Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2843

कबीररंग: धीरे धीरे रे मना…

0
कबीररंग: धीरे धीरे रे मना…


हेमकिरण पत्की6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सामान्य माणूस मनोनिर्मित जगाचा अनुभव घेत असतो आणि तरीही त्याला त्याच्या मनापलीकडचं जग खुणावत असतं. त्याच्या मनानं निर्माण केलेल्या जगात ‘मी आणि माझं’ असं एक जग असतं. मनात उमटलेल्या विचारांनी, शब्दांनी आणि ‘मी’नं निर्माण केलेल्या मानसिक काळानं ते संपादित केलेलं असतं. हे जग म्हणजे ‘मी’नं निर्माण केलेला एखाद्या कोळीष्टकासारखा कोष असतो – तंतुमय, तरल आणि सीमित वावराचा. जाणत्या माणसाच्या दृष्टीला हा मनोमय कोष पडल्यावर त्यापलीकडच्या जगाची चैतन्यपूर्ण खूण त्याला खेचून घेते का? ही खूण त्याच्या ध्यानात येते का? आणि ती हृदयाशी सहजच जोडली गेल्यावर मनापलीकडल्या जगातील सृष्टीचं त्याला अप्रूप वाटतं का? हे डोंगर कुणाच्या हातांनी दगड-माती रचली गेल्यानं उंच होत नाहीत, या नद्या कुणाच्या धक्क्यानं पुढे पुढे वाहत नाहीत, पावसाचे थेंब कुणाच्या प्रयत्नांमुळं बरसत नाहीत, सूर्य – चंद्र – तारे कुणी कळ दाबल्यानं दृष्टीस पडत नाहीत वा दृष्टिआड होत नाहीत. या सृष्टीचं एक चक्र आहे, एक स्वतंत्र व्यवस्था आहे. ती माणसानं निर्माण केलेल्या जगाची नाही. माणसाच्या ज्ञानातून, प्रज्ञेतून सृष्टी जन्माला आलेली नाही. जाणत्या माणसाला आपल्या प्रयत्नांची मर्यादा उमजते. ज्ञात जगाचा सारा परिसर त्याच्या दृष्टीत येतो, तर्काचं मोल कळतं आणि त्यापलीकडच्या अज्ञात अस्तित्वाचंही मोल त्याला कळतं. अशाच मनापलीकडचं जग जाणू पाहणाऱ्या माणसाला कबीर आपलंसं करतात. त्याच्यावर उपदेशाचा मेघ होऊन बरसतात.

