


पुणे : राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात यंदा घट झालेली असतानाच एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळालेले नाहीत. तसेच, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा कमी झाली आहे. ४४.५१ टक्के विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत.गेली काही वर्षे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणांचा फुगवटा वर्षागणिक वाढत आहे.
गेल्या वर्षी राज्यभरातील ८ हजार ७८२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. तसेच, एका विद्यार्थिनीने शंभर टक्के गुण मिळवण्याची कामगिरी केली होती. मात्र, यंदा एकूण निकाल घटलेला असताना गुणवंतांचाही टक्का कमी झाला आहे. या वर्षी ८ हजार ३५२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तसेच, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ७० ते १०० टक्क्यांतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, २२ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के, ४६ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी ८० ते ८५ टक्के, ७४ हजार १७२ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८० टक्के, १ लाख ३ हजार ७० विद्यार्थ्यांनी ७० ते ७५ टक्के गुण मिळवले आहेत. त्याशिवाय १ लाख ३१ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी ६५ ते ७० टक्के, १ लाख ८१ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी ६० ते ६५ टक्के, ६ लाख २२७ विद्यार्थ्यांनी ४५ ते ६० टक्के, १ लाख ८० हजार ५४७ विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांहून कमी गुण मिळाल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी : अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली-चऱ्होलीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या नियोजनाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. अंधारात ठेवून ही योजना लादली जात असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी सोमवारी या योजनेच्या जाहीर प्रकटन कागदपत्रांची होळी केली.कुदळवाडी, चिखली आणि जाधववाडी परिसरामध्ये अनधिकृत पत्राशेड, भंगार गोदामे, लघुउद्योग उभारले होते. भंगार व्यावसायिकांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या भागात बांगलादेशी, रोहिंगे असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत होता. महापालिकेने ८२५ एकर क्षेत्रफळावरील अनधिकृत भंगार गोदामे, दुकानांवर कारवाई करण्यात आली. आता महापालिकेने चिखली, कुदळवाडी, चऱ्होलीत नगररचना योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. चिखलीमधील ३८० हेक्टर, चऱ्हाेलीतील एक हजार ४२५ हेक्टरवर आराखडा तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, या योजनेच्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, योजनेला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी कुदळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक झाली. त्यामध्ये जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, बाळासाहेब यादव, उदय पाटील, दिलीप यादव, रमेश मोरे, दत्तू मोरे, शैलेश मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून योजनेच्या जाहीर प्रकटनाची होळी करण्यात आली.
चिखली, कुदळवाडीच्या जमिनी तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेल्या. महापालिकेच्या आरक्षणातही मोठे क्षेत्रफळ गेले आहे. घरकुलासाठी शंभर एकर क्षेत्र घेतले. यापूर्वीच या भागातील रस्त्यांसाठी देखील जमीन संपादित करण्यात आली. आता नगररचना योजनेसाठी पुन्हा एकदा स्थानिकांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रशासनाच्या हालचाली असल्याचे दिनेश यादव म्हणाले.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली आणि चऱ्होलीसाठी नगररचना योजना जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या योजनेला विरोध आहे. भूमिपुत्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता प्रशासन अशी योजना राबवू शकत नाही.या योजनेला तत्काळ स्थगिती देण्यात यावी.- महेश लांडगे, आमदार, भोसरी

अकबराच्या कारकिर्दीत ग्वाल्हेर संगीत घराण्याचे नाव मोठ्या आदराने घेतले जात असे. तानसेनचा जन्म ग्वाल्हेरमधील एका छोट्या गावात झाला. तानसेन अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक कसा बनला तिथपासून कानसेन हा शब्द कसा प्रचलित झाला? हे आपण पाहणार आहोत.
आज ६ मे रोजी तानसेन यांचे निधन झाले. तानसेनच्या मृत्युचे वर्ष, त्याच्या बहुतेक चरित्राप्रमाणे, अस्पष्ट आहे. इस्लामिक इतिहासकारांनी लिहिलेल्या एका आवृत्तीनुसार, तानसेनचा मृत्यू १५८६ मध्ये दिल्लीत झाला आणि अकबर आणि त्याच्या दरबारातील बहुतेक लोक मुस्लिम रीतिरिवाजांनुसार पार पडलेल्या अंत्ययात्रेत सहभागी झाले.
तानसेन यांचे खरे नाव रामतनू पांडे होते. अकबराला भेटल्यानंतर त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याला तानसेन म्हणून ओळखले जाऊ लागले.
– तानसेन वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत मुके होते, त्या काळातील महान संगीतकार गुरु हरिदास यांनी त्याला आपला शिष्य बनवले आणि संगीत शिकवले.
– यानंतर, कलाप्रेमी अकबराने त्यांना त्यांच्या नऊ रत्नांमध्ये स्थान देऊन त्यांचा सन्मान केला. त्याच्या सामाजिक वर्तनामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे म्हटले जाते. हेच कारण होते ज्यामुळे त्याने हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला.
– तो अकबराच्या दरबारात नवीन रागांची निर्मिती करत असे. तानसेनचे सूरदासांशीही मैत्री होती आणि तो अनेकदा त्यांचे भजन गात असे.
– असे म्हटले जाते की एकदा आग्र्यात एक संगीत स्पर्धा होती ज्यामध्ये त्यांना बैजू बावराने पराभूत केले.
‘तानसेन नसला तरी कानसेन मात्र हवा..’ ही म्हण प्रचलित आहे. पण “कानसेन” हा शब्द कुठून आला? याबाबत माहिती घेणार आहोत.
“कानसेन” ही भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महत्त्वाची आणि अद्वितीय संकल्पना आहे. ही संकल्पना अनेक वर्षांपासून संगीतकारांच्या मनात आणि त्यांच्या अभ्यासात आहे.
कानसेन या शब्दाचा अर्थ असा आहे की, संगीत ऐकताना किंवा वाजवताना कानाला लागणारी भावना. तसेच ती भावना व्यक्त करण्याची कला.
कानसेनची सुरुवात संगीत शिक्षणातून होते. जेव्हा एखादा विद्यार्थी संगीत शिकायला सुरुवात करतो, तेव्हा त्याला स्वरांचे ज्ञान, तालांचे ज्ञान आणि राग-रागिणींचे ज्ञान मिळत जाते. या ज्ञानासोबतच त्याला संगीत ऐकताना आणि वाजवताना कान कसे काम करतात हे शिकायला लागते.
जेव्हा एखादा संगीतकार गातो किंवा वाजवतो, तेव्हा तो आपल्या भावना व्यक्त करतो. कानसेन या भावनांना जाणण्याची आणि व्यक्त करण्याची कला आहे.
कानसेन ही केवळ ऐकण्याची किंवा वाजवण्याची कला नाही, तर ती एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. संगीतकार आपल्या आवडीनुसार आणि आपल्या भावनांनुसार कानसेनचा वापर करून संगीत तयार करतात.


पुणे : हडपसर भागात भरधाव सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिमेंट मिक्सरचालकाला पोलिसांनी अटक केली.
रेणू ब्रह्मशंकर पांडे (वय ३८, रा. केशवननगर, मुंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. याबाबत ब्रह्मशंकर पांडे (वय ३९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मिक्सरचालक अब्दुल लालमियाँ कलाम (वय ४०) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार पांडे दाम्पत्य रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास झेड काॅर्नर परिसरातून निघाले होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीला धडक दिली. मिक्सरच्या चाकाखाली सापडून रेणू गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मिक्सरचालक कलाम याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक जयवंत गांधले तपास करत आहेत.
शहरात गेल्या दोन दिवसांत तीन गंभीर अपघात घडले. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावर शनिवारी (३ मे) पहाटे भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात सहप्रवासी तरुणी गंभीर जखमी झाले. रविवारी (४ मे) कात्रज बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी हडपसर भागातील झेड काॅर्नर परिसरात सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.



पुणे :पुणे शहरातील भवानी पेठेतील काशेवाडी भागात दारू आणून न दिल्याच्या रागातून दोघा जणांनी एका तरुणाचे डोके भिंतीवर आपटून खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गोपाल आचार्य (वय 30 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर अमीर शेख आणि दानीश अली शेख (दोघेही रा. काशेवाडी ) असे आरोपींची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल आचार्य या तरुणाला आरोपी अमिर शेख याने दारू आणण्यास सांगितली.मात्र गोपाल आचार्य याने दारू आणण्यास नकार दिला.त्या रागातून आरोपी दानिशने गोपालला घराबाहेर बोलावून घेतले.तू माझ्या चाचाला दारू आणून का दिली नाही,अशी विचारणा करून त्याचे डोके भिंतीवर आपटले.त्यानंतर अमीर शेख आणि दानिस शेख यांनी गोपालला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.या घटनेत गोपाल आचार्य हा गांभीर जखमी झाल्याची घटना घडली.त्यावर तत्काळ गोपाल आचार्य याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तर या प्रकरणाचा तपास खडक पोलिस करित आहे.
