिराज लढाऊ विमानांना पाकिस्तानी हवाई क्षेत्र ओलांडता आले.
जुनाट विमानांचे अपघात केवळ तांत्रिक अकार्यक्षमताच नाही, तर सरकारी धोरणातील उणिवाही समोर आणतात, याकडे काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. विमान जुने आहे की देखभालीची क्षमता नाही, असाही त्यांचा प्रश्न आहे. या घटना भारतीय हवाई दलाची सुसज्जता आणि सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात. अपघातांचे सत्र कायम राहिल्यास भविष्यात देशाला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते, याकडेही अनेक विश्लेषक लक्ष वेधतात. सैन्यदलांच्या आधुनिकीकरणाचे धाडसी दावे होतात. मात्र प्रत्यक्षात भारतीय हवाई दलाची ताकद आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याची टीका होत आहे.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी भारतीय हवाई दलास लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची (स्क्वॉड्रन) आवश्यकता आहे. सद्या:स्थितीत केवळ ३१ तुकड्या अस्तित्वात आहेत. या स्थितीत जॅग्वारसारख्या जुन्या विमानांना निवृत्त करणे हवाईदलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करू शकते. सध्याच्या ताफ्यात ‘सुखोई – ३० एमकेआय’, ‘मिग – २९ एम’, ‘मिराज – २०००’, राफेल, जॅग्वार आणि ‘मिग – २१ एस’ अशी सात प्रकारची लढाऊ विमाने आहेत. पुढील काळात मिग – २९, जॅग्वार आणि मिराज – २००० ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर येतील. त्यांची जागा तेजसला दिली जाणार आहे. तेजस मिळण्यास विलंब झाल्यामुळे जॅग्वारसारखी जुनी विमाने तूर्त महत्त्वाची ठरतात. अशी विमाने उड्डाणतास कमी करून जास्त काळ सेवेत ठेवण्याचे काही माजी अधिकाऱ्यांनी समर्थन केले आहे.

शाम बिथरला होता! अणुश्री भरतला मिळाली यापेक्षा त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन भरतने काही मिळवले ही गोष्ट त्याला खुपत होती. मग तोही इरेला पेटला. भरत आणि अणुश्री मनाने एकत्र आले असले तरी त्यांची वास्तवात भेट होऊ द्यायची नाही हा चंग त्याने बांधला. भरतच्या गरिबीचा फायदा घेत त्याची आर्थिक गळचेपी करायची आणि पक्याला बऱ्याच गोष्टी पुरवून भरतच्या खोड्या काढण्यासाठी पक्याला प्रोत्साहन द्यायचे, असा उद्याोग शामने आरंभला. पण नमते घेतो तो भरत कसला! अखेर भरत आणि अणुश्रीचे मिलन झाले. आता पक्याही कावला होता. त्याने चिनूकडून लांगूलचालन करून मिळविलेल्या गोष्टींच्या बळावर अणुश्रीच्या बहिणीशी संधान साधले. हे करताना त्याने शामला विचारातही घेतले नाही. शत्रुत्व असणाऱ्या दोन घरांत एकाच घरातील बहिणी दिल्यामुळे भरत आणि पक्याला आता ना खुलेआम भांडता येत आहे ना शत्रुत्व शांत बसू देत आहे…
भारतीय उपखंडातील अण्वस्त्रसज्जतेचा हा आधी औत्सुक्याचा मात्र नंतर रटाळ आणि गुंतागुंतीचा झालेला हा सारीपाट!
‘बुद्धाच्या स्मितहास्या’मुळे १९७४ मध्येच भारताची अणुस्फोट करण्याची क्षमता प्रदर्शित झाली असली, तरी काही वैज्ञानिक आणि सामरिक त्रुटी उरल्या होत्या. आण्विक-विखंडन तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेत पारंगत झाल्यानंतर भारतीय वैज्ञानिकांना आण्विक-केंद्रीकरणाचे म्हणजेच हायड्रोजन बॉम्बचे वेध लागले होते. भारताच्या अणुऊर्जा आयोगाकडे याचा आराखडा १९८० पासून होता; मात्र खात्रीशीर उपयोजनासाठी प्रत्यक्ष चाचणी गरजेची होती. १९७४ च्या चाचणीत वापरलेल्या आण्विक स्फोटकाच्या ढाच्याचे वजन १४०० किलोहून अधिक होते. क्षेपणास्त्रांच्या साह्याने त्याचे वहन करण्यासाठी लहान आकारातील स्फोटकांचे आरेखन करणे गरजेचे होते. तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह आण्विक चाचणीचे परिणाम मोजण्यासाठी एक्स-रे रेडिओग्राफी, फायबर ऑप्टिक सेन्सर्स वगैरे आधुनिक उपकरणांचा वापर १९७४ मध्ये केला गेला नव्हता. अमेरिका आणि रशिया शेकडो आण्विक चाचण्या करून आपल्या अण्वस्त्रांमध्ये सुधारणा करीत होते तेव्हा केवळ एका चाचणीवर अवलंबून राहणे भारतीय वैज्ञानिकांना अण्वस्त्र असून खोळंबा झाल्यासारखे वाटत होते. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी १९९८ मध्ये ‘ऑपरेशन शक्ती’अंतर्गत तीन दिवसांत पाच स्फोटांची चाचणी भारताद्वारे घेण्यात आली.
‘ऑपरेशन शक्ती’चा पाठपुरावा करण्यामागे वैज्ञानिक किंवा सामरिक कारणांपेक्षा राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटक मुख्यत्वाने कारणीभूत होते. १९९० च्या दशकात भारतीय राजकारण अस्थिरतेच्या गटांगळ्या खात होते. विशेषत: राम मंदिर आंदोलनाने पकडलेला जोर, भाजप आणि हिंदुत्ववादी राजकारणाला जनतेत वाढता पाठिंबा यामुळे तत्कालीन राजीव गांधी सरकारला काहीतरी लक्षवेधक करणे गरजेचे होते. पुढे जाऊन बोफोर्सच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा आणखी डागाळली. त्याच वेळी पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेच्या तयारीचे काही अहवाल प्रसिद्ध झाल्यामुळे भाजप नेत्यांनी शेजारी राष्ट्रांच्या सज्जतेबद्दल भाष्य करताना भ्रष्टाचार आणि आत्मसंकुचिततेबद्दल काँग्रेसला बोल लावणे सुरू केले. यातून मार्ग काढण्यासाठी कणखर सरकारचे प्रतीक म्हणून अण्वस्त्र चाचणीचा प्रस्ताव नरसिंह राव सरकारपुढे मांडण्यात आला. मात्र त्या वेळी, अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती आणि चाचणीनंतरच्या आर्थिक निर्बंधांची भीती यामुळे राव सरकारने अण्वस्त्रचाचणी लांबणीवर टाकली.
याउलट भाजपच्या १९९६ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे ‘अण्वस्त्रे अंगीकारण्याचा पर्याय वापरण्या’चे आश्वासन देण्यात आले होते. अणुसामर्थ्य हा संस्कृतीचा अभिमान आणि सार्वभौमत्वाचा प्रश्न म्हणून मांडला गेला होता. १९७४ नंतर आण्विक सामर्थ्याबद्दल संदिग्ध असलेल्या जनतेला हा रोखठोक पर्याय भावला होता. मात्र १३ दिवसांच्या अल्प कार्यकाळामुळे भाजपला हे आश्वासन तडीस नेता आले नाही. तत्पूर्वी १९९५ मध्ये राव सरकारच्या काळात, पोखरणमध्ये या स्फोटांसाठी चाचपणीवजा तयारी करत असताना सीआयएच्या उपग्रहाला अनियमित हालचाली जाणवल्या. त्यामुळे क्लिंटन सरकारने भारताला सज्जड दम भरला होता. या पार्श्वभूमीवर केवळ एका वर्षात अण्वस्त्रचाचणी करणे सरकारला जड गेले असते. मात्र मार्च १९९८ मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेवर आल्यावर, पक्षाने हे आश्वासन पटकन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला राजकीय आणि सामरिक अशा दोन्ही बाजू होत्या. एकीकडे या चाचण्यांद्वारा भाजपने एक कणखर, निर्णायक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी हेळसांड न करणारा पक्ष म्हणून स्वत:ची प्रतिमा मजबूत केली आणि १३ पक्षांच्या कडबोळे सरकारला आश्वासक पर्याय दिला. सरकारने सत्ताग्रहणानंतर केवळ दोन महिन्यांत केलेल्या या चाचणीमुळे राजकीय श्रेय सर्व सत्ताधारी पक्षांमध्ये वाटले गेले, त्यामुळे सरकारला स्थिरता आली. एवढे करूनही ते सरकार केवळ १३ महिनेच टिकले. आश्चर्य म्हणजे राष्ट्रीय सामर्थ्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या कृतीनंतर लोकांचा बिनदिक्कत पाठिंबा सरकारला मिळेल अशी अपेक्षा असताना केवळ चार महिन्यांत कांद्याचे भाव दहापट वाढले म्हणून देशभर निदर्शने सुरू झाली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर, अण्वस्त्र प्रसारबंदी करारानुसार (एनपीटी) जगाचे ‘अण्वस्त्रसंपन्न’ (अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि यूके) आणि ‘अण्वस्त्रविहीन’ वर्गीकरण केले गेले होते. हे भारताला वसाहतवादी काळातील शक्तिसंतुलनाचा विस्तार वाटत होते. १९७० मध्ये २५ वर्षांसाठी केलेल्या या