रूखडा बोला पान से, सुन पत्ते मेरी बात। इस घर की यहि रीति है, इक आवत इक जात।। झाडाला पालवी फुटणं, पानांची झड होणं ही तर ऋतुगती असते. नवीन पानासाठी आधीच्या पानानं फांदी मोकळी ठेवावी लागते. झाडाचं झाडपण यामुळंच अखंड असतं. कबीर याच ऋतुगतीला निरखतात. या निरखण्यातून जन्म-मृत्यूचा दाखला देणारा यथार्थ दोहा आपल्यासाठी सिद्ध होतो. झाडावरच्या पानांच्या येरझारी ही सृष्टीची रीत असते. ऋतुचक्रासारखी ती नित्य असते. तिच्या क्रमात बदल होत नाही. आपले जन्म – मृत्यू मनुष्यनिर्मित जगातील नसतात. त्यामागे अज्ञाताचा कायदा असतो. तो विचार-तर्कापलीकडचा असतो. तो हृदयानं जाणून घ्यावा, सद्बुद्धीनं अनुसरावा असा असतो. हे जाणून घेणं, हे अनुसरणं सहज व्हावं, यासाठीच कबीरांची व्यक्त होण्याची तळमळ आहे. माणसाचं मन स्वत:च्या मनानं निर्माण केलेल्या जगात राहत असलं, तरी त्याला त्यापलीकडल्या अस्तित्वाच्या स्थितीगतींना जाणून घेण्याची उत्कट आस असते. हीच तर प्रत्येक जीवाची खरी तहान असते. कधी कधी हे मन व्याकूळ होतं. धीर अमाप असतो, हे त्याला उमजत नाही. सहनबळ केवळ देहामनाचं नसतं, हे त्याला समजत नाही. इच्छेचा जन्म आणि तिची पूर्तता, यांची एक ऋतुगतीसारखीच आंतरव्यवस्था असते. ती प्रत्येकाला बाह्य संस्कार प्रभावांपासून अलिप्त राहून जाणून घ्यावी लागते. पण, मन इच्छेच्या अधीन होतं आणि आपली नैसर्गिकता हरवून बसतं. कबीरांनी सामान्य माणसाच्या या मन:स्थितीला कसं व्यक्त केलं आहे, ते पाहा… धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय। माली सिंचै सौ घडा, ऋतु आये फल होय।। हे मना… तू धीर धर. धीरापोटीच तुझी आस पुरी होईल, फळझाडाची निगराणी करणाऱ्या माळीदादानं झाडबुडाला शंभर घड्यांतून पाणी शिंपलं, तरी फलधारणेचा ऋतू आल्याशिवाय झाडाला फळ येणार नाही. तसंच तुझी आस उचित वेळेसच पुरी होईल, आधी होणार नाही. आपल्या मनाचं जग आपल्या इच्छापूर्तीच्या प्रयत्नांशी जोडलेलं असतं. पण, मनापलीकडच्या जगात प्रयत्नांचं कितीसं मोल असतं! तिथं वाट पाहणं, शब्दांशिवाय सहन करणं आणि अस्तित्वाच्या गतीवर प्रेम करणं हीच आपल्या ठायी असलेल्या सत्त्वाची परीक्षा असते. हेच जीवनावर प्रेम करणं असतं. आपल्या चंचल मनाला हृदयाच्या स्थिरतेसह जाणून घेणारी काही अपवादभूत माणसं या जगात असतात. ती मनानं निर्माण केलेल्या गोष्टींवर अवलंबून नसतात. परतत्त्वाचा स्पर्श त्यांच्या साध्या, सरळ हृदयाला झालेला असतो. या अनुभूतीमुळं ती सर्जनशील असतात; सृष्टीत घडणाऱ्या परिवर्तनांशी आतून जोडलेली असतात. त्यांच्या दृष्टीतून आनंद ओसंडत असतो. या परिवर्तनानं घडणाऱ्या दर्शनासाठी त्यांना शब्दांचा आधार अपुरा वाटतो. निसर्ग दर्शनातून प्रतीत होणारं सत्य शब्दांच्या पलीकडंच राहतं, हा बोध कबीर मार्मिकतेनं सूचित करतात. पाणी ही ते हिम भया, हिम व्है गया बिलाय। जो कुछ था सोई भया, अब कुछ कह्या न जाय। पाणी गोठलं आणि त्याचा बर्फ झाला. बर्फ पुन्हा वितळून पाणी झालं. गोठण्या-वितळण्यानं पाण्याची फक्त स्थिती बदलली; मात्र पाणी पाणीच राहिलं. स्थितींचा आकार धारण करून प्रवाही असलेलं अस्तित्वही असंच आहे. कबीरांच्या दृष्टीत हे अस्तित्वच चैतन्य आहे आणि ते शब्दातीत आहे.

hemkiranpatki@gmail.com

संपर्क : ९४०३७६८८९१



Source link

गोष्ट सांगतो ऐका…: तुम्हीच सांगा…

0
गोष्ट सांगतो ऐका…: तुम्हीच सांगा…


अरविंद जगताप9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

खरं तर डॉक्टर विशाखाला खूप वेळ हेच समजवत राहिले की, ती जी कोण बाई असेल, तू तिचा का विचार करतेयस? तू जीव दिल्यावर ती तर तुझ्या नवऱ्यासोबत संसार करायला मोकळीच होईल. विशाखा म्हणाली, ‘मग मी काय करायला पाहिजे?’ डॉक्टर म्हणाले, ‘माणसं असंच वागतात, हे समजून घेतलं पाहिजे.’ विशाखाला संतापच आला. कसं समजून घ्यायचं? आणि का म्हणून समजून घ्यायचं?

