Friday, June 26, 2026
Home Blog Page 31

फलटण पंचायत समितीत २० लाखांचा घोटाळा; कनिष्ठ लिपिकाने पगार वाढवून केला अपहार

0
फलटण पंचायत समितीत २० लाखांचा घोटाळा; कनिष्ठ लिपिकाने पगार वाढवून केला अपहार

फलटण :- फलटण पंचायत समितीतील एका कनिष्ठ लिपिकाने आपल्या पदाचा गैरवापर करत तब्बल २० लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून संबंधित कर्मचाऱ्याची बदली पाटण येथे झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याने ऑनलाइन पोर्टलमध्ये फेरफार करून स्वतःच्या पगारात वाढ दाखवली आणि सन २०२३ ते २०२५ या कालावधीत हळूहळू ही रक्कम काढून घेतली. या प्रकारामुळे पंचायत समितीच्या कारभारातील मोठ्या त्रुटी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणाची माहिती समोर येताच विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, फलटण पंचायत समितीत गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू असून, याच काळात अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. “कुंपणच शेत खात आहे” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणात केवळ एकाच कर्मचाऱ्याचा सहभाग आहे की आणखी कुणी अधिकारी किंवा कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत, याचा तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात संपूर्ण आर्थिक लेखापरीक्षण करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.
प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोमले यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच, वरिष्ठ स्तरावरूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशांच्या समितीद्वारे चौकशी नेमावी, अशी मागणी होत आहे. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल तपास करून या घोटाळ्यामागील संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशीही मागणी होत आहे.

धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करावे – सतीश कांबळे

0
धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करावे – सतीश कांबळे

धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करावे – सतीश कांबळे


फलटण : भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था असून या संस्थेच्या वतीने आदर्शांमध्ये सम्राट अशोकाच्या प्रतिमेला स्थान देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत करूया. संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिबिराचे आयोजन मौजे विंचूर्णी येथे आपण करावे. कोणत्याही धम्म प्रचार प्रसाराच्या कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याची मी आपणाला विनंती करत आहे. प्रत्येक धर्माची आचरण पद्धती व विचारसरणी वेगळी आहे. आपल्या धम्मामध्ये सफेद वस्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सफेद वस्त्र परिधान करून आपण उपस्थित राहण्याची सुरुवात करूया. सम्राट अशोकाच्या जीवनकार्याचा प्रवास विस्तीर्ण आहे. हा संपूर्ण देश सम्राट अशोकाच्या काळात बौद्धमय झाला होता. संपूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सम्राट अशोकाचे योगदान आहे. आज आपली राजमुद्रा, तिरंग्यावरील अशोक चक्र हे त्याची साक्ष देत आहे.भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वच्यावतीने मौजे विंचूर्णी येथे आयोजित चैत्र पौर्णिमेनिमित्त धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी चैत्र पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमा, अष्टमी याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण उपोसथ व्रत धारण करावे. त्यासोबतच अष्टशिलाचे पालनही करावे.
ते पुढे म्हणाले, ‘सुजाता खीर दान हा केवळ एक धार्मिक प्रसंग नाही, तर तो मानवतेचा, करुणेचा आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा ऐतिहासिक क्षण आहे. या एका साध्या कृतीने जगाच्या इतिहासाला नवी दिशा दिली.सुजाता ही उरुवेला (आताचे बोधगया परिसर) येथे राहणारी एक श्रद्धाळू स्त्री होती. तिने एका वृक्षदेवतेला नवस केला होता की, तिची इच्छा पूर्ण झाली तर ती खीर अर्पण करेल. सुजाता खीर देताना बोधिसत्वाला म्हणाली मी दिलेल्या खिरीला आपण कृपा करून ग्रहण करावे. माझे मनोरथ जसे सफल झाले तसे तुमचेही होवो.असे म्हणून ती खिरीचे सुवर्णपात्र तिथेच ठेवून परतली. खीर प्रशांत केल्यानंतर बोधिसत्वाला थोडं बळ आले आणि ते पुन्हा ध्यान आणि चिंतनासाठी सुसज्ज झाले.
दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केल्यानंतर सिद्धार्थ गौतम अत्यंत अशक्त झाले होते. त्या अवस्थेत ते उरुवेला येथे एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते.
सुजाताने त्यांना पाहिले आणि ती त्यांना वृक्षदेवता समजली. नवस पूर्ण करण्यासाठी तिने प्रेमाने आणि श्रद्धेने तयार केलेली खीर त्यांना अर्पण केली. सुजाताच्या खिरीमुळे सिद्धार्थ गौतमाला नवचैतन्य मिळाले. त्यांनी अतितपश्चर्या सोडून मध्यम मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.याच शक्तीच्या जोरावर त्यांनी पुढे बोधगया येथे बोधीवृक्षाखाली ध्यान करून सम्यक ज्ञान (बुद्धत्व) प्राप्त केले.
स्त्रीचे योगदान आणि करुणा यांचे महत्त्व अधोरेखित होते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. मध्यम मार्ग (अतिरेक टाळणे) हा जीवनाचा योग्य मार्ग आहे. सुजातामुळेच सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाकडे प्रवास करण्यासाठी मदत झाली. जगाला बुद्ध प्राप्त झाले.

भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे माजी कार्यालयीन सचिव तथा बौद्धाचार्यआयु. चंद्रकांत मोहिते यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे लवकरच उपासिका शिबिर लावण्याविषयी व समता सैनिक दलाचे सैनिक प्रशिक्षण शिबिर लावण्याचा निर्धार केला. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे येत्या काळामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकाची प्रतिमा ही आपल्या आदर्शमध्ये सर्व कार्यक्रमांमध्ये लावण्याच्या आदेश विचारात घेऊन सर्वांनी त्याचे पालन करावे असे आव्हान केले.
आयु.अजित अहिवळे व हनुमंत अहिवळे यांनी खिरदान केले.

यावेळी दलित पँथर महाराष्ट्र राज्य सचिव रोहित अहिवळे, हनुमंत अहिवळे पोलीस पाटील विंचूर्णी, अजित अहिवळे, ओम निंबाळकर, प्रेम जगताप, सुरज अहिवळे, विंचूर्णी गावातील बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीवेळी राडा, सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकारी सतर्क, आदेश जारी

0


सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्याच्या विधिमंडळात पडसाद उमटले होते. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना त्या राड्यात दुखापत झाली होती. यानंतर हा विषय राज्याच्या विधिमंडळात माडला गेला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच 20 मार्चला झालेला राडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना महागात पडला, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातं. 20 मार्चला ज्या प्रकारे सातारा जिल्हा परिषदेत राडा झाला तसा प्रकार सभापती निवडीवेळी होऊ नये यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सतर्क झाले आहेत. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हा परिषद सभापती निवडी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. 

Satara ZP Election : जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी 4 एप्रिलला होणार आहेत. या निवडी शांततेमध्ये पार पाडल्या जाव्यात यासाठी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.  सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दरम्यान झालेल्या राड्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील ॲक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय.  4 एप्रिलला होणाऱ्या  सभापती निवडी दरम्यान सकाळी 7 वाजल्या पासून निवड प्रक्रिया होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या परिसरात 100 मीटर अंतराच्या आत मध्ये येण्यास सदस्य,पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांशिवाय इतरांना बंदी घालण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद सभापती निवडीत काय घडणार?

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आव्हान देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आमने सामने आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना पोलिसांनी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून ताब्यात घेतल्यानं ते मतदान करु शकले नव्हते. तर, कामेश कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यानं भाजपच्या बाजूनं मतदान केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लता कर्णे यांनी भाजपला मतदान केलं तर फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जगताप यांनी भाजपला मतदान केलं होतं. शिवसेनेच्या कोरेगाव तालुक्यातील हणमंत जगदाळे (कोरेगाव कुमठे)
सारिका फाळके (सातारा रोड) यांनी भाजपला मतदान केल्यानं त्यांचं संख्याबळ 33 तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं संख्याबळ 30 वर आलं होतं. आता सभापती निवडीत नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

चैत्र पौर्णिमेनिमित्त जाधववाडी येथे बुद्ध वंदना व खीरदानाचा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

0
चैत्र पौर्णिमेनिमित्त जाधववाडी येथे बुद्ध वंदना व खीरदानाचा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न