वर्गीकरणाला १९९५ मध्ये बेमुदत स्थगिती मिळाली. म्हणजेच भारताचा आण्विक राष्ट्र बनण्याचा हक्क कायमचा हिरावून घेतला गेला. याच वेळी सर्व प्रकारच्या अणुचाचण्यांवर बंदी घालणाऱ्या सर्वंकष (अणु) चाचणी बंदी कराराची (‘सीटीबीटी’ची) अंमलबजावणी १९९६ मध्ये होणार, याचा घोर भारतीय धोरणकर्त्यांना होता. त्यांची (त्या वेळी रास्त) भीती अशी की, एकदा सीटीबीटी अमलात आल्यानंतर अणुचाचण्या करणे राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या अशक्य ठरून भारताचा अणुकार्यक्रम अनिश्चिततेच्या गर्तेत गेला असता. १९९५ मध्ये सीटीबीटी वाटाघाटींच्या अगोदरच चीनने केलेल्या अणुचाचण्यांनी हा असमतोल उघडकीस आणला. ‘एनपीटी’मध्ये सहभागी असूनसुद्धा चीन आपले अणुसाठे अत्याधुनिक करत होता; तर भारताला अण्वस्त्रांपासून वंचित ठेवले होते. त्यातच बीजिंगने इस्लामाबादला गुप्तपणे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान (उदा. एम्-११ क्षेपणास्त्रे) आणि अणु तंत्रज्ञान हस्तांतरित केले होते. ‘एनपीटी’च्या चिनी पायमल्लीवर काहीच कारवाई झाली नाही, त्यामुळे ही प्रतिबंध व्यवस्था फसवी आहे असे भारताचे मत झाले.
१९९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, चीनच्या मदतीने पाकिस्तानने कहुटा येथे समृद्ध युरेनियम वापरून गुप्तपणे अण्वस्त्रे विकसित केली होती. १९९० मध्ये काश्मीरमधील घुसखोरी वाढली होती तेव्हाच पाकिस्तानच्या आण्विक सामर्थ्याच्या बातम्या बाहेर येत होत्या. या परिस्थितीत काश्मिरातील अशांतता अणुयुद्धापर्यंत जाण्याची शक्यता होती. त्यातच अमेरिकेने १९९५ मध्ये ब्राउन सुधारणेद्वारा अफगाणिस्तानात लढण्यासाठी पाकिस्तानला ३६८ दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत आणि अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमाने दिल्यामुळे भारत लष्करीदृष्ट्या उघड्यावर पडला होता. तिकडे पाकिस्तान निर्बंध झुगारून उत्तर कोरिया, इराण वगैरे राष्ट्रांना संवेदनशील अणुतंत्रज्ञान विकत होता. भारताच्या १९९८ मधील चाचणीनंतर काही आठवड्यांत पाकिस्तानने चाचणी केल्याने भारताचा संशय खरा ठरला.
मात्र १९९८ च्या चाचणीनंतर भारताला मोठी किंमत चुकवावी लागली. अमेरिकेने १९९४ च्या ‘ग्लेन सुधारणे’वर बोट ठेवून भारतावर कडक निर्बंध लादले. ५१.३ दशलक्ष डॉलर्सची द्विपक्षीय मदत रोखली, ५०० दशलक्ष डॉलर्सची कर्जे अडवली आणि एन्रॉनच्या २.५ अब्ज डॉलर्सच्या वीज प्रकल्पावर बंदी आणली. जपानने १.२ अब्ज डॉलर्सची कर्जे रद्द केली, तर जी-७ देशांनी नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेतर्फे फार तर मानवतावादी कर्जेच भारताला मिळावीत, असा हेका धरला. रेटिंग एजन्सींनी भारताची गुणवत्ता कमी केल्यामुळे देशातून ४.२ अब्ज डॉलर्सचे भांडवल बाहेर पडले आणि रोखे बाजारात २७ टक्के घसरण झाली.
केलेल्या अपरिमित धाडसाची काही किंमत मोजावीच लागणार होती! मात्र नंतरच्या काही वर्षांत अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांशी सहकार्य करून, ‘एनपीटी’बाहेर राहूनही भारतकेंद्रित आण्विक व्यवस्था उभारण्यात आपल्या देशाने यश मिळविले. एके काळी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी झगडणारा भारत अण्वस्त्रांच्या विश्वात दिमाखाने वावरू लागला. महासत्तांच्या जगात एखादी तिसऱ्या जगातील लोकशाही वादळ आणू शकते यावर ‘ऑपरेशन शक्ती’ने शिक्कामोर्तब केले.