विशाखा आता डॉक्टर प्रज्योतसमोर बसलीय. संध्याकाळचे सात वाजत आलेत. ती काल आत्महत्या करणार होती. संध्याकाळी सातची वेळ असेल. तिनं ठरवून टाकलं होतं. अगदी पाच मिनिटांत. तिचा नवरा संदेश दुपारीच बिअर पीत बसला होता क्रिकेट बघत. रविवारी त्याचा हा आवडता उद्योग. त्यात क्रिकेट असल्यावर आपण किती पितोय, याचंही त्याला भान राहात नाही. चार बिअर पिऊन झोपला. विशाखाला काहीच उद्योग नव्हता. फोनवर वीस – पंचवीस रील बघून कंटाळा आला होता तिला. शेजारीच संदेशचा फोन होता. विशाखाने फोन उचलला सहज कुतूहल म्हणून. फोन लॉक होता. तिनं तो संदेशच्या चेहऱ्यासमोर धरला. फोन उघडला. विशाखा फोन बघू लागली. तिला संदेश आणि स्वातीचं चॅटिंग दिसलं. काही फोटोही होते. विशाखा हैराण झाली. स्वाती तिची मैत्रीण. खूपदा घरी यायची. एक – दोनदा स्वातीचा नवरा, स्वाती आणि संदेश, विशाखा फिरायलाही गेले होते. पण, त्यावेळी स्वाती आणि संदेश एकमेकांशी फार बोलले नाहीत. दोघांचं असं काही चालू असेल, असा संशयही विशाखाला आला नाही. कधीच. आणि आज मोबाइलमध्ये थेट पुरावाच समोर होता. आपली मैत्रीण असं वागेल, असा तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता. खरं तर त्या क्षणी नवऱ्याचा जास्त राग येत होता का स्वातीचा, हे तिचं तिलाच सांगता आलं नसतं. आताही डॉक्टरांना सांगताना तिला नेमका कुणाचा जास्त राग आलाय, हे ठरवता येत नव्हतं. त्या क्षणी संदेशच्या थोबाडीत ठेवून द्यायची इच्छा झाली होती. स्वातीला फोन करून शिव्या द्याव्या, असंही वाटलं. पण, त्या सगळ्या गोष्टींचा काहीच फायदा नाही, असं तिचं तिनेच स्वतःला समजावलं. दुसऱ्या खोलीत जाऊन एकटीच रडत बसली. आजवर घडलेली प्रत्येक गोष्ट आधी आईला सांगायची तिची सवय. संदेश आवडला ते असो, संदेशने लग्नाबद्दल विचारलं ते असो; सगळ्या गोष्टी तिनं आधी आईशी शेअर केल्या होत्या. पण, आता ही गोष्ट आईला सांगायची तिची हिंमत झाली नाही. ती एकटीच बसून राहिली. आपली एवढी प्रचंड फसवणूक झाली ही गोष्ट काही तिला सहन होत नव्हती. अचानक एका क्षणी तिला जगण्यात काही अर्थ नाही असं वाटू लागलं. आणि तिनं आत्महत्या करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करायला सुरूवात केली. डॉक्टरांनी विशाखाची प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली. डॉक्टर प्रज्योत अतिशय बुद्धिमान. डिप्रेशन, आत्महत्येचा विचार येणारे पेशंट त्यांच्यासाठी नवे नव्हते. त्यांनी तिला नीट समजवून सांगायला सुरूवात केली. आधी नेहमीप्रमाणे तिला बोलू दिलं. खूप बोलू दिलं. संदेशबद्दल त्यांना थोडी माहिती होती; पण आणखी खोलात जाऊन चौकशी सुरू केली. विशाखाची मैत्रीण संदेशला पहिल्यांदा कुठे भेटली वगैरे चौकशी केली. विशाखाने स्वातीचा उल्लेख केला नाही. तिचं नाव घ्यायची पण तिची इच्छा नव्हती. पण, डॉक्टर प्रत्येक गोष्ट शांतपणे विचारत राहिले. विशाखाला अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. ती वारंवार डॉक्टरांना विचारत राहिली की, हे माझ्यासोबतच का व्हावं? डॉक्टर तिला म्हणाले की, हे जगात तुझ्या एकटीसोबत झालंय असं नाही. पण तरीही, विशाखाचं एकच म्हणणं होतं, ‘माझ्यासोबतच का?’ डॉक्टर तिला म्हणाले, ‘नवरा – बायकोचं नातं कधी ना कधी जुनं होतंच. मुख्य म्हणजे, हे एकमेव असं नातं आहे ज्यात मनाएवढाच शरीराचा वाटा महत्त्वाचा आहे. बाकी नाती केवळ आणि केवळ मनाने जोडलेली असतात. पण, नवरा – बायकोचं तसं नसतं. लग्न ठरवताना मुलगा – मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. स्त्री आणि पुरुषाने निवडलेलं नातं असतं लग्न. त्या क्षणाला दिसणाऱ्या पुरुषाकडे बघून, त्या क्षणाला बोलणाऱ्या स्त्रीकडे बघून ठरवलेलं असतं की, सगळं आयुष्य एकत्र घालवायचं. तो क्षण कायम कसा राहणार? माणूस बदलत जातो. काही लोक प्रेमळ होत जातात. काही खूप विश्वासू होत जातात. काही धोकादायक होत जातात..’ विशाखा काही वेळ ऐकत राहिली. पण, तिचा प्रश्न तोच होता. तिने काय चूक केली होती? आणि ती दिसायला काय कमी सुंदर नव्हती. बरं तिचं आणि संदेशचं भांडण व्हायचं, असंही नव्हतं. मग असं का झालं? डॉक्टरांना तिचा राग समजत होता. पण, आत्महत्येचा विचार करण्याएवढं टोकाला जाण्याची गरज आहे, असं वाटत नव्हतं. खरं तर डॉक्टर तिला खूप वेळ हेच समजवत राहिले की, ती जी कोण बाई असेल, तू तिचा का विचार करतेयस? तू जीव दिल्यावर ती तर तुझ्या नवऱ्यासोबत संसार करायला मोकळीच होईल. विशाखा म्हणाली, ‘मग मी काय करायला पाहिजे?’ डॉक्टर म्हणाले, ‘माणसं असंच वागतात, हे समजून घेतलं पाहिजे.’ विशाखाला संतापच आला. कसं समजून घ्यायचं? आणि का म्हणून समजून घ्यायचं? डॉक्टर तिला म्हणाले, ‘समजून घ्यायचं म्हणजे माफ करायचं असं नाही. किंवा जे आहे ते चालू द्या, अशी परवानगी नाही. ही गोष्ट बंद कशी होईल, याचा विचार केला पाहिजे.’ विशाखा म्हणाली, ‘जरी समजा त्यांचं प्रकरण बंद झालं तरी मी कसा संसार करू? मी कशी संदेशला माफ करू? एवढी फसवणूक होऊनही?’ डॉक्टर म्हणाले, ‘हा आयुष्याचा प्रश्न आहे. विसरावं लागेल. तोडगा काढावा लागेल. संदेश यातून बाहेर कसा पडेल हे बघावं लागेल..’ डॉक्टर बोलत असताना अचानक विशाखा रडू लागली. खूप वेळ ती रडतच राहिली. काही वेळाने डॉक्टर म्हणाले, ‘मला सांग, तुला संदेशसोबत राहायचंय ना?’ विशाखा म्हणाली, ‘मी संदेशशिवाय राहू शकेन की नाही माहीत नाही. पण, संदेशसोबत तर नक्कीच राहू शकणार नाही आता. त्यानं मला फसवलं, विश्वासघात केला, हीच गोष्ट सतत डोक्यात येत राहील. मला जगायचीच इच्छा नाही.’ डॉक्टर म्हणाले, ‘आत्महत्या हा काही उपाय नाही. तुझ्यासारख्या स्त्रीकडून ही अपेक्षा नाही. तू स्वतःच्या पायावर उभी आहेस. तुझ्यापुढं आख्ख आयुष्य आहे. करिअर आहे. आर्किटेक्ट म्हणून आता एवढी चांगली कामं येताहेत. आत्महत्या करणारी माणसं भित्री असतात. अवलंबून असतात. तू पुढचा विचार कर..’ डॉक्टर खूप वेळ बोलत राहिले. विशाखाचं कौतुक करत राहिले. विशाखा म्हणाली, ‘डॉक्टर बोलणं सोपं असतं. पण, तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्हीपण शांत राहिला नसता.’ डॉक्टर म्हणाले, ‘असं काही नाही. मी कोरडा उपदेश करत नाही. मी तुझ्या जागी असतो तरी मी समजून घेतलं असतं.’ विशाखा विचित्र हसली. ते भयंकर वाटलं डॉक्टरांना. त्यांनी विचारलं, ‘काय झालं हसायला?’ विशाखा म्हणाली, ‘संदेशचं माझ्या ज्या मैत्रिणीसोबत अफेअर आहे म्हणून सांगतेय, ती स्वाती आहे. तुमची बायको. मगापासून मुद्दाम तिचं नाव घेणं टाळत होते. आता सांगा, मी काय केलं पाहिजे?’ डॉक्टर खूप वेळ शांत बसले. विशाखाही.