फलटण : जाधववाडी येथे चैत्र पौर्णिमेच्या परम पावन दिनानिमित्ताने अत्यंत उत्साहपूर्ण व सामाजिक जागृती घडवणारा कार्यक्रम आयु.सुभाष मारुती काकडे व रजनी सुभाष काकडे यांच्या निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात भारतीय बौध्द महासभेचे माजी कार्यालयीन सचिव तथा बौध्दाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांनी त्रिसरण, पंचशील, बुध्दपूजा, भीमस्मरण व भीमस्तुती घेऊन कार्यक्रमाची सुरवात केली. यावेळी खीरदान आणि महिला जागृतीविषयी मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुध्द, चक्रवर्ती सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आदर्शाच्या पुजनाने झाली. सर्वांना शांतता, समता आणि बंधुभावाचा संदेश दिला. यानंतर भारतीय बौध्द महासभेचे माजी कार्यालयीन सचिव तथा बौध्दाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. सम्राट अशोकांच्या धम्मप्रसाराच्या कार्यामुळे समाजात कसा बदल घडला, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांनी सुजाता हिने भगवान बुध्दांना दिलेल्या खिरीच्या दानाची कथा सांगण्यात आली. या प्रसंगातून दान, करुणा आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमात महिला जागृतीवर विशेष भर देण्यात आला. महिलांनी समाजातील आपली भूमिका, हक्क आणि जबाबदाऱ्या याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी आयुनी रजनी सुभाष काकडे (जाधववाडी) यांच्याकडून सर्वांना खीरदान करण्यात आले. हा कार्यक्रम सुभाष मारुती काकडे यांच्या निवासस्थानी पार पडला. उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चैत्र पौर्णिमेनिमित्त आयोजित हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, बौध्द धम्माचे विचार आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा ठरला.

मुलुंडमध्ये सम्राट अशोक जयंतीचा जल्लोष; विचारांचे दीप प्रज्वलित

0
मुलुंडमध्ये सम्राट अशोक जयंतीचा जल्लोष; विचारांचे दीप प्रज्वलित

मुलुंडमध्ये सम्राट अशोक जयंतीचा जल्लोष; विचारांचे दीप प्रज्वलित

मुलुंड : प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती मोठ्या उत्साहात मुलुंड येथे साजरी करण्यात आली. बुधवार, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सिद्धार्थ स्पोर्ट्स क्लब व धम्म पौर्णिमा महिला मंडळ, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे ठिकाण धम्मदूत बुद्ध विहार, सहकार विश्व सोसायटी, मुलुंड (पश्चिम) असे होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सूरज रतन जगताप यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच नेल्सन डाळिंबे व चंद्रहास तांबे यांनीही वक्ते म्हणून आपले विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवर वक्त्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी नृत्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या रुपेश यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी सूरज रतन जगताप यांचा सम्राट कनिष्क यांची फोटो फ्रेम देऊन सन्मान केला.
कार्यक्रमात उपस्थितांनी सम्राट अशोक यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या धम्म, शांती व समता या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश दिला. संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

बेबीताई कांबळे यांच्या नेतृत्वाखालील फलटणची ऐतिहासिक सभा

0
बेबीताई कांबळे यांच्या नेतृत्वाखालील फलटणची ऐतिहासिक सभा


साहस Times :भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात काही घटना अशा असतात की त्या केवळ एका दिवसापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर पुढील अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरतात. २ एप्रिल १९४८ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे पार पडलेली, देविकाबाई कांबळे उर्फ बेबीताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील सभा ही अशीच एक ऐतिहासिक घटना मानली जाते. दलित महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी आणि वैचारिक परिवर्तनासाठी या सभेने महत्त्वाची भूमिका बजावली.
सभेची पार्श्वभूमी
स्वातंत्र्यानंतरचा काळ हा भारतीय समाजासाठी नव्या आशा आणि आव्हानांचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रात दलित आणि वंचित समाजामध्ये संघटनात्मक चळवळी उभ्या राहत होत्या. मात्र, या चळवळीत महिलांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज होती. याच उद्देशाने ग्रामीण भागात जागृतीपर सभा आयोजित केल्या जात होत्या. फलटण येथे झालेली ही सभा त्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली.
सभेचे प्रमुख उद्देश
या सभेचा केंद्रबिंदू केवळ विचार मांडणे नव्हता, तर सामाजिक परिवर्तनासाठी ठोस दिशा देणे हा होता.
शिक्षणाचा प्रसार:
दलित महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा मुख्य उद्देश होता. शिक्षण हेच स्वाभिमान आणि प्रगतीचे खरे साधन आहे, हा संदेश या सभेतून दिला गेला.
अंधश्रद्धा निर्मूलन:
समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरांचा त्याग करून वैज्ञानिक आणि तर्कसंगत विचार स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
राजकीय हक्कांची जाणीव:
स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या कायदेशीर आणि राजकीय अधिकारांची माहिती महिलांना देऊन त्यांना सशक्त बनवणे हा या सभेचा महत्त्वाचा भाग होता.
बेबीताई कांबळे यांचे योगदान
बेबीताई कांबळे म्हणजेच या केवळ एक कार्यकर्त्या नव्हत्या, तर त्या एक प्रखर विचारवंत आणि लेखिका होत्या. त्यांच्या ‘जिणं आमचं’ या आत्मकथनातून त्यांनी दलित स्त्रीजीवनातील वेदना आणि संघर्ष प्रभावीपणे मांडले आहेत.
या सभेत त्यांनी आपल्या भाषणातून महिलांना स्वावलंबी होण्याचे, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. अस्पृश्यतेविरुद्धच्या लढ्यात महिलांची भूमिका किती निर्णायक आहे, हे त्यांनी ठामपणे मांडले. तसेच महाडचा सत्याग्रह यासारख्या ऐतिहासिक चळवळींचा संदर्भ देत त्यांनी महिलांना संघटित होण्याची प्रेरणा दिली.
सभेचे ऐतिहासिक महत्त्व
फलटण येथील ही सभा ग्रामीण भागातील दलित महिलांसाठी एक नवा अध्याय ठरली. या सभेने महिलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला आणि “चूल आणि मूल” या मर्यादित चौकटीबाहेर येऊन सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा दिली.
ही सभा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती दलित चळवळ आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. या घटनेने महिलांच्या सक्षमीकरणाच्या लढ्याला नवी दिशा दिली आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती दिली.
ही सभा आपल्याला आजही सांगते परिवर्तन केवळ विचारांनी होत नाही, तर संघटन, जागृती आणि कृती यांच्या एकत्रित शक्तीनेच समाजात खरा बदल घडतो.

राजाळे भीमनगरात महिलांचा ऐतिहासिक पुढाकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची धुरा महिलांकडे

0
राजाळे भीमनगरात महिलांचा ऐतिहासिक पुढाकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची धुरा महिलांकडे


फलटण : फलटण तालुक्यातील राजाळे गावातील भीमनगर येथे यंदा एक अत्यंत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली करण्याचा निर्धार येथील महिलांनी केला आहे. हा निर्णय केवळ एक कार्यक्रम नसून सामाजिक समता, स्त्रीशक्ती आणि परिवर्तनाचा एक नवा अध्याय ठरत आहे.

दि. २० मार्च १९२७ रोजी महाड येथे झालेला ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह हा मानवी हक्क आणि समानतेसाठीचा एक क्रांतिकारी टप्पा होता. या घटनेच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या ‘समता दिना’च्या पार्श्वभूमीवर, या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभीच राजाळे भीमनगरातील महिलांनी घेतलेला हा निर्णय अधिकच अर्थपूर्ण ठरतो.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त महिलांनी पुढाकार घेत, “स्त्री ही केवळ चूल आणि मूल” या मर्यादित चौकटीतून बाहेर पडून समाजात नेतृत्वाची भूमिका निभावण्याचा ठाम संदेश दिला आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या समान हक्कांच्या प्रेरणेने महिलांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली आहे.

या महोत्सवासाठी खालील महिलांची प्रमुख समिती स्थापन करण्यात आली आहे:
१) बायनाबाई भिमराव भालेराव
२) कल्पना महावीर भालेराव
३) शीतल गौतम भोसले
४) स्वाती संजय कांबळे
५) दीपाली शरद कांबळे
६) मानसी अजय भालेराव
या सहा महिलांकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार अशी महत्त्वाची पदे सोपवण्यात आली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख, सल्लागार, देखरेख, सजावट, उपहार आणि मनोरंजन अशा विविध समित्यांची रचना करून संपूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :
६ एप्रिल २०२६ : सकाळी ८ ते दुपारी २ – विज्ञान प्रदर्शन स्थळ: जि. प. शाळा, राजाळे
७ ते १३ एप्रिल २०२६ : दररोज दुपारी ११ ते ४ – “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथ वाचन
७ एप्रिल : सायं. ८ ते १० – सामाजिक समतेचा मेळावा
८ एप्रिल : सायं. ८ ते १० – फनी गेम्स
१० एप्रिल: सायं. ९ – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट
११ एप्रिल : सायं. ७ ते ११ – भीम गीतांचा कार्यक्रम व जेष्ठ महिलांचा सत्कार
१२ एप्रिल : सायं. ८ ते ११ – होम मिनिस्टर कार्यक्रम
१३ एप्रिल : सायं. ८ ते १२ – डान्स व नाटक स्पर्धा
१४ एप्रिल (जयंती दिन) : सकाळी – पुस्तकं व झाडांचे वाटप, बक्षीस वितरण, सायंकाळी – भव्य मिरवणूक, ट्रॉली डेकोरेशन,
खास आकर्षण महाड चवदार तळे सत्याग्रह व सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेचे जिवंत देखावे, टिपरी नृत्य व जेवणाचा कार्यक्रम

