


अमरावती : शहरातील पंचवटी येथील सिग्नलवर दोन कलाकारांची नृत्य करतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर तिखट प्रतिक्रिया उमटली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर दोघांनी माफीही मागितली. पण, या प्रकारामुळे ‘लाईक’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्याच्या नादात मर्यादा ओलांडली जात आहे का, हा प्रश्न चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील अनेक ‘इन्फ्लूएन्सर्स’चे ‘फॉलोअर्स’ लाखांमध्ये आहेत. ‘रीलस्टार्स’ मधील स्पर्धा ही आता वेगळ्याच वळणावर पोहचली आहे.
‘रीलस्टार’ देविदास इंगोले हे वाहनचालक म्हणून काम करतात. ते सांगतात, मी गोव्यात गेलो, त्यावेळी सहजपणे विदेशी पर्यटकांसोबत ‘रील’ तयार केली, ती चांगलीच गाजली, त्यानंतर मित्रांनी प्रोत्साहन दिले. पण पंचवटी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ‘रील’ तयार करणे, ही माझी सर्वात मोठी चूक होती, ती आता पुन्हा करणार नाही. देविदास इंगोले यांच्यासोबत नृत्य करणाऱ्या राणी राठोड यांनी देखील क्षमायाचना केली आहे.
२०२२ मध्ये पुष्पा-१ प्रदर्शित झाल्यानंतर ‘श्रीवल्ली’ या गाण्याच्या स्टाईलने अनेकांना भूरळ पाडली होती. या गाण्याचे मराठी व्हर्जन अमरावतीत जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील निंभोरा येथे राहणाऱ्या विजय खंडारे या तरूणाने तयार केले. ते चांगलेच व्हायरल झाले होते. विजयने त्याच्या पत्नीसोबत काढलेल्या अनेक ‘रील’ गाजल्या.
अमरावती जिल्ह्यात अनेक ‘रीलस्टार्स’चे लाखांवर फॉलोअर्स असून कमाई देखील लाखांमध्ये आहे. अमरावतीच्या राठीनगरातील शशांक उडाखे, मोर्शी तालुक्यातील बिपीन माहुरे आणि त्याची सहकारी तन्वी काकड, रवी वानखडे, प्रज्ञा राऊत, सारंग सोनवणे, अश्विन वाकोडे यांच्यासह अनेक कलावंतांनी समाज माध्यमांवर स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
चाहत्यांची संख्या महत्वाची असते. त्याचा उपयोग जाहिरात किंवा प्रमोशनसाठी होतो. त्या मोबदल्यात त्यांचे अर्थार्जन देखील होते. फॉलोअर्सची संख्या, हिट/व्ह्यूज अशा गोष्टी या कलाकारांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ठरतात. त्यावरच त्यांची आर्थिक घडी बसते. अनेक कलावंत हे सामान्य ते गरीब कुटुंबातील आहेत. त्यांनी संघर्ष देखील केला आहे.
हे कलाकार समाजातील विविध मुद्यांवर भाष्य करतात. ठाम बाजू मांडतात. तुमच्या अंगभूत कला समाज माध्यमांच्या मंचावर वापरा, दुसऱ्यांचे बघून या क्षेत्रात येऊ नका. कुणाला कॉपी करू नका, समाज माध्यमांवर देखील स्पर्धा आहे. संघर्ष करूनच यश मिळवावे लागते. येथे कुठेही शॉर्टकट नाही. कंटेट प्रभावी आणि रंजक पद्धतीने मांडता यायला हवी, असे या कलाकारांचे म्हणणे आहे.

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी (एपीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव परीक्षा व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका, तसेच ऑनलाईन लेक्चर्स घेतली जाणार आहेत, अशी माहिती ‘एपीएमए’च्या संचालिका डॉ. हिमानी तपस्वी यांनी दिली.