jarvindas30@gmail.com



Source link

लोक-संचित: काळ मातला मातला…

0
लोक-संचित: काळ मातला मातला…


प्रवीण दशरथ बांदेकर12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

या काळाने आमच्या जिभा छाटून टाकल्यात. आमचे मेंदू बधीर करून टाकलेत. निव्वळ निव्वळ वखवखलेल्या वासना असलेली रानटी जनावरं बनून गेलो आहोत आम्ही. शिवाय, असंवेदनशीलतेबरोबर निर्बुद्धपणाही पराकोटीचा जाणवत राहिला आहे. माझी जात, माझा धर्म, माझे देव, माझे पुढारी या परते माणूस म्हणून जगण्यासाठी आणखीन काही असू शकतं, हे आपल्या मनातही येऊ नये, इतकं हे बथ्थडपण जगणं व्यापून राहिलं आहे.

काल-परवाच तर शाळा-कॉलेज सुरू झाली आहेत. मुला-मुलींच्या एकमेकांशी अजून धड ओळखीपाळखीही झालेल्या नाहीत. तरीही, काल-परवाच कधी तरी, एका मुलाने आठ-दहा मुलांची गँग बनवून एका मुलीचा पाठलाग केला. तक्रार झाली. चौकशी झाली. त्या मुलाला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. बाकीच्यांना समज देण्यात आली. पण मग या घटनेला फाटे फुटू लागले. राजकीय हस्तक्षेप सुरू झाले. धार्मिक आणि जातीय रंग फासले जाऊ लागले. प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं. साहजिकच, मॅनेजमेंटनं बिनशर्त माघार घेणं, मुलीच्या पालकांकडून आपली काही चूक नसल्याचं पत्र घेणं, मुलीला कॉलेजमधून काढून घरी बसवणं वगैरे गोष्टी रीतीप्रमाणे पार पडल्या. प्रकरणावर पडदा पडला. लोक सगळं विसरून गेले. रोजचं रुटीन मागील पानावरून पुढे सुरू झालं. आसपास कुठेही घडणारी ही घटना. ही एकच असं नव्हे, अशा कैक घटना रोज आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपण त्यात गुरफटत जातो; अस्वस्थ होतो; जिवाला त्रास करून घेतो. काही दिवसांनी त्यातून बाहेर येतो, विसरून जातो. तोवर दुसरंच काही तरी समोर आलेलं असतं. मग पुन्हा तेच आणि तसंच घडत राहतं. कधी थेट आपल्याशी संबंधित, कधी दुरान्वयानेही आपल्याशी संबंधित नसलेलं. पण तरीही आपल्याला ते टाळता येत नाही. आपण जगत असलेल्या वर्तमानाचा, आपल्या वाट्याला आलेल्या काळाचा तो एक भाग असतो. आपण कितीही कानाडोळा केला, अलिप्त राहावं म्हटलं, तरी आपल्याला आतल्या आत ते कुरतडत राहतं. छळत राहतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र काळ इतका का सोकावला आहे? इतक्या कशा संवेदना बोथट झाल्यात? हे बथ्थडपण, हे अविवेकी वागणं, इतकं कसं रुजत गेलं या मेंदूंमध्ये? ज्या देशात आयाबायांच्या अब्रूच्या रक्षणासाठी माणसांनी प्राण पणाला लावले, प्रसंगी राज्ये गमावली, देशोधडीला लागले, त्याच देशाची माती इतकी कशी बदलून गेली? हे कुठले उन्माद, कुठला हिंस्त्रपणा या काळाने लादलाय आमच्यावर? आपल्याच वाट्याला का आलाय हा भयंकर क्रूर काळ? त्रासदायक आहे हे सगळं. त्रास होतोय, प्रचंड त्रास होतोय विचार करताना. हे असं बाहेर जसं सतत काही ना काही घडत असतं, तसंच ते आपल्या आतही सतत घडत राहिलेलं असतं. बाहेर घडणारं आणि आपल्या कानां-डोळ्यांपर्यंत येऊन पोचणारं बहुतेक बरचंसं आपल्याला असं त्रासदायक वाटणारं असतं. आपल्या आत घडणाऱ्याबद्दलही तसंच म्हणावं लागेल. तेही तितकंच दुखरं, ठणका लावणारं, जिवाची घालमेल करणारं असंच असतं. कितीही ठरवलं तरी, आपल्या घरात, गल्लीत, आवाठात, कामाच्या ठिकाणी, राज्यात, देशात आणि पार अगदी दुनियेच्या कानाकोपऱ्यांत कुठंही घडणारं नजरेआड करता येत नाही. आपली इच्छा असो, नसो; ते आपल्या मेंदूत घुसत असतं. अस्वस्थ बनवत असतं. अशा वेळी, आपण चुकीच्या काळात जन्माला आलो आहोत, असं अनेकदा मनात येतं. खरं तर, चुकीचा काळ म्हणजे काय, हेही आपल्याला नेमकेपणाने सांगता यायचं नाही. या आधीचा काळ जन्माला यायला योग्य होता नि आताच सगळं बिघडून गेलं आहे, असं काही समजणंही तितकंच चुकीचं आहे. लहानपणी रामायणातल्या गोष्टी, शिवाजी महाराजांचे पराक्रम, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या