





मुंबई : देशभरात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच दक्षिण भारताच्या दिशेने मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांजवळील समुद्रसपाटीवर सध्या ढगांच्या हालचाली आणि वाऱ्याचा वेग यामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. हे लक्षण वेळे आधी मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल देत आहे. सामान्यतः मोसमी पाऊस मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या भागात दाखल होतो. मात्र यंदा तो एक आठवडा आधी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निकोबार बेटांवर मोसमी पाऊस कधी दाखल होतो, यावरून भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्याची प्रगती, वेग, वेळ, आणि पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे येथील बदलांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.
निकोबार बेटांवर मोसमी पाऊस सामान्यतः १५ मेच्या आसपास दाखल होतो. भारतातील मोसमी पावसाचे सर्वप्रथम आगमन होणारा हा भाग आहे. या भागात पूर्वी १० मे, अथवा १८ ते २० मेदरम्यान मोसमी पाऊस दाखल झाला आहे . यंदा मात्र १० मेच्या आसपास मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याआधी १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ आणि २००८ साली १० मे रोजी निकोबार बेटांवर मोसमी पाऊस दाखल झाला होता.
निकोबार बेट हे बंगालच्या उपसागरात असून, येथील हवामान उष्ण व दमट आहे. वर्षभर उष्णता आणि आर्द्रता कायम असते. येथे दोन मुख्य पावसाळी हंगाम अनुभवले जातात.
निकोबार बेटांमध्ये वर्षाला ३०००- ३८०० मिमी पाऊस पडतो, तो भारताच्या इतर भागांपेक्षा अधिक आहे.
घनदाट जंगल, जैवविविधता आणि किनारपट्टीवर आधारित जीवनशैली यामुळे पावसाचा येथील जनजीवनावर मोठा प्रभाव असतो. पाऊस लवकर पडल्यास बेटांवरील शेतीला चालना मिळते.
पोर्ट ब्लेअरमध्ये २७ ऑगस्ट २०१६ रोजी २४ तासांत १७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळची २४ तासांतील ती उच्चतम नोंद होती. सामान्यतः अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे २,९६७ मिमी असते. ३० सप्टेंबर २०२३ रोजी दक्षिण अंदमानमध्ये एकत्रित पर्जन्यमान २,२२७.२ मिमी इतके नोंदवले गेले. या बेटांमध्ये पावसाचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत असल्याचेही निरीक्षणात आले आहे. विशेषतः, निकोबारमध्ये दरवर्षी सरासरी पर्जन्यमानात २.८४ मिमी वाढ होत असल्याचे एका अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.



Aadhar card, PAN card Latest Update : कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी भारतीय असल्याचा वैध पुरावा विचारल्यास आधार आणि पॅन कार्ड सादर केलं जातं आणि ते ग्राह्यसुद्धा धरलं जातं. आता मात्र भारतातील एका राज्यामध्ये हे पुरावे नागरिकांना भारताचं नागरिकत्वं सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीयेत. कारण, त्यासाठी दोन महत्त्वाचे पुरावे अनिवार्य करण्यात आले आहेत.
तिथं भारतात पाकिस्तानी नागरिकांविरोधातील कारवाईला वेग आला असून या नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी यंत्रणांनी कठोर निर्बंध लागू केले असतानाच आता दिल्लीमध्येही बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधातील कारवाईला नवं वळण मिळालं आहे.
अवैधरित्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांना आता भारतीय नागरिकत्वं सिद्ध करण्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड सादर करणं पुरेसं ठरणार नाही. तर, त्यासाठी मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट हे दोन पुरावेच अंतिम स्वरुपात ग्राह्य धरले जाणार आहेत. केंद्र शासनानं जारी केलेल्या निर्देशांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून, अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
साधारण वर्षभरापूर्वी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या पुनर्पडताळणी मोहिमेदरम्यान दिल्लीत मोठ्या संख्येनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी झाल्याची बाब लक्षात आली, जिथं ही मंडळी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड असे पुरावे दाखवून आपण भारतीय नागरिक असल्याचं भासवत होते. अनेक नागरिकांकडे तर UNHCR नं जारी केलेले शरणार्थी कार्डसुद्धा आढळले. यामुळं नागरिकांमधून भारताचे नेमके नागरिक ओळखणं आव्हानात्मक ठरलं आणि त्याच कारणास्तव आता या अवैध नागरिकांना पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र हे पुरावे सादर करणं बंधनकारक ठरणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या या कारवाईमध्ये विशेषत: पाकिस्तानी नागरिकांवर करडी नजर ठेवली जात असून, आतापर्यंत दिल्लीतील 3500 पाकिस्तानी नागरिकांपैकी 400 जणांना माघारी पाठवण्यात आलं आहे.