संमतीसाठी आलेल्या विधेयकावर राज्यपालांनी पहिला निर्णय महिनाभरात, तर पुढील कार्यवाही तीन महिन्यांत करण्याचा दंडक घालून देणाऱ्या निकालाचे स्वागत…
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तमिळनाडूसंदर्भात दिलेला निकाल ही केवळ तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांना एकट्याला लगावलेली चपराक नाही. हा निकाल देशातील समस्त राजभवनी महामहिमांच्या श्रीमुखात भडकावतो. त्याचे महत्त्व समजून घेण्याआधी गेल्या काही वर्षांत देशातील भाजपेतर राज्यांतील राज्यपालांच्या उच्छादाची दखल घ्यावी लागेल. अन्य पक्षीय सरकारांना वाकवण्यासाठी राजभवनांतील नाना-नानी उद्यानांचा वापर करणारा भाजप हा पहिलाच पक्ष आहे असे नाही. काँग्रेसच्या काळातही हे झाले. पण त्या काळात निदान आदरणीय म्हणता येतील अशा व्यक्ती, जसे की पी. सी. अलेक्झांडर, एअर चीफ मार्शल आय. एच. लतीफ इत्यादी, या पदासाठी निवडल्या जात आणि जे इतके आदरणीय नसत ते निदान निष्पक्षतेचा आव तरी आणत. तथापि गेल्या दहा वर्षांत ही किमान पातळीही सोडली गेली आणि राजभवनांत पक्षांतील निरुपद्रवी/ उपद्रवी वृद्धांची सोय करण्याची प्रथा पडली. हे कृतकृत्य राज्यपाल मग कोणत्याही थरास गेले. उदाहरणार्थ महाराष्ट्राचे भगतसिंह कोश्यारी वा तमिळनाडूचे रवी. या धरबंध सोडलेल्या राज्यपालांस खरे तर सत्ताधारी पक्षाने आवरायला हवे होते. पण ते पाहुण्याच्या वहाणेने विरोधी पक्षीयांचा विंचू ठेचण्याच्या आनंदात मग्न. ‘लोकसत्ता’ने सातत्याने राज्यपालांच्या नियमबाह्य वर्तनावर आसूड ओढले. ‘राजभवनी कंडूशमन’ (१४ फेब्रुवारी २४), ‘राज्यपाल की मेंढपाल’ (१५ ऑक्टोबर २०), ‘या राज्यपालांना आवरा…’ (२५ मे २०), ‘राजभवनातील राधाक्का’ (१० ऑगस्ट २२) आदी संपादकीयांत या मोकाट सुटलेल्या राज्यपालांस वेसण घालण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल ती पूर्ण करतो. ही समाधानाची बाब.
‘‘निवडून आलेल्या सरकारने संमत केलेली विधेयके अनंत काळ रोखून धरण्याचा अधिकार राज्यपालांना नाही’’ असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या पायात पाय घालण्याचा राज्यपाल रवी यांचा प्रयत्न ‘घटनाबाह्य’ ठरवला. इतकेच नाही; तर या राज्यपालाने अडवून धरलेल्या तब्बल १० विधेयकांस ‘महामहिमांची मंजुरी आहे; असे समजावे’ असा निकाल दिला. या दहापैकी काही विधेयके २०२० सालच्या जानेवारी महिन्यातील आहेत. म्हणजे त्यास पाच वर्षांहून अधिक काळ लोटला. ती मंजूर करण्यास या राज्यपालांस वेळ मिळाला नाही. एखादे विधेयक विधानसभेने मंजूर करून राज्यपालांकडे पाठवले की कित्येक महिने ते त्यावर निर्णयच देत नसत. सरकारने फारच तगादा लावला की ही विधेयके नामंजूर करून पुन्हा सरकारकडे पाठवली जात. त्यामुळे सरकारला ती पुन्हा एकदा विधानसभेत मंजूर करवून घ्यावी लागत. वास्तविक, विधानसभेने पुन्हा संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्याखेरीज अन्य पर्याय राज्यपालांस नाही हे साधे शालेय नागरिकशास्त्र शिकलेल्यासही कळेल. पण रवी पडले निवृत्त आयपीएस. आयुष्यभर गणवेषीय उच्चपदस्थ चाकरी करणाऱ्यांच्या ठायी एक प्रकारे ‘मी म्हणेन ती पूर्व’ अशी वृत्ती तयार होते. रवी यांच्यात ती निश्चित असणार. कारण विधानसभेने दुसऱ्यांदा मंजूर केलेली विधेयकेदेखील हे महामहीम प्रदीर्घ काळ दाबून ठेवत. राज्य सरकारने त्याविरोधात फारच बभ्रा केला की या विधेयकांचा चेंडू राष्ट्रपतींच्या अंगणात टोलवला जात असे. त्या स्वतंत्र विचार करून निर्णय घेण्याबाबत राजभवनी निवासितांपेक्षा गुणांनी सरस असल्याचे उदाहरण तूर्त तरी नाही. सबब तेथेही ही विधेयके विनानिर्णय पडून राहत. अखेर तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याइतके ‘सौजन्यशील’ नसल्याने त्यांच्या सरकारने या महामहिमांस न्यायालयात खेचण्याचे कष्ट घेतले. त्याचे फळ त्यांस मिळाले.
