



वसई – वाहतुकांच्या नियमांचे उल्लंघन केलं तर वाहतूक पोलीस नाही तर चक्क एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तुम्हाला दंड करणार आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने हे खास एआय तंत्रज्ञानावर आणले आहे. शुक्रवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात त्याचा शुभांरभ करण्यात आला.
शहरात जागोजागी लावलेल्या कॅमेर्यातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांना एआय तंत्रत्रानाने हुडकून काढून थेट दंडाचे चलान पाठवले जाणार आहे. ही यंत्रणा पुर्णपणे स्वयंचलीत, बिनचूक आणि वेगवान असणार आहे.
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघ होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण व्हायची. ते रोखण्यााठी शहरात कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु नियंत्रण कक्षात या कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवणे, चालकांचे वाहन क्रमांक शोधणे त्यांना दंडाचे चलान पाठवणे या गोष्टी पोलिसांना कराव्या लागत होत्या. त्यात वेळ खर्च व्हायचा. मनुष्यबळ त्यात अडकून पडायचे. त्यावर उपाय म्हणून मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्मार्ट ट्रॅफिकिंग हा उफक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरात जागोजागी कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे नियत्रंण कक्षात एआय तंत्रज्ञानाशी जोडण्यात आले आहेत. कुणी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर तात्काळ एआय त्याची नोंद घेईल आणि त्याच्या क्रमांकावरून शोधून दंडाचे चलान थेट मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. कॅमेर्यातून छायाचित्रे काढून पुरावा देखील संबंधित वाहनचालकाला देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील एकमेव उपक्रम असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, अपघात रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात विनाहेल्मेट आणि दुचाकीवर तीन जणं असल्यास (ट्रीपल सीट) कारवाई केली जाणार आहे. पुढील टप्प्यात एकदिशा मार्गातून प्रवेश, चुकीच्या मार्गिकेतून वाहन चालवणे, मर्यादीत वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या शहरात दोनशे कॅमेरे आहेत. ३ हजार कॅमेरे लावण्यासाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. मार्च महिन्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यानंतर त्याची शुक्रवारपासून अमंलबजाणी सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमाअंतर्गत पोलिसांनी धावत्या वाहनांचे स्वयंचलित क्रमांक टिपणारे (एएनपीआर) कॅमेरे बसविले आहेत. वाहन कितीही वेगात असले तरी त्याचा क्रमांक या कॅमेर्यातून टिपला जातो.
अपघात करून पळून जाणार्या वाहनांना शोधणे सोप्पे होणार आहे. जे गुन्हेगारा गुन्हा करून जात असतील त्यांचाही माग या कॅमेर्याद्वारे काढता येणार आहे. हे एएनपीआर कॅमेरे देखील एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) ला जोडले असल्याने तात्काळ अशा वाहनांची माहिती मिळू शकणार आहे.

पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या एकाच्या त्रासामुळे तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पत्नीचे सावकारासोबत अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंध, तसेच सावकाराच्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर सावकारासह तरुणाच्या पत्नीलाही अटक करण्यात आली.
सचिन सतीश गिरी (वय ३७ रा. सिद्धीविनायक विहार, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र मारूती मेमाणे (वय ४५ रा. सत्यनारायण कॉलनी, फुरसुंगी) आणि गिरी यांची पत्नी कोमल (वय ३०) यांना अटक करण्यात आली. याबाबत सचिन गिरी यांची बहीण सविता संतोष भारती (वय ३९, रा. उरळी देवाची,हडपसर-सासवड रस्ता) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोमल यांचा काही वर्षापुर्वी विवाह झाला होता. सचिनने आरोपी रवींद्र याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारातून कोमलची आरोपी रवींद्र याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. व्याजाने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावल्याने सचिनने गुरुवारी (१७ एप्रिल) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
रवींद्रचा त्रास, तसेच पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर सचिन नैराश्यात होता. नैराश्य, तसेच त्रासामुळे भाऊ सचिन याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे सचिन यांची बहीण सविता गिरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.

महू (मध्यप्रदेश) – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या शेवटच्या क्रांतीचा रथ आता कोणत्याही परिस्थितीत थांबवायचा नाही. तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे,” असे प्रभावी वक्तव्य भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव य. आंबेडकर यांनी केले.
महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भारतीय बौद्ध महासभा इंदौर व मध्यप्रदेश शाखेद्वारे आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी समाजालाही या लढ्यात सामील करून घेण्याचे आवाहन केले.
“आज सरकारकडून आरक्षण, शिक्षण, नोकरी व संविधानिक हक्क हिरावण्याचे षड्यंत्र सुरू आहे. अशावेळी बाबासाहेबांच्या संस्थांची धुरा आपण वाहिली पाहिजे आणि शेवटच्या क्रांतीची मशाल पुन्हा पेटवली पाहिजे,” असे ते म्हणाले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड. एस. के. भंडारे यांनी महाबोधी महाविहाराच्या स्वामित्वासाठी चाललेल्या लढ्याचा पुनरुच्चार केला. “बुद्धगया येथील विहार संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावा ही आमची मागणी असून, १२ मे (बुद्ध पौर्णिमा) पर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बिहार मंत्रालयावर मोर्चा नेऊ,” असा इशारा त्यांनी दिला.
कार्यक्रमात भंते सुमित रत्न (लखनऊ), राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड, अध्यक्ष चरणदास ढेंगरे, आर. सी. बौद्ध, मेजर उत्तम प्रधान, मेजर शांताराम वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभम रायपूरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदौर जिल्हा शाखेचे संतोष सकपाल, कैलास इंगळे, राहुल इंगळे, नेहा इंगळे, विशाल इंगळे, सुजय बागडे, राजेश इंगळे, देवीदास गवई, रवि तायडे, गौतम वानखेडे, आनंद शेगोकार, सुनील प्रधान, निलेश वाघोदे, मिनाताई गवई, दिलीप वाकोडे आदींनी मेहनत घेतली.
दरम्यान, मध्यप्रदेश सरकारने अभिवादनासाठी आलेल्या जनतेसाठी आवश्यक सोयी न केल्यामुळे कार्यक्रमात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते प्रज्ञाशील, समता सैनिक दलाचे सचिव डी. एम. आचार्य, मेजर जनरल व्हि. डी. हिवराळे, केंद्रीय शिक्षिका सुषमाताई कसबे, अविंदाताई वाघमारे, छायाताई गवई, वैशाली बोखरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अंबाजोगाई (जि. बीड) प्रतिनिधी | गावातील ध्वनिप्रदूषणाविरोधात प्रशासनाकडे तक्रार देणाऱ्या एका महिला वकिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. गावातील सरपंच आणि त्याच्या किमान दहा कार्यकर्त्यांनी मिळून या महिलेला शेतात रिंगण करून काठ्यांनी व जेसीबीच्या पाईपने अमानुषपणे मारहाण केली. ही महिला बेहोश होईपर्यंत हल्ला सुरू होता.
मायग्रेनच्या त्रासामुळे गावातील लाऊडस्पीकर, पिठाच्या गिरण्या यांचा त्रास होत असल्याने पीडित वकिल महिलेने याबाबत स्थानिक प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या. त्या तक्रारींचा राग मनात धरून, सरपंच आणि त्याचे समर्थक आक्रमक झाले आणि शेवटी शेतात बोलावून तिला बेदम मारहाण करण्यात आली.
पीडित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्रीच उपचार करून घरी पाठवण्यात आले.
या प्रकारामुळे गावात भीतीचं वातावरण आहे. एका शिक्षित, कायदेविषयक ज्ञान असलेल्या महिलेसह असं वागणं म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा घात आहे.
प्रश्न अनुत्तरित:
हा प्रकार म्हणजे केवळ एका महिलेविरुद्ध हिंसा नसून, संविधानाच्या तत्वांवर आघात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि राजकीय नेत्यांनी याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.


ठाणे : ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीमध्ये गळती सुरू झाली आहे. ही गळती थांबण्यास काही काळ लागणार आहे. त्यामुळे, ठाणे शहरात शनिवारी (१९ एप्रिल) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा ही शहरे येतात. या क्षेत्रात स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होत असतो. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास स्टेमच्या जलवाहिनीमध्ये गळती होऊ लागली होती. त्यामुळे ही गळती दुरुस्त करण्याचे काम स्टेम कंपनीमार्फत सुरु आहे. दुरुस्तीच्या कामासाठी स्टेममार्फत होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन त्या काळात, मुंब्रा रेतीबंदर, कळव्याचा काही भाग, खारेगाव, साकेत, राबोडी, उथळसर, खोपट, घोडबंदर रोड, गांधीनगर, पोखरण रोड क्रमांक एक आणि दोन, इंदिरानगर, चरई, सिद्धेश्वर, भास्कर कॉलनी, घंटाळी येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी दिली आहे.

सातार्यात पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा गौरव
फलटण :- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव समारंभ सातार्यात शनिवार, 19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
मावळा फाउंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक व पत्रकारांच्या संयुक्त विद्यमाने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, निमंत्रक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, तसेच रवींद्र बेडकिहाळ गौरव समितीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.
या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार आणि जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. राजेंद्र सरकाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
1968 पासून गेली 57 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले बेडकिहाळ यांनी पत्रकारांवरील संकटकाळात त्वरित मदतीसाठी 1987 मध्ये ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ या स्वायत्त संस्थेची स्थापना सातारा येथून केली. तसेच कोकणातील पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे 1993 साली आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘दर्पण’ स्मारक उभारून त्यांचे कार्य उजळवले.
गेल्या 35 वर्षांपासून या स्मारकात ‘दर्पण पुरस्कार’ प्रदान करून राज्यातील गुणवंत पत्रकारांचा सन्मान केला जातो. 2010 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात 7 नवीन शाखा स्थापन केल्या. आजही वयाच्या 81व्या वर्षी ते सक्रियपणे मार्गदर्शन करत आहेत.
या सर्व प्रेरणादायी कार्यासाठी त्यांचा गौरव करण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व पत्रकार, साहित्यिक व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव समितीने केले आहे.