ही संपूर्ण रूपरेषा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका नसून सामाजिक समतेचा, स्त्रीशक्तीचा आणि विचार प्रबोधनाचा उत्सव आहे. आजपर्यंत गाव, तालुका किंवा जिल्हा स्तरावर असा महिलांच्या पूर्ण नेतृत्वाखाली जयंती साजरी करण्याचा निर्णय दुर्मीळच आहे. त्यामुळे राजाळे भीमनगरचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे.

भीमाच्या लेकींचा हा ऐतिहासिक निर्णय समतेचा, सन्मानाचा आणि नव्या युगाचा संदेश देणारा ठरतो आहे.

भारत बुध्दमय करण्याची सुरवात आपल्यापासूनच करा – भंते कश्यप

0
भारत बुध्दमय करण्याची सुरवात आपल्यापासूनच करा – भंते कश्यप

भारत बुध्दमय करण्याची सुरवात आपल्यापासूनच करा – भंते कश्यप


वडूज : खटाव तालुका बौध्द विकास मंडळाच्या वतीने दि. 31 मार्च 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भारत सरकारने दि. 31 मार्च 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “भारतरत्न” पुरस्कार जाहीर केलेल्या दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे स्वयंवर मंगल कार्यालय वडूज येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुध्द, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून झाले. यावेळी भंते काश्यप यांनी उपस्थितांना त्रिसरण व पंचशील दिले.यानंतर भंते काश्यप यांनी उपस्थित बौध्द बांधवांना धम्मदेसना दिली.उपस्थितांना मार्गदर्शनपर धम्मदेसना देताना भंते कश्यप म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बुध्दमय करण्याची प्रतिज्ञा केली आणि त्यांनी प्रशासकीयदृष्टया भारत बुध्दमय केला पण संपूर्ण भारत बुध्दमय करण्याची सुरवात आपल्यापासून करावी असे प्रतिपादन त्यांनी केले.

ते म्हणाले, बौद्ध धम्मात निर्वाण, परिनिर्वाण (परीनिब्बान) आणि महापरिनिर्वाण (महापरीनिब्बान) हे तीन शब्द अत्यंत मूलभूत तत्त्व समजावतात. निर्वाण म्हणजे तृष्णा (तन्हा), द्वेष (दोस) आणि मोह (मोहो) या क्लेशांचा पूर्ण नाश म्हणजे निर्वाण. थोडक्यात हे जिवंत असतानाच प्राप्त होणारे अंतिम सत्य आहे. यात व्यक्ती “अर्हंत” अवस्थेला पोहोचते. शरीर जिवंत असते, पण मन पूर्ण मुक्त झालेले असते. निर्वाण हे सर्वोच्च सुख आहे. तृष्णेचा पूर्ण त्याग म्हणजे निर्वाण.
परिनिर्वाण म्हणजे अर्हंत व्यक्तीच्या मृत्यूनंतर पंचस्कंधांचा (रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान) पूर्ण अंत होणे.अर्हंत जिवंत असताना निर्वाणात असतो. शरीर संपल्यावर पुन्हा जन्म होत नाही.
ही अवस्था “परिनिर्वाण” म्हणून ओळखली जाते. जन्म समाप्त झाला, ब्रह्मचर्य पूर्ण झाले, कर्तव्य पूर्ण झाले. आता पुनर्जन्म नाही.
महापरिनिर्वाण हे भगवान बुद्धांच्या अंतिम परिनिर्वाणाला “महापरिनिर्वाण” म्हणतात. हे एक ऐतिहासिक व आध्यात्मिक घटना आहे. गौतम बुध्द यांनी कुशीनगर येथे देह ठेवला. त्यावेळी त्यांनी अंतिम उपदेश दिला.“भिक्खूंनो, आता मी तुम्हाला सांगतो- सर्व संखार नश्वर आहेत, अप्रमादाने (सजगतेने) प्रयत्न करा.”
तीन संकल्पनांतील मुख्य फरक म्हणजे निर्वाण जिवंत असताना क्लेशांचा अंत. परिनिर्वाण हे अर्हंताच्या मृत्यूनंतर पंचस्कंधांचा अंत होतो. महापरिनिर्वाण म्हणजे बुध्दांच्या देहत्यागावेळी बुद्धांचे अंतिम निर्वाण होय
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी बौद्ध धम्मातील निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण या संकल्पनांचे सखोल विश्लेषण करत जीवनातील क्लेशांचा अंत करून मुक्तीच्या मार्गावर चालण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीचा स्वीकार करून भारत बुद्धमय करण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहावे, असे आवाहन केले.

यानंतर प्रबुद्ध साठे यांनी “बहुजनांनो चला आपल्या बुद्धाच्या दारी” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. ते आंबेडकरवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या भाषणात सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि बहुजन एकजुटीवर विशेष भर देण्यात आला.
आपल्या भाषणात त्यांनी बहुजन समाजाने केवळ परंपरेपुरते मर्यादित न राहता शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः बौद्ध धम्म स्वीकाराच्या संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी पूर्वाश्रमीचे महार समाजातील बौद्ध बांधवांना आवाहन केले की, त्यांनी स्वतःपुरते मर्यादित न राहता इतर वंचित समाजघटकांपर्यंत धम्माचा प्रसार करावा. मातंग तसेच इतर अनुसूचित जातीतील समाजानेही बौद्ध धम्म स्वीकारून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

तसेच त्यांनी युवकांना उद्देशून सांगितले की, शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव ठेवून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज आहे. संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि समाजप्रबोधन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही मान्यवरांचे मार्गदर्शन अत्यंत विचारप्रवर्तक ठरले. मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधवांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित नलवडे यांनी केले.आभार बबन जगताप यांनी मानले. यावेळी पं.स माण चे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, फलटण तालुक्याचे भारतीय बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष तथा बौध्दाचार्य आयु.महावीर भालेराव, बी.आर जगताप, मनोहर नलावडे, शशिकांत गायकवाड, राहुल मोरे, विश्वास जगताप, सिद्धार्थ वाघमारे, उर्मिला झेंडे, अशोक बैले, सुधाकर शिलवंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार: मृतदेहांची अदलाबदल प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित?

0
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार: मृतदेहांची अदलाबदल प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित?


सातारा : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला असून, मृतदेहांची अदलाबदल झाल्याच्या गंभीर प्रकारामुळे प्रशासनावर तीव्र टीका होत आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करण्यात आले आहे.?
वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह सुपूर्द केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही मृतदेहांची अदलाबदल झाली.
यातील धक्कादायक बाब म्हणजे एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकले. चिता पेटल्यानंतर ही गंभीर चूक लक्षात आल्याने नातेवाईकांवर पेटती चिता विझवण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत, मृतदेह दाखवण्यास नकार दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. “आम्हाला दिलेला मृतदेह आमच्या नातेवाईकाचा नव्हता. हा प्रकार अत्यंत अमानवी असून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. रजिस्टरनुसार नातेवाईकांच्या सह्या घेतल्या असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ही घटना साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील दुसरी घटना असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकारानंतर रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

0
रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

साहस Times : भारतातील आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाणारी Reserve Bank of India (भारतीय रिझर्व्ह बँक) ही संस्था 1 एप्रिल 1935 रोजी अस्तित्वात आली. परंतु तिची स्थापना ही केवळ ब्रिटिश प्रशासनाचा प्रशासकीय निर्णय नव्हता; त्यामागे एक सखोल, तर्कशुद्ध आणि दूरदृष्टी असलेला आर्थिक विचारप्रवाह कार्यरत होता. या विचारप्रवाहाचे प्रमुख शिल्पकार म्हणजे महामानव Dr. B. R. Ambedkar होय.
सामान्यतः बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक आणि दलित चळवळीचे नेते म्हणून ओळखले जाते. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अत्यंत प्रभावी आणि बौद्धिक पैलू म्हणजे त्यांचे अर्थशास्त्रातील योगदान होय. त्यांनी Columbia University आणि London School of Economics येथे शिक्षण घेत असताना भारताच्या आर्थिक रचनेचा, ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांचा आणि चलनव्यवस्थेतील त्रुटींचा सखोल अभ्यास केला.
चलनप्रश्नावर मूलभूत विचार
१९२३ साली त्यांनी लिहिलेला The Problem of the Rupee हा ग्रंथ भारतीय चलनप्रश्नावर आधारित एक क्रांतिकारी आणि अभ्यासपूर्ण दस्तऐवज ठरला. या ग्रंथात त्यांनी भारतीय रुपयाच्या अस्थिरतेची कारणमीमांसा करताना चांदीवर आधारित चलनपद्धतीच्या मर्यादा स्पष्ट केल्या.
त्या काळात रुपया चांदीच्या किंमतीवर अवलंबून असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत होता. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी सुवर्ण विनिमय पद्धतीवर टीका करत सुवर्ण प्रमाण (Gold Standard) पद्धतीचा पुरस्कार केला आणि चलन स्थैर्यासाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणेची गरज अधोरेखित केली.
Keynes यांना दिलेले बौद्धिक आव्हान
त्या काळातील प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ John Maynard Keynes यांनी भारतीय चलनविषयक काही मते मांडली होती. परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या निष्कर्षांवर चिकित्सक टीका केली. त्यांनी ऐतिहासिक आकडेवारी, आर्थिक विश्लेषण आणि वास्तव परिस्थितीच्या आधारे दाखवून दिले की भारतासाठी स्वतंत्र आणि परिस्थितीनुरूप आर्थिक धोरण आवश्यक आहे.
Hilton Young Commission आणि केंद्रीय बँकेची संकल्पना
१९२५ मध्ये ब्रिटिश सरकारने Hilton Young Commission नेमली. या आयोगासमोर बाबासाहेबांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले.
या वेळी त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला-
चलननिर्मिती आणि आर्थिक नियंत्रण हे सरकारपासून स्वतंत्र असावे. आणि त्यासाठी एक स्वायत्त केंद्रीय बँक (Central Bank) असणे अत्यावश्यक आहे.
त्यांच्या मते, जर चलनव्यवस्था पूर्णपणे सरकारच्या हाती राहिली, तर राजकीय हस्तक्षेपामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.
रिझर्व्ह बँक कायदा आणि स्थापना बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव पुढे 1934 च्या Reserve Bank of India Act 1934 मध्ये स्पष्टपणे दिसून येतो. या कायद्याअंतर्गत 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
सुरुवातीला ही बँक खाजगी स्वरूपाची होती, परंतु 1949 मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि ती पूर्णपणे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आली.
बाबासाहेबांची आर्थिक दूरदृष्टी
डॉ. आंबेडकर यांनी केवळ केंद्रीय बँकेची गरज मांडली नाही, तर त्यांनी पुढील महत्त्वाच्या आर्थिक तत्त्वांचाही पुरस्कार केला.
किंमत स्थैर्य (Price Stability)
चलनावर नियंत्रण (Monetary Control)
वित्तीय शिस्त (Fiscal Discipline)
शेतकरी व कामगार केंद्रित अर्थव्यवस्था
त्यांनी जलव्यवस्थापन, औद्योगिकीकरण आणि नियोजन याबाबतही मोलाचे विचार मांडले. त्यांच्या “Small Holdings in India” आणि इतर लेखनातूनही आर्थिक सुधारणा दिसून येतात.
आजच्या काळातील महत्त्व
आज Reserve Bank of India देशातील चलन पुरवठा नियंत्रित करते
महागाईवर नियंत्रण ठेवते.
बँकिंग व्यवस्थेवर देखरेख करते.
आर्थिक स्थैर्य राखते.
ही सर्व कार्ये बाबासाहेबांच्या मूलभूत आर्थिक तत्त्वज्ञानाशी पूर्णतः सुसंगत आहेत.

महामानव Dr. B. R. Ambedkar यांचे रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील योगदान हे प्रत्यक्ष संस्थापक म्हणून नसले, तरी ते संकल्पनात्मक, बौद्धिक आणि धोरणात्मक पातळीवर अत्यंत निर्णायक आहे.
त्यांच्या “The Problem of the Rupee” या ग्रंथाने आणि त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांनी भारतीय चलनव्यवस्थेचा मजबूत पाया घडवला. त्यामुळेच त्यांना केवळ सामाजिक क्रांतिकारक नव्हे, तर भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले गेले पाहिजे.
रिझर्व्ह बँक स्थापना दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा…!

आयु. सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)