लोकनियुक्त सरकारने विधानसभेत बहुमताने मंजूर केलेल्या विधेयकाविरोधात नकाराधिकार वापरण्याचा अधिकार राज्यपालांस नाही, इतक्या स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या पीठाने घटनात्मक वास्तव स्पष्ट करून ‘राज्यपाल’ या पदास नियमांच्या चौकटीत आणले. मंजूर केलेले विधेयक समोर आल्यावर राज्यपालांस तीन पर्याय असतात. ते मंजूर करणे, नाकारणे आणि राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवणे. यातील तिसरा पर्याय निवडायचा असेल तर राज्यपालांनी तो वेळीच निवडायला हवा, आधीच्या नकारानंतर विधानसभेने तेच विधेयक जसेच्या तसे मंजूर केल्यावर मग ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ धाडण्याची सोय राज्यपालांस नाही. दुसऱ्यांदा विधेयक मंजूर झाल्यास त्यास मुकाट संमती देण्यास राज्यपाल बांधील आहेत. हे सर्व मुद्दे या निकालात सर्वोच्च न्यायालय स्पष्ट करतेच. पण त्याच वेळी राज्यपालांस विधेयक मंजुरीसाठी वेळेची मुदत घालून देते. यापुढे राज्यपालांस मंजूर होऊन संमतीसाठी आलेल्या विधेयकावरील पहिला निर्णय एका महिन्याच्या आत घ्यायला हवा आणि अन्य निर्णयांसाठी तीन महिन्यांखेरीज अधिक वेळ त्यांना मिळणार नाही. मुळात प्रदीर्घ काळ विधेयकावर निर्णयच घ्यायचा नाही आणि तो घेतला जावा यासाठी आरडाओरडा झाल्यावर ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा राजकीय चलाखपणा भाजपेतर राज्यांचे राज्यपाल अलीकडे वारंवार करताना दिसतात. ही सोय यापुढे बंद होईल. तमिळनाडूच्या रवी यांस राज्यघटनेच्या मात्रेचे चार कडू वळसे चाटवताना न्यायालयाने सर्वच राज्यपालांसाठी विधेयक मंजुरीची नियमावली आखून दिली.
या निकालातील सर्वोत्तम बाब ही. राज्यपाल/राष्ट्रपती या घटनात्मक पदांचा आपल्याकडे निष्कारण बागुलबुवा आहे. हे महामहीम राजभवनी जो खर्च करतात, त्याचा ना हिशेब दिला जातो ना त्याची चर्चा विधानसभेत करता येते. कारण राज्यघटनेने दिलेले संरक्षण. वास्तविक अन्य सर्व पदांइतकेच या पदाचेही अवमूल्यन झाले असून त्या पदावरील नियुक्त्या केवळ पक्षीय सोयीसाठी आणि विरोधकांच्या गैरसोयीसाठीच केल्या जातात. विरोधकांची जो अधिक गैरसोय करू शकेल तो सत्ताधीशांस अधिक प्रिय. त्यातून घटनात्मक पदावर नेमल्यावर तरी आपल्या धन्याची चाकरी करताना दिसणे बरे नाही; इतकाही विचार न करणारी मंडळी राजभवनी बसवली गेली. तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? तमिळनाडूचे राज्यपाल रवी त्यातलेच. पंजाब, पश्चिम बंगाल, केरळ, राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेसचे सरकार असताना महाराष्ट्र अशा अनेक भाजपेतर राज्यांत या महामहिमांनी धुडगूस घातला. त्यांस आळा घालण्याची गरज होतीच. ते काम तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायदा होतो. त्यामुळे यापुढे देशभरात भाजपेतर राज्यांत मोकाट सुटलेल्या महामहिमांस वेसण घातली जाईल. ‘‘दुसऱ्यांदा विधानसभेत मंजूर झाल्यानंतर एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या निर्णयासाठी राखून ठेवण्याची सुविधा राज्यपालांस नाही’’, इतक्या नि:संदिग्धपणे न्या. पारडीवाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नोंदवतात. तमिळनाडूचे राज्यपाल रवी यांनी रोखून ठेवलेली १० विधेयके मंजूर झाल्याचे समजावे (डीम्ड टू हॅव बिन रिसीव्हड अॅसेंट) असेही सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आणि त्यावर राष्ट्रपतींच्या कार्यालयाने काही निर्णय घेतलेले असल्यास तेही कायद्यानुसार अस्तित्वात नाहीत (नॉन-एस्ट) असे समजावे, असे स्पष्ट केले. अशा तऱ्हेने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक ठरतो. आता सर्वोच्च न्यायालयाने आपली नजर अशाच दुसऱ्या घटनात्मकतेच्या आवरणाखाली राजकारण करणाऱ्या पदांकडे वळवावी.
