


पुणे : अक्षय तृतीयेसाठी कोकणातून आंब्यांची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेला आंब्यांचे दर जास्त आहेत. किरकोळ आणि घाऊक बाजारात तयार आंब्यांना ग्राहकांकडून मागणी आहे. मागणीच्या तुलनेत तयार आंब्यांचा तुटवडा जाणवत आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला आंब्यांना मागणी वाढते. पूर्वजांना आंब्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. अक्षय तृतीया बुधवारी (३० एप्रिल) असून, मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून रविवारी हापूस आंब्यांच्या साडेचार ते पाच हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला कोकणातून आठ ते दहा हजार पेट्यांची आवक झाली होती. यंदा वातावरणातील बदलामुळे कोकणात आंब्यांची लागवड ५० टक्के झाली आहे. मागणीच्या तुलनेच्या आंब्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दर जास्त आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी नितीन कुंजीर आणि करण जाधव यांनी सांगितले.
घाऊक आणि किरकोळ बाजारात आंबा खरेदीसाठी मंगळवारी गर्दी झाली होती. ग्राहकांकडून एक आणि दोन डझनाच्या पेटीला मागणी आहे. एक डझन तयार आंब्यांना प्रतवारीनुसार ५०० ते ८०० रुपये दर मिळाले आहेत. दाेन डझन आंब्यांच्या पेटीला प्रतवारीनुसार ११०० ते १२०० रुपये दर मिळाले आहेत.
हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यातयंदा वातावरणातील बदलामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. सिंधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून आवक कमी प्रमाणावर होत आहे. यंदा आंब्यांचा हंगाम लवकर संपणार आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्यांचा हंगाम सुरू असतो. यंदा १० ते १५ मे पर्यंत आंब्यांचा हंगाम सुरू राहणार आहे. उष्मा वाढल्याने आंबा लवकर पक्व होत आहे, असे आंबा व्यापारी नितीन कुंजीर आणि करण जाधव यांनी नमूद केले.
यंदा हापूसचा हंगाम लवकर संपणार आहे. कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम महिनाभर उशिराने सुरू झाला आहे. अक्षय तृतीयेसाठी कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढली आहे. रविवारी (२७ एप्रिल) चार ते सात डझनाच्या तीन हजार पेट्यांची आवक कर्नाटकातून झाली, तसेच दोन डझनाच्या २० हजार पेट्यांची आवक वाढली. कर्नाटकातील आंब्यांची आवक गुरुवारपासून (एक मे) वाढणार आहे. कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम साधारणपणे १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. कर्नाटकातील एक डझन तयार आंब्यांना प्रतवारीनुसार ४०० ते ६०० रुपये डझन दर मिळाले आहेत, अशी माहिती कर्नाटक आंब्यांचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. डिसेंबर, जानेवारीत कर्नाटकातील आंब्यांना चांगला मोहोर आला होता. हवामान बदलामुळे मोहोर गळाला. त्यामुळे कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम उशिराने सुरू झाला. कर्नाटकातून पायरी, लालबाग, बदाम या आंब्यांची आवक वाढली आहे, असे उरसळ यांनी सांगितले.
अक्षय तृतीयेनिमित्त पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. दवणा, फुले, वाळा, तसेच आंबा खरेदीसाठी शनिपार, मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात मंगळवारी गर्दी झाली होती. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सकाळपासून आंबा, फुले खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

मुंबई : शिवरायांच्या वाघनखांपाठोपाठ नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळविण्यात राज्य सरकारला यश आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी केली. ही तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त आल्यानंतर शेलार यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि ही तलवार राज्य शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांना दूतावास संपर्क व या कामाची जबाबदारी देऊन फडणवीस आणि शेलार यांनी याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करून या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. यासाठी हाताळणी, वाहतूक व विमा आदींपोटी सुमारे ४७ लाख १५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून तो राज्य सरकार देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ऐतिहासिक महत्त्व
रघुजी भोसले यांची युद्धनीती आणि शौर्य पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी १७४५ मध्ये बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल, ओडिशापर्यंत केला होता. त्यांनी चांदा, छत्तीसगढ, संबळपूर यासह दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र सरकार ही तलवार घेणार असल्याने समाधान आहे. यासंदर्भात सरकारकडे विनंती केली होती. -राजे रघुजी भोसले,