रोमहर्षक गोष्टी वगैरे वाचनाना मला नेहमी वाटायचं, आपण तेव्हा का जन्माला आलो नाही? म्हणजे मग आपण अगदीच काही नाही तरी रामाच्या सैन्यातला एखादा वानर तरी झालो असतो. किंवा मग, शिवाजी महाराजांचा एखादा मावळा म्हणून तरी जन्मायला हवं होतं. स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आलो असतो, तर बाबू गेनूसारखं वगैरे आपणही काही तरी नक्कीच केलं असतं. म्हणजे पुन्हा तेच! आजच्या काळात करण्यासारखं काहीच नाहीय आणि आपण आता नुसतेच निरर्थक जगत वाया जातोय. पण मग हळूहळू, घडत्या आणि वाढत्या वयात करण्यासारखं खूप काही आहे, फक्त लढाया करणं म्हणजेच देशसेवा नव्हे, याचंही आपसूकच भान येत गेलं. मग अर्थातच आपल्या मनोधर्माप्रमाणे स्वीकारलेल्या क्षेत्रात काम करताना जमेल तसं आपला काळ समजून घेत राहणं, भवतालाविषयी संवेदनशील राहत झेपेल तितका अवकाश कवेत घेणं, आयुष्यभरासाठी सुरू राहिलं होतं. पण, गेल्या काही वर्षांपासून हे इतकंही करण्यापासून आपल्याला रोखण्यात येतंय, हेही जाणवू लागलंय. उपलब्ध माध्यमांचा वापर करून तुम्ही आमच्या नजरेखाली आहात, तुमच्या प्रत्येक कृती-उक्तीवर आमचे नियंत्रण आहे, याचा कधी आडून, आडून तर कधी थेटपणे इशारा दिला जातोय, ही अस्वस्थ करणारी जाणीव सतत होते आहे. बाहेर जे काही चाललं आहे, त्याची तुम्ही दखल घ्यायची नाही, जे घडतंय त्यावर साधी प्रतिक्रियाही द्यायची नाही, जे घडतंय वा घडवलं जातंय, ते व्यापक देशहिताचं आहे, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे, असं समजून निमूट राहायचं. असं वाटतंय की, या काळाने आमच्या जिभा छाटून टाकल्यात. आमचे मेंदू बधीर करून टाकलेत. निव्वळ निव्वळ वखवखलेल्या वासना असलेली रानटी जनावरं बनून गेलो आहोत आम्ही. शिवाय, असंवेदनशीलतेबरोबर निर्बुद्धपणाही पराकोटीचा जाणवत राहिला आहे. माझी जात, माझा धर्म, माझे देव, माझे पुढारी या परते माणूस म्हणून जगण्यासाठी आणखीन काही असू शकतं, हे आपल्या मनातही येऊ नये, इतकं हे बथ्थडपण जगणं व्यापून राहिलं आहे. मला इतिहासाविषयी काही वाटत नाहीय, भूतकाळातल्या माझ्याच पूर्वजांनी पराकोटीच्या अभावात जगतानाही गाजवलेल्या कर्तृत्वाविषयी जाणून घ्यावंसं वाटत नाहीय. मला इतिहास आणि भूतकाळ हवा आहे, तो माझ्या सोयीनं. किंवा खरं तर, ज्यांच्याकडे मी माझा मेंदू राजीखुशीनं सोपवला आहे, त्यांना सोयिस्कर ठरेल असाच तो मला बदलून, मोडतोड करून हवा आहे. माझा भूतकाळ आणि माझा समकाळ समजून न घेण्यातच माझं भलं आहे, एवढंच मला माहीत आहे. त्रास होतोय तो याच गोष्टीचा! त्यातूनच मग अलीकडं सारखं वाटत राहतं, आपल्याला हा संवेदनशील असण्याचा शाप कुणी दिला असावा? का नाही बाकीच्यांसारखं माझंही मन दगड बनून जात? मणिपूरमध्ये काय चाललंय? बारसूमध्ये कोण रडतंय? आपल्या आदर्शांना कोण गोळ्या घालून संपवू पाहतंय? का आणि कशासाठी आपण इतके हळहळतोय? यार येरू, तू कसलाही विचार नको ना करूस! डोळे, कान, तोंड बंद करून जगत राहा ना बाकीच्यांसारखं! असं आपल्याला स्वतःला का बजावून सांगता येत नाहीय? एकेकदा वाटतं, सूर्य मावळून हळूहळू काळोख गडद होत गेल्यावर मिणमिणत राहणं, हे जसं काजव्यांचं भागधेय असतं, तसंच असावं हे. आपली अस्वस्थता, विवेकी जगणं, धुगधुगती संवेदनशीलता आपण ही अशीच मिणमिणती ठेवली पाहिजे. कधी कूस पालटेल हा काळ, माहीत नाही. तोवर माथ्यावरच्या या काळवंडलेल्या आभाळातले हे उदासीन तारे आणि पायतळीच्या किडलेल्या मातीतले हे सरपटत पायांखाली येणारे वळवळणारे कृमी सहन करत राहणं भाग आहे. नव्हें तें चि करी न भे कळिकाळा, तुका म्हणे लीळा खेळे मानू… असं म्हणत आपल्या वाट्याला आलेल्या काळाचा वोळसा सोसणारे जगतगुरू तुकाराम महाराज तर हरक्षणाला आपल्या सोबतच असतात. म्हणूनच तर, या कळिकाळाला न भीता काळाच्या या विक्राळ लीळांना वाकुल्या दाखवत पुढे चालायचं बळ मिळत असतं ना!