ते म्हणजे विधानसभांचे सभापती वा अध्यक्ष. वर्षानुवर्षे हे सभापती म्हणवणारे पक्षांतराच्या मुद्द्यावर निर्णय घेत नाहीत. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाच्या सभापतींस यावर सुनावले. पण परिस्थिती या असल्या केवळ सुनावण्याने सुधारणारी नाही. राज्यपालांस दिला तसा तडाखा सभापतींनाही हवा. अशोभनीय वागणाऱ्या महामहिमांच्या श्रीमुखात लगावणे लोकशाही रक्षणासाठी गरजेचे आहे. ही एक गरज पूर्ण केल्याबद्दल न्यायपालिकेचे अभिनंदन.

‘मौनं सर्वार्थ अ-साधनम्’ हा अग्रलेख (८ एप्रिल) वाचला. लष्करी व आर्थिक सामर्थ्याचा वापर व जगभरातील तेलाच्या व्यवहारावर कब्जा यामुळे अमेरिकी डॉलर मजबूत जागतिक राखीव चलन म्हणून उदयास आले. डॉलरच्या मजबुतीमुळे अमेरिकेतील उत्पादन उद्योगांचे स्थलांतर भारत, चीन, जपान, व्हिएतनाम यांसारख्या देशांमध्ये झाले. त्यामुळे निर्यातीपेक्षा उत्पादनांची आयात वाढवून व्यापारी तूट वाढली. तसेच राष्ट्रीय कर्ज ३४ ट्रिलियन डॉलर्स झाले असून दरवर्षी त्यावर अमेरिकेला एक ट्रिलियन डॉलर्स व्याज भरावे लागते. त्यासाठी नवीन पैसा छापला जात असल्याने महागाई वाढून ट्रेजरी बंधपत्रे बाजारावर परिणाम होत आहे. तूर्तास यावर उपाय म्हणून डॉलरचे अवमूल्यन करणे उत्पादन उद्योगांसाठी सोईस्कर वाटत असले तरी महागाई, कर्जरोखे बाजार, परदेशी गुंतवणूक व व्यापार यांसारख्या बाह्य घटकांवर याचा विपरीत परिणाम होईल. तसेच व्यापारी अधिशेषातून जपान, चीन, भारत, युरोपियन युनियनने अमेरिकेच्या ट्रेझरी बंधपत्रे बाजारामध्ये गुंतवलेल्या डॉलरच्या परताव्याबद्दल वाटाघाटी करणे हाही पर्याय ट्रम्प यांना सतावत आहे. शीतयुद्धाच्या वेळी संरक्षणासाठी व आर्थिक मदतीसाठी युरोपीय राष्ट्रे १९८५च्या प्लाझा करारात सामील झाली. परंतु समकालीन बहुध्रुवीय जगात भारत, चीन, जपान व दक्षिण आशियाई राष्ट्रांचे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारातील वाढते प्रस्थ व संरक्षणाची नसलेली गरज यामुळे ही राष्ट्रे ट्रम्प यांना कितपत साथ देतील याबद्दल शंका आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरचे अवमूल्यन, कर्जरोखे बाजार, राष्ट्रीय कर्जावरील वाढत्या व्याजाचा कर्ज सापळा यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन ट्रम्प यांनी इतर देशांवर कर लादले, जेणेकरून प्रमुख राष्ट्रे एका मंचावर येऊन अमेरिकेला वाटाघाटी करणे सोपे जाईल. परंतु स्वत:स धुरीण राष्ट्र म्हणविणाऱ्या अमेरिकेने केवळ राष्ट्रहितासाठी जागतिक अर्थव्यवस्था वेठीस धरणे कितपत योग्य आहे? म्हणून बहुचलनी अर्थव्यवस्थेची गरज असून ब्रिक्सचा शस्त्र म्हणून वापर करणे संतुलित राहील.
● दादासाहेब व्हळगुळे, कराड
जाहिरातबाजी करणारे जबाबदारी घेतील?
‘मौन सर्वार्थ अ-साधानम्’ हे संपादकीय (८ एप्रिल) वाचले. चीन, सिंगापूरसारखी उदाहरणे समोर असताना भारत सरकारची काहीच हालचाल दिसत नाही. मनमोहनसिंग यांची हेटाळणी ‘मौन’मोहनसिंग करणारे आता स्वत:ही दीर्घ मौनव्रत धारण करताना दिसतात. अर्थसंकल्पात अमेरिकेहून आयात होणाऱ्या वस्तूंवर भरीव करकपात करून भरताने अमेरिकेला खूश करण्याचा प्रयत्न केला. आपली शस्त्रे म्यान केली. अमेरिकेने भारतीयांची अत्यंत लज्जास्पद रीतीने पाठवणी केली आणि त्यावर परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत जे उत्तर दिले ते पाहून अमेरिकेच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्या इतपतही गुण सरकारला मिळाले नाहीत. भारतात ‘परीक्षा पे चर्चा’ करताना विद्यार्थ्यांना उपदेशाचे डोस पाजणे सोपे गेले पण जेव्हा अमेरिकेच्या परीक्षेला बसण्याची वेळ त्यावेळी घाम फुटला. जगभर नव्या आव्हानांना सामोरे कसे जायचे याची तयारी अनेक राष्ट्रे करीत होती तेव्हा आपल्याकडे अशा काही नियोजनाची गरज आहे याचेच भान नव्हते. इतिहासात रमणाऱ्या सरकारला वास्तव आव्हानांचे भान आहे असे वाटत नाही. निवडणुकीवेळी आपल्या सरकारच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजाराला कशी झळाळी आहे, हे सांगणारे सत्ताधारी आता शेअर बाजार सातत्याने गडगडत असताना ‘मौनीबाबा’ झाले आहेत. सरकारने अर्थव्यवस्थेचे अवास्तव चित्र रंगवण्यातच धन्यता मानली आता तो फुगा फुटला असताना जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नाही.
● प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर
भारतीय मात्र आजही झोपलेलेच
‘मौनं सर्वार्थ अ-साधनम्’ हे संपादकीय वाचले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी लाखो अमेरिकी नागरिक रस्त्यावर उतरले हे तिथे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. आपण सत्तेवर आल्यास प्रत्येक अमेरिकी नागरिकास चांगले दिवस येतील, त्यांची संपत्ती वाढेल, गुंतवणुकीवरील परतावा सशक्त होईल इत्यादी आश्वासने ट्रम्प यांनी दिली होती. जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकणे व सत्तेवर येताच आपल्या भांडवलदार मित्राच्या हिताच्या योजना राबविणे हेच ट्रम्प यांचे धोरण दिसते. आपल्याकडेही ‘अच्छे दिन आयेंगे’, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू इत्यादी जुमलेबाजीने सत्ता मिळविली गेली. आपली स्थिती अधिक वाईट आहे. आपण अजूनही झोपलेलेच आहोत.
● प्रा. एम. ए. पवार, कल्याण
आयात करावर ‘मन की बात’ कधी?
‘मौनं सर्वार्थ अ-साधनम्’ हा अग्रलेख (८ एप्रिल) वाचला. अमेरिकेतील मतदारांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’च्या घोषणेवर फिदा होऊन ट्रम्प यांना निवडून दिले. परंतु आज परिस्थिती अशी आहे की संभाव्य महागाईच्या चटक्यांची चिंता अमेरिकी नागरिकांना भेडसावू लागली आहे. जनता आता ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊ लागली आहे. चीनने अमेरिकेस जशास तसे उत्तर दिले असता ट्रम्प यांनी त्या देशावर ५० टक्के कर लादण्याची धमकी देणे अनाकलनीय आहे. ट्रम्प यांच्या अशा आततायी निर्णयांमुळे जगावर येऊ घातलेल्या मंदी विरोधात भारतीय पंतप्रधानांनी माध्यमांपुढे येऊन ‘मन की बात’ करणे आवश्यक आहे.
● प्रवीण आंबेसकर, ठाणे
किमान वोंग यांचा कित्ता गिरवा
‘बोटीच्या बुडाचे भगदाड’ (७ एप्रिल) आणि ‘मौनं सर्वार्थ अ-साधनम्’ (८ एप्रिल) हे दोन्ही अग्रलेख वाचले. एका अविचारी माणसाने आपल्या अहंकाराने साऱ्या जगाला वेठीस धरले आहे आणि त्यावर विश्वगुरू म्हणून मिरवणारे चकार शब्दही काढत नाहीत, हे जागतिक महासत्ता होण्याचे दावे करणाऱ्या देशाला परवडणारे नाही. सिंगापूरसारख्या लहान देशाचे पंतप्रधान असलेल्या लॉरेन्स वोंग यांनी या विरोधात आवाज उठवला ही खरेच अभिनंदनीय बाब! किमान वोंग यांचा कित्ता जरी उर्वरित राष्ट्रांनी विशेषत: भारताने गिरवला तरी या व्यापार युद्धात होरपळणाऱ्या समस्त नागरिकांच्या जखमेवर हळुवार फुंकर घातल्यासारखे होईल. अन्यथा हे मौन आपल्या अर्थव्यवस्थेला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.
● प्रा. मार्तंड औघडे, भाईंदर
‘बहिणीं’नी विश्वास कसा ठेवला?
‘बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहिणींच्या नावे कर्ज’, हे वृत्त (लोकसत्ता- ८ एप्रिल) वाचले. मुळात सरकारने लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या मुहूर्तावर १५०० देणे चुकीचे होते. हे त्यांना ऐतखाऊ बनवण्यासारखे आहे. ज्या महिलांना छोटा उद्योग सुरू करायचा असेल, त्यांना आर्थिक हातभार म्हणून, निदान पाच हजार तरी देणे आवश्यक होते. परंतु सरकारच्या डोळ्यांपुढे काहीही करून निवडणुका जिंकणे हेच एकमेव उद्दिष्ट होते. लाडक्या बहिणींनीदेखील घेतलेल्या दीड हजार रुपायांना जागून मतदान केले व भाजपने निवडणूक जिंकली. परंतु आता भामटे या योजनेच्या वाहत्या गंगेत चांगलेच हात धुवून घेत आहेत. प्रश्न हा आहे की असा गैरव्यवहार सुरू असताना लाडक्या बहिणींना हे कोण, कोठून आले, असा प्रश्नच पडला नाही? त्यांनी डोळे झाकून विश्वास कसा काय ठेवला? ६५ महिलांनी अनेक महिने हप्ता न भरल्याने कंपनीच्या वरिष्ठांना शंका आली आणि पुढचा अनर्थ तरी टळला.
● गुरुनाथ मराठे, बोरिवली (मुंबई)
आरोग्य योजना हा निवडणूक जुमला?
‘दीनानाथ’कडून नियमांचे उल्लंघन’ ही बातमी (लोकसत्ता ८ एप्रिल) वाचली. अत्यवस्थ रुग्णांना उपचार नाकारू नयेत, असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. रुग्णालयाच्या कबुलीजबाबात श्रद्धा किती, अंधश्रद्धा किती हे कोण तपासणार? धर्मादाय आयुक्त, न्यायालयाचे आदेश, धुडकावून धर्मादाय आणि खासगी रुग्णालये अनिर्बंध वागून रुग्णांच्या जिवाशी खेळत असतील तर त्यांच्यावर आरोग्य विभागाचे नियंत्रण नाही, असाच अर्थ होतो. मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पंतप्रधान आयुष्मान भारत योजना वगैरेसारख्या योजनांचे लाभ त्या गर्भवतीला देता आले असते, परंतु या योजनांचा लाभ केवळ राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांतच मिळतो. जिथे मुळातच मोफत उपचार आहेत, तिथे या योजनांचे उपयोग मूल्य शून्य आहे. योजना केवळ निवडणूक काळातील जुमला असतात का?
● प्रशांत कुळकर्णी, कांदिवली (मुंबई)

मुंबई : ‘जायका’, ‘आयबीआरडी’, ‘एडीबी’ अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. यानुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही. तसेच कर्ज घेताना वित्तीय तुटीच्या प्रमाणात कर्ज घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
बाह्य कर्जासाठी सध्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना अस्तित्वात नव्हत्या. यामुळे काही विभाग थेट आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांशी व्यवहार करीत असत. यापुढे शासकीय विभागांना थेट आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही. कोणत्याही विभागाला आर्थिक सहाय्य पाहिजे असल्यास प्राथमिक प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करून त्यांची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ‘मित्रा’ या शासकीय संस्थेचे सहाय्य घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पातळीवर या संस्थेला माहिती अवगत करावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या मदतीसाठी केंद्र सरकारच्या संबंधित विभागांकडे प्रस्ताव सादर करावा लागेल. केंद्राने मान्यता दिल्यावर सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून तो केंद्र सरकारला सादर करायचा आहे.