सोलापूर : सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण करून पुढील वर्षांकरिता इंटर्नशिप करीत असलेल्या एका नवप्रशिक्षित तरुण डॉक्टरने राहत्या घरी स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली. जुळे सोलापुरातील कल्याण नगराजवळ एका घरात दुपारी हा प्रकार घडला.
आदित्य नांबियार (वय २३, रा. नेरूळ, नवी मुंबई, मूळ राहणार केरळ) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नवप्रशिक्षित डॉक्टरचे नाव आहे. शहरात दहा दिवसांपूर्वी ज्येष्ठ मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला असताना त्यानंतर आज मंगळवारी ही दुसरी घटना घडली.
आदित्य नांबियार यांचे वडील भारतीय नौसेना दलात व्यावसायिक सागरी सेवेत अधिकारीपदावर सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यास एक विवाहित बहीण असून ती बंगळुरूमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात सेवेत आहेत. तर आई गृहिणी आहे. नांबियार कुटुंबीय नवी मुंबईत नेरूळ येथे राहतात. आदित्य याने सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस वैद्यकीय पदवी शिक्षण नुकतेच पूर्ण केले होते. त्यानंतर पुढील वर्षांकरिता व्यावसायिक अनुभव घेण्यासाठी तो याच वैद्यकीय महाविद्यालयात आंतरवासिता (इंटर्नशिप) म्हणून सेवेत होता. त्याने दुपारी जुळे सोलापुरातील खासगी निवासस्थानी स्वच्छतागृहात स्वतःचा गळा चाकूने कापून घेतला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील त्याच्या सहकारी विद्यार्थी मित्रांसह डॉक्टर, प्राध्यापक मंडळींना धक्का बसला.
महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. नरेश झांजड यांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य नांबियार हा अभ्यासात हुशार होता. त्याने वैद्यकीय पदवी शिक्षण गुणवत्तेने पूर्ण केले होते. त्याने महाविद्यालयीन जीवनातील अडचणी किंवा आपल्या खासगी बाबींसह कोणत्याही प्रकारची एकदाही तक्रार केली नव्हती. त्याची मानसिकता उत्तम होती. परंतु त्याने अचानकपणे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचे आई-वडीलही दाखल झाले. आदित्य याच्या मृतदेहाजवळ चाकू सापडला. त्याने केलेल्या आत्महत्येचे कारण लगेचच समजू शकले नाही.



पुणे : ‘मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि कामे करताना सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा,’ अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथे केली. जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीसंदर्भातील आढावा बैठक डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकरी विठ्ठल बनोटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, कृषी, आरोग्य, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगर परिषद, पोलीस, महावितरण, वन विभाग, वन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भारतीय हवामान विभागासह सर्व संबंधित विभागांचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मुख्याधिकारी (दूरदृष्यप्रणालीद्वारे) उपस्थित होते.
जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित करून त्याची माहिती प्रशासनाला, महापालिकांना द्यावी. त्याप्रमाणे पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या आणि अन्य अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी करावी. पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पूर नियंत्रण आराखडा निश्चित करावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना वेळेत मिळेल, याबाबत नियोजन करावे. सर्व धरणांची बांधकाम तपासणी पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी, असे डुडी यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पूल, रस्ते, पूरबाधित गावे आदीबाबतची माहिती सर्व संबंधित विभाग तसेच नागरिकांना माहिती द्यावी. पूरबाधित गावांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे साठा तयार ठेवावे. साथीचे रोग आणि उपचारपद्धती आदीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कृषी विभागाने गावनिहाय पथके स्थापन करावीत. जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, अशी सूचना डुडी यांनी केली.