samwadpravin@gmail.com



Source link

आरोग्य: ‘स्वास्थ्य – अमृता’साठी…

0
आरोग्य: ‘स्वास्थ्य – अमृता’साठी…


डॉ. अविनाश भोंडवे16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताने स्वातंत्र्याचा अमृतकलश मिळवून ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या आपल्या देशाला आता गरज आहे, आरोग्याचा अमृतकाल आणण्याची. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण यांप्रमाणे ‘आरोग्य’ हा देखील नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. पण, तो त्यांना अबाधितपणे मिळाला, तरच हे ध्येय साध्य होईल. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारताच्या आरोग्य सेवेतील कच्चे दुवे पाहिले, तर देशाने कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, हे स्पष्ट होईल. भारतीयांना रास्त दरातील उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी अडचणींचे अनेक डोंगर पार करावे लागतील.

सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा मिळते, ती सरकारी रुग्णालये आणि सरकारी दवाखान्यांतून. पण, संपूर्ण भारतात आजच्या घडीला ग्रामीण आणि दुर्गम भागांना आरोग्य सेवा देणारी एकूण ३० हजार ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नागरी भागात एकूण २६ हजार सरकारी हॉस्पिटल आहेत. यामध्ये कम्युनिटी हेल्थ सेंटर, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये असे प्रकार आहेत. भारताच्या १४० कोटी जनतेच्या दृष्टीने ती खूपच अपुरी आहेत. डॉक्टर, नर्स, कुशल टेक्निशियन यांची संख्याही खूप तुटपुंजी आहे. अनेक रुग्णालयांत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे, उपकरणे यांची सतत वानवा असते. त्यातही बायपास सर्जरी, अॅन्जिओप्लास्टी, अवयवारोपण, कर्करोगाचे उपचार, वंध्यत्वामधील उपचार असे उच्च पातळीचे उपचार आणि शस्त्रक्रिया करणारी हॉस्पिटल हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. त्यामुळे ८० टक्के जनता परवडत नसतानाही खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये औषधोपचार करून घेते. आरोग्य सेवेतील ही विषमता आणि अनुशेष येत्या पाच-दहा वर्षात भरून काढायला हवा. ही सर्व सरकारी हॉस्पिटल संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ट्या किमान ५० टक्क्यांनी वाढली पाहिजेत. तरच मध्यमवर्गीय आणि गरीब रुग्णांना पैशांच्या अभावामुळे उपचारांपासून वंचित राहावे लागणार नाही. भारतात सरकारी वैद्यकीय महाविद्यालये कमी आणि खासगी मेडिकल कॉलेज जास्त अशी परिस्थिती आहे. याबरोबरच, नर्सिंग कॉलेज आणि तांत्रिक कार्यासाठी मदतनीस तयार करणाऱ्या सरकारी शिक्षण केंद्रांची संख्या आवश्यकतेच्या तुलनेत फारच कमी आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या मते, लोकसंख्येच्या वाढीनुसार भारताला आणखी २५ टक्के जास्त डॉक्टरांची गरज आहे. काही वर्षांपूर्वी प्रत्येक जिल्ह्याला एक सरकारी मेडिकल कॉलेज काढण्याची घोषणा केली गेली होती, तिची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. गरीबांना वैद्यकीय उपचारांसाठी आयुष्मान भारत, आभा कार्ड किंवा राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उपलब्ध आहेत. या योजनेत ५ लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत केला जातो. त्यासाठी दीड लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचा दाखला असलेल्या व्यक्तींनाच नाव नोंदवता येते. त्यानंतर सरकार त्या व्यक्तीच्या नावाने खासगी किंवा निमसरकारी विमा कंपनीचा आरोग्य विमा उतरवते. हे झाल्यावर ती व्यक्ती आयुष्मान भारत योजनेमध्ये नोंदवलेल्या कोणत्याही खासगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकते. थोडक्यात, या योजना म्हणजे विमा योजना आहेत. आज भारताला विमाधिष्ठित आरोग्य योजनेची नव्हे, तर सेवाधिष्ठित उपचारांची गरज आहे. त्यासाठी सरकारी रुग्णालयांची आणि त्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या दीडपट वाढवणे आवश्यक आहे. या साऱ्या सुधारणा करण्यासाठी सरकारला निधीची गरज असते. पण, गेली अनेक वर्षे केंद्रीय आणि राज्यस्तरीय अर्थसंकल्पात जीडीपीच्या केवळ १ ते १.५ टक्केच निधी वैद्यकीय क्षेत्रासाठी राखून ठेवला जातो. कोरोना महामारीच्या काळात सरकारी वैद्यकीय सेवा आणि उपकरणे किती कमी पडली होती, याची आठवण ठेवून या पुढील काळात केंद्रीय आणि राज्यस्तरीय अर्थसंकल्पात जीडीपीच्या ५ टक्के निधी आरोग्य क्षेत्रासाठी राखून ठेवला जावा. १९६२ च्या चीन युद्धात भारतीय सैन्याकडे कपडे, उपकरणे, शस्त्रास्त्रे, वाहने या सर्वांचीच उणीव होती. पण, त्यानंतरच्या ८-९ वर्षात ही परिस्थिती बदलून भारताने सैन्य बळ वाढवले. एवढेच नव्हे, तर देशाने अणुबॉम्बही बनवला. हीच गोष्ट कृषी क्षेत्रातही लागू होते. १९७२ च्या दुष्काळात भारताला ‘मिलो’ नावाचा जनावरांना खायला घातला जाणारा गहू घ्यावा लागला होता. पण, त्यानंतर आज भारत अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण तर बनला आहेच, पण जगातील अनेक राष्ट्रांना गहू निर्यात करत आहे. सैनिकी आणि अन्नधान्याच्या क्षेत्रातील या क्रांतीप्रमाणे, येत्या ५-१० वर्षात भारतीय आरोग्य सेवेमध्येही प्रगती व्हावी आणि भारतीय नागरिकांना त्यांच्या हक्काची स्वास्थ्य सेवा मुक्तपणे मिळावी. तसे झाल्यास भारतीयांच्या निरामय आरोग्याचा अमृतकाल उदयाला येईल.