Couple Vulgar Video At Metro Station: दिल्ली मेट्रोमधील अनेक धक्कादायक, अश्लील व्हिडीओ वेळोवेळी समोर येत असतात. यापैकी अने व्हिडीओ तर सार्वजनिक ठिकाणी हे असं कसं करु शकतात असा प्रश्न निर्माण करण्यासारखे असतात. मात्र सध्या दिल्ली मेट्रोतील प्रकरणांनाही मागे टाकेल असा एक धक्कादायक व्हिडीओ भारताची आयटी सीटी असलेल्या बंगळुरुमधील मेट्रो स्थानकामधून समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बंगळुरुची वाटचाल दिल्ली मेट्रोच्या संस्कृतीच्या दिशेने सुरु आहे का? अशा मथळ्याखाली घडलेल्या प्रकरणाचा व्हिडीओ ‘कर्नाटक पोर्टफोलिओ’ नावाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. “सार्वजनिक ठिकाणीवरील हे लज्जास्पद वागणं नम्मा मेट्रो स्थानकावरील असून यामुळे बंगळुरुमधील सभ्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे,” अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्यासमोरच उभ्या असलेल्या तरुणीच्या टीशर्टमध्ये हात घालताना दिसत आहे. ही तरुणीही त्याला विरोध न करता घडत असलेल्या प्रकारात सहभागी असल्यासारखं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. याबद्दही पोस्टमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. “हे फारच निराशाजनक आणि चिंता करण्यासारखं आहे की काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी या अशा गोष्टी करत आहेत. मादवेरा मेट्रो स्थानकावरील ही घटना पाहून अनेकांना धक्का बसला असून लोक अस्वस्थ झाले आहेत. एक तरुण मुलगा त्याच्या गर्लफ्रेण्डबरोबर अत्यंत अश्लील कृत करताना दिसत आहे. मेट्रो स्थानकात उभा असताना हा तरुण अश्लील पद्धतीने त्याच्या गर्लफ्रेण्डच्या कपड्यांमध्ये हात घालत असल्याचं दिसत आहे. मेट्रो स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी हे असं कृत्य निंदनीय आहे,” असं या पोस्टमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करताना म्हटलं आहे.
“सार्वजनिक ठिकाणं ही लहान मुलं, महिला, कुटुंब, वयस्कर या सर्वांसाठी असतात. मात्र अशा जागांचा वापर लोक जवळीक साधण्यासाठी आणि असल्या कृत्यांसाठी करत असतील तर ते फारच अपमानास्पद आणि लज्जास्पद आहे. काही लोकांमध्ये सभ्यता आणि समाजभान नसल्याचं या असल्या प्रकारांमधून अधोरेखित होतं. लोक आजूबाजूला असताना आपण कसे वागतोय याचं या लोकांना काहीही देणंघेणं नसतं,” असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“नाती हा पूर्णपणे खासगी विषय असला तरी सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे आणि चुकीचं कृत्य करणे यामध्ये फरक आहे. सार्वजनिक ठिकाणी या दोघांमधील रेषा कधीच ओलांडली जाता कामा नये. याहून धक्कादायक बाब म्हणजे तरुण मुली हे सारं सहन करतात किंवा त्यांच्या जोडीदाराकडून केल्या जाणाऱ्या अशा गोष्टींना प्रोत्साहन देताना दिसतात. हे असं करण्यात काहीच चुकीचं नसल्यासारखं त्या वागतात. या अशा गोष्टी म्हणजे बोल्डनेस किंवा स्वातंत्र्य नाही तर हा बेजबाबदारपणे, अपमान आणि समाजभान नसल्याचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये या कृत्याचा निषेध या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
‘बंगळुरु हे कायमच विकासात्मक दृष्टीकोन असलेलं मात्र सन्मानजनक संस्कृती जपणारं शहर आहे. हल्ली असे प्रकार सर्रास घडत आहेत. आपल्या शहरांमध्ये कशाप्रकारची मूल्य जोपासली जात आहेत हा प्रश्नच आहे. सार्वजनिक ठिकाणी वागण्याच्या किमान मर्यादांकडेही का दुर्लक्ष केलं जात हे कळत नाही,’ असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई करावी. ही कारवाई सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित, व्यवस्थित आणि एकमेकाबद्दल सन्मान बाळगत कसं आचरण असावं हे दर्शवणारी असावी,” अशी अपेक्षा पोस्टच्या शेवटी व्यक्त केली आहे.



मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने पालिकेच्या शाळांमध्ये विशेष स्वछता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने केवळ चार दिवसांत या मोहिमेच्या माध्यमातून १२२ शाळांमध्ये स्वच्छता करून तब्बल ६९ टन कचऱ्याचे संकलन केले. तसेच, सुमारे ३६ टन राडारोड्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तीन हजार मनुष्यबळाच्या साहाय्याने चार दिवसांत ३७ टन टाकाऊ वस्तूही गोळा करण्यात आल्या. शाळांमध्ये सुरू असलेली ही स्वच्छता मोहीम आणखी ११ दिवस राबविण्यात येणार आहे.
महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेची सातत्याने अंमलबजावणी, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेसंबंधित जनजागृती करण्याच्या हेतूने महानगरपालिका सातत्याने स्वच्छता मोहीम राबवत आहे.
या मोहिमेला व्यापक स्वरूप देत यापूर्वी पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, महानगरपालिकेची रुग्णालये, क्रीडांगणे आदीची स्वच्छता करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या विविध शाळांमध्ये ७ एप्रिलपासून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. एकूण १५ दिवस शनिवार, रविवार वगळता ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ७ एप्रिल ते १० एप्रिलदरम्यान मुंबईतील महापालिकेच्या १२२ शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेतून एकूण ३६.६२ टन राडारोडा आणि ६९.९ टन कचरा गोळा करण्यात आला आहे. तसेच, ३७.८ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. शेकडो अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने ३ हजार ८३२ कामगार, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छता मोहिमेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ७ एप्रिल रोजी २९ शाळांमध्ये केलेल्या स्वच्छतेतून २०.१ टन कचरा गोळा करण्यात आला.
शाळांमध्ये दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत ही मोहीम राबविण्यात ये. या मोहिमेत सामाजिक संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी (इयत्ता ८ वी पुढील), स्वयंसहायता गट, गृहनिर्माण संस्था आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिक आदीं सहभागी होत आहेत.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, सोमय्या मैदान, अंधेरी क्रीडा संकुल, बोरिवलीतील कोरा केंद्र, मुलुंड क्रीडा संकुल आदी विविध क्रीडांगणांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती.