




फलटण : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या जडणघडणीतील मोलाचा वाटा उचललेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र गौरव महोत्सव’ व ‘गौरव यात्रा’चे आयोजन केले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ एप्रिल ते ४ मे दरम्यान ही भव्य गौरव यात्रा होत आहे.
फलटणमध्ये या गौरव यात्रेचे जिंती नाका येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, महानंदचे माजी व्हा. चेअरमन डी. के. पवार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, शहराध्यक्ष राहुल निंबाळकर, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, अशोकशेठ सस्ते, बाळासाहेब खलाटे, बाबा भोई यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरव यात्रेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील सहा महसूल विभागांतून कलश यात्रा काढण्यात येत आहे. या कलशांमध्ये छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची माती आणि राज्य समृद्ध करणाऱ्या नद्यांचे पाणी संकलित करण्यात येत आहे. मुंबईत सर्व गौरव रथांचे एकत्रित आगमन होणार असून, त्यानंतर भव्य समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यात्रेच्या दरम्यान कराड येथील प्रीती संगमाजवळ स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करून पुढील प्रवासास सुरुवात झाली. सातारा, वाई, नायगाव (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मभूमी), शिरवळ (सुभान मंगल किल्ला), लोणंद (वारी मुक्कामस्थळ), आणि ऐतिहासिक फलटण (छ. सईबाई व छ. संभाजी महाराज यांचे माहेर व आजोळ) येथे गौरव यात्रेचे जंगी स्वागत झाले.
या गौरव यात्रेत सहभागी होता आल्याने आपण स्वतःला भाग्यवान समजतो, असे आमदार सचिन पाटील यांनी नमूद केले. यात्रेच्या स्वागतानंतर स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
फलटणमध्ये झालेल्या या स्वागत सोहळ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे स्मरण व नव्या पिढीसमोर आदर्श उभा करण्याचा निर्धार या यात्रेतून दिसून येत आहे.

फलटण — फलटण येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उद्योग क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘लोकशाही मराठी पुणे रत्न सन्मान २०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पुणे येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात लोकशाही मराठीच्या वतीने पुणे रत्न पुरस्कारांचे वितरण झाले. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावतीने गोविंद मिल्कच्या अकाउंट व फायनान्स विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अमोल चावरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ग्रामीण भागातील शेकडो महिला, शेतकरी व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. फलटणमध्ये गोविंद मिल्कची स्थापना करून त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासात श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक व सीईओ श्री. धर्मेंद्र भल्ला, तसेच दुधउत्पादक महिला व शेतकरी बांधवांचा मोलाचा सहभाग आहे.
या सन्मानाबद्दल विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

India Pakistan War Latest Update : भारत आणि पाकिस्तान नात्यामध्ये निर्माण झालेली दरी आता आणखी रुंदावली असून, यामुळं दोन्ही देशांमध्ये असणारा दुरावा अतिशय कटू वळणावर आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तर, पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं अशी जनसामान्यांची मागणी असतानाच मोदी सरकारनंही पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं स्पष्ट होत आहे. इथं पाकिस्ताननं सर्वच स्तरांवर पाकिस्तानची कोंडी केलेली असतानाच आता पाकच्या अधिकाऱ्यांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांचाच थरकाप उडाला आहे. इतका की, रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या देशाच्या मंत्र्यांनी साऱ्या देशाला खडबडून जागं केलं आहे. (Pahalgam Attack Latest Update)
पाकिस्तानचे सूचना मंत्री अताहउल्ला तरार यांनी X च्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला. जिथं, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत भारताकडून पाकिस्तानवर पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये मोठा हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याचा मुद्दा त्यांनी देशापुढं मांडत चिंता व्यक्त केली.
हल्ल्याचं सावट असतानाही भारताविरोधात गरळ ओकत पाकिस्ताच्या या मंत्र्यांनी काही गंभार आरोप केले. कोणत्याही निष्पक्ष चौकशीशिवाय भारतानं थेट लष्करी पर्याय निवडण्याची तयारी दाखवली असून, यामुळं क्षेत्रीय शांतता भंग होऊ शकते आणि ही घातक बाब आहे असं ते म्हणाले. पाकिस्ताननं या प्रकरणात स्वतंत्र आणि निष्पक्ष आंतरराष्ट्रीय जाणकारांच्या मदतीनं चौकशीची मागणी केली असून, भारत मात्र या मागणीला धुडकावत संघर्षाच्या वाटेवर निघाला असल्याची उलटी बोंब तरार यांनी ठोकली.
तिथं पाकिस्तानवर भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीचं सावट असतानाच दुसरीकडे शेजारी राष्ट्राचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनीसुद्धा रॉयटर्सशी संवाज साधताना पाकिस्तान हाअ अलर्टवर असून भारतानं हल्ला केल्यास आपला देश त्याचं प्रत्युत्तर देईल असा पोकळ विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी अण्वस्त्रांचा वापर फक्त आणि फक्त देशाच्या अस्तित्वाचाच प्रश्न उद्भवल्यास केला जाईल असं म्हणत भारताला डिवचलं.
Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24-36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident.
Indian self assumed hubristic role of Judge, Jury and… pic.twitter.com/WVW6yhxTJ0— Attaullah Tarar (@TararAttaullah) April 29, 2025
तिथं पाकिस्तानचा भीतीनं थरकाप उडालेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात देशातून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी गरज भासल्यास आवश्यक कारवाईची मुभा सैन्यदलाला दिली आहे. ज्याअंतर्गत भारतीय सैन्याला ठिकाण, लक्ष्य आणि वेळ निवडण्याची मुभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा आता पंतप्रधानांनी दिलेली मुभा, पाकिस्तानच्या मनात असणारी भीती आणि सीमाभागातील तणाव पाहता पुढे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.


जबिन टी. जेकब
“जर अमेरिकेला युद्धच हवे असेल- मग ते आयातशुल्कांचे (टॅरिफ) युद्ध असो, व्यापारयुद्ध असो की आणखी कोणत्याही प्रकारचे युद्ध… आम्हीही अखेरपर्यंत ते लढण्यास तयार आहोत,” असे चिनी परराष्ट्र खात्याने महिनाभरापूर्वीच अधिकृतरीत्या ‘ट्वीट’मधून सुनावले होते, तेव्हा अर्थातच निमित्त होते ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फेंटानिल’सारख्या पदार्थांचा व्यापार रोखत नसल्याचा ठपका चीनवर ठेवून, त्या देशावर लादलेल्या अवाढव्य आयातशुल्काचे.
त्यातच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अन्य देशांवर लादलेल्या वाढीव आयातशुल्काला काही दिवस स्थगिती दिली किंवा काही सवलतीही दिल्या. त्यामुळे एकंदरीत, चीन किती ठाम आणि ट्रम्प यांच्या धमक्या किती पोकळ, असे चित्र निर्माण होऊ लागले. पण चित्र कितपत खरे आहे, याची तपासणी करायला हवी.ट्रम्प यांनी लादलेले अवाढव्य आयातशुल्क हीदेखील अमेरिकेला अविश्वासार्ह ठरवून एकाकी पाडण्याची संधी आहे, असाच विचार चिनी धोरणकर्ते करणार यात शंका नाही.
ट्रम्प हे मुळात व्यापारीच आहेत, त्यामुळे राज्यकर्ते म्हणूनही ते खर्च-फायदा यांचेच मोजमाप करणार, परंतु दीर्घकालीन धोरणात्मक नियोजन करण्यास ट्रम्प हे असमर्थ आहेत, अशी टीका चीनमध्ये अधिकच हिरिरीने सुरू झालेली आहे. या टीकेला मूक प्रोत्साहन देऊन चिनी धोरणकर्ते दोन गोष्टी करत आहेत. पहिली, व्यक्ती म्हणून ट्रम्प यांना तसेच त्यांना राष्ट्राध्यक्षपदी बसवणाऱ्या अमेरिकेला कमी लेखणे; तर दुसरी गोष्ट म्हणजे दबावाला दबावाने प्रतिसाद देण्याच्या धोरणाला वाट खुली करून देणे. ट्रम्प यांनी अन्यायकारक आयातशुल्क लादले, असा प्रचार करून चीनच्या बाजारपेठेत अमेरिकन घुसखोरीला रोखण्याचा पुकारा चिनी सत्ताधारी करू शकतात, त्यातून स्वावलंबनाच्या धोरणांना बळकटी देण्याच्या त्यांच्या दशकांपासूनच्या धोरणाचीच भलामण ते सुरू ठेवू शकतात. पण याचा परिणाम चीनमध्येच दिसेल.
जागतिक परिणाम घडवण्यासाठी, अमेरिकेविरुद्ध उभा ठाकण्यास चीन सक्षम आहे असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झालेला आहे. अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी इतर देशांनाही भाग पाडण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे सुरू आहे. कारण अमेरिकेशी तडजोड करण्यास तयार नसलेले देश जितके जास्त असतील तितका चीनचा स्वतःचा प्रतिकार अधिक मजबूत होईल. चिनी मुत्सद्दी आणि चिनी वृत्तपत्रांत सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेचा पुनरुच्चार करणारी तज्ज्ञमंडळी यांनी विशेषतः अमेरिकन सहयोगी आणि भागीदारांना लक्ष्य केले आहे . याखेरीज चीने ‘प्रादेशिक आर्थिक एकात्मता’ जपायला हवी, असाही प्रचार सुरू केला आहे, म्हणजे जपान आणि दक्षिण कोरियाशी त्रिपक्षीय मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची खटपट चीन करत आहे. हे करतानाच चिनी तज्ज्ञांनी, युरोपीय देशांना अमेरिकेच्या ‘तुष्टीकरणा’विरोधात थेट इशारा दिला आहे.
“चीनने अमेरिकेशी आयातशुल्कांच्या संदर्भात कोणतीही चर्चा सुरू केलेली नाही”, असे एप्रिलमध्ये सांगून चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने असेही स्पष्ट केले होते की, “जर अमेरिकेला चर्चा करायची असेल तर त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे… जर अमेरिकेला समस्या सोडवायच्या असतील तर त्यांनी चीनवरील सर्व एकतर्फी आयातशुल्क मागे घ्यावे.” मात्र हा इशारादेखील ट्रम्प यांच्याप्रमाणेच, आधी मोठा धाक दाखवून नंतर सवलती ोदेण्याच्या प्रकाराची सुरुवात ठरू शकतो. त्याआधी मार्च महिन्याच्या अखेरीस चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीसी) सरचिटणीस आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकन कंपन्यांसह ४० हून अधिक जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांशी खास बैठक आयोजित केली होती. तसेच एप्रिलच्या मध्यात चिनी पंतप्रधान ली कियांग यांनी निर्यातदारांना पाठिंबा देण्यासाठी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना चीनमध्ये गुंतवणूक सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांची घोषणा केली होती. उच्चपदस्थ नेत्यांकरवी सुरू असलेले हे प्रयत्न जगाचे लक्ष वेधणारे ठरले, आणि व्यापार युद्धामुळे निर्माण झालेल्या संधींचा वापर करण्याचा प्रयत्न चीन करतो आहे, असा – चीनला हवाच असलेला- संदेश जगभर जाण्यास त्यातून मदत झाली. क्षी जिनपिंग यांनी आग्नेय आशियाई देशांचे दौरे याच काळात वाढवले शिवाय, ‘ड्रॅगन-एलिफंट टँगो’ वगैरे भाषा करत भारत-चीन संबंध सुधारण्याची इच्छासुद्धा चीनने अचानक व्यक्त केलेली आहे.
पण अमेरिकेशी अशा प्रकारे व्यापार युद्ध लढल्यास, चीनमध्ये देशांतर्गत परिणाम काय होणार, याबद्दल चिंता व्यक्त होते आहेच. या चिंतांची वाच्यता होऊ नये म्हणून चिनी सत्ताधाऱ्यांकडून, खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच ‘कामगारांना कमी न करता कामावर ठेवण्यासाठी’ प्रोत्साहन योजना म्हणून काही घोषणा करण्यात आल्या आहेत. व्यापार युद्धाबाबत चीनने एक श्वेतपत्रिका काढली असून त्यात ‘अमेरिकन अर्थव्यवस्था आणि ग्राहकांसाठी द्विपक्षीय (चीन-अमेरिका) व्यापार किती उपयुक्त ठरला आहे’ अशी साखरपेरणीही चीनने केलेली आहेच.पण देशांतर्गत परिस्थितीच्या संदर्भात, अमेरिकेशी व्यापार वाढवणे किंवा आहे तितका ठेवणे चीनला भागच पडेल असे दिसते. चीनमध्ये तरुणांची बेरोजगारी ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. कोविड महामारीमुळे चिनी अर्थव्यवस्थेला फटका बसणे, हे राजकीय अपयश होते. दरम्यान, सतत सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमांवरून असे दिसून येते की चीनच्या प्रशासनातही धुसफूस आहेच. चिनी कम्युनिस्ट पक्षातर्फे विशेषतः तरुणांना ‘राष्ट्रीय पुनरुज्जीवना’च्या उपक्रमांमध्ये सामील करणे सोपे राहिलेले नाही. काही चिनी तरुण तर, अपेक्षित वेतन नाही किंवा नोकरीत कामाचे समाधान नाही, कामाचे तास जास्त आहेत, म्हणून बोलूही लागलेले आहेत.
ट्रम्प यांनी आयातशुल्क लादली नसती तर एव्हाना, बहुतेक चिनी लोकांनी त्यांच्या समस्यांसाठी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाला जबाबदार धरले असते. चिनी नेतृत्व आता या संधीचा वापर करून अमेरिकेच्या गुंडगिरीच्या वर्तनाला विरोध करण्याचे कथन (नॅरेटिव्ह) फिरवण्याचा प्रयत्न करत आहे, हेही आता लपून राहिलेले नाही. ट्रम्प यांचा २४५ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय जितका अवास्तव आहे, तितकाच निव्वळ देशांतर्गत प्रोत्साहने देऊन किंवा अमेरिकेऐवजी अन्य देशांची साथ घेऊन आपण अमेरिकेशी व्यापारयुद्ध लढत राहू शकू, हा चिनी नेतृत्वाचा आडाखाही अवास्तव आहे. त्यामुळे याऐवजी निराळे मार्गही चीनला खुले ठेवावे लागणार आहेत.
लेखक दिल्ली (नोएडा) येथील ‘शिव नाडर युनिव्हर्सिटी’त सहयोगी प्राध्यापक आहेत.


नांदेड : तीन अपत्य असल्याने तुमच्याविरुद्ध तक्रार करून नोकरी घालवू, अशी धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ५० हजारांची खंडणी घेताना एका महिलेला रंगेहात पकडले.
नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागणारे, चोरी, घरफोडी तसेच अवैध व्यवसाय चालविणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. मुखेड तालुक्यातील वसूर येथील धोंडिबा रामराव मुळे (वय ५२) हे भारतमाता ग्रामीण विकास माध्यमिक विद्यालय येथे सहशिक्षक आहेत. त्यांना तीन अपत्य असल्याने माहिती अधिकार समितीच्या राज्य अध्यक्षा वैशाली गुंजरगे, प्रशांत मुळे व अन्य दोघांनी तुम्हाला तीन अपत्ये असल्याने तुमची नोकरी घालवू, तुम्हाला जेलमध्ये पाठवू, अशी धमकी देत १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून खंडणी मागण्याचा हा प्रकार सुरू होता. २३ एप्रिल रोजी या प्रकरणात धोंडिबा मुळे यांनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वर्कशॉप परिसरातल्या एका ज्यूस सेंटरवर ५० हजार रुपयांची खंडणी घेताना वैशाली कृष्णा गुंजरगे हिला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, जमादार विशाल माळवे, गजानन किडे, सविता केळगेंद्रे, अदनान खान पठाण, सविता बाचेवाड यांनी ही कारवाई बजावली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश नाईक हे करत आहेत. भाग्यनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले असून, फरार आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.