संपर्क : ९८२३०८७५६१

avinash.bhondwe@gmail.com



Source link

कृषी: समवर्ती सूचीत यावी शेती

0
कृषी: समवर्ती सूचीत यावी शेती


डाॅ. शरद निंबाळकर19 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून स्वीकारला गेला असला, तरी देश स्वतंत्र झाल्यानंतरच शेती आणि शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिले गेले. पंचवार्षिक योजनांमधून त्यांची प्रगती साधण्याचे भरकस प्रयत्न झाले. त्यामुळेच कधीकाळी ५२ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन असलेला देश आज ३१५.७ दशलक्ष टन इतके उत्पादन घेणारा ठरला आहे. अनेक धान्यांच्या उत्पादनात तो जगात पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये; सरकार, शेतकरी-शेतमजूर, शास्त्रज्ञ, बियाणे-खतांचे उत्पादक या सर्वांचे मोठे योगदान राहिले. उन्नत बियाणे, उत्तम सिंचन व्यवस्था, सहकाराचे देशभर पसरलेले जाळे या सर्वांमुळे अन्नधान्यासाठी परावलंबी असलेला देश स्वावलंबी झाला.

देशाच्या ‘अमृतकाळा’मध्ये कृषी क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्याची जिद्द भारतीयांनी बाळगली आहे. पण, या क्षेत्रात आपण काही बाबतीत स्वयंपूर्णता गाठली असली, तरीही शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही पूर्णतः सुटलेल्या नाहीत. त्या सोडवत स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत कृषी-समृद्धीचे ध्येय गाठण्याकडे देशाची वाटचाल सुरू आहे. कृषिप्रधान देशात आजही चार लाखांवर शेतकरी आत्महत्या होत आहेत, ही भूषणावह बाब नक्कीच नाही. या अमृतकाळात अशा समस्यांवर सखोल चिंतन आणि कार्यान्वयन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने समस्या आणि संभाव्य उपायांची चर्चा क्रमप्राप्त ठरते. शेतजमीन दिवसेंदिवस कमी होत आहे. सिंचन व्यवस्था आजही पाहिजे तितकी सक्षम नाही. पीक पद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते तसेच इतर निविष्ठांसाठी परावलंबित्व कायम आहे. हवामान बदलामुळे तीव्र उन्हाळा, गारपीट, अवकाळी पाऊस, पूर यांसारखी संकटे वाढली आहेत. शेतमालाला श्रमावर आधारित बाजारभाव न मिळणे देशातील शेतकऱ्यांसमोरचा गंभीर प्रश्न आहे. अनियंत्रित बाजार धोरण ही एक बिकट समस्या बनली आहे. आयात निर्यात धोरण, शेतीसाठीचे अर्थसाह्य या आणि अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी ‘कृषी’ हा विषय संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या ‘समवर्ती सूची’मध्ये समाविष्ट करून शेतीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसे झाले तर २०४७ पर्यंत देश कृषी क्षेत्राच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ होऊ शकेल. देशात सुमारे १४३ दशलक्ष हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. २०५० पर्यंत त्यात फारशी वाढ संभवत नाही. त्यातील बरेचसे क्षेत्र कोरडवाहू आहे. सध्या आपल्याला दर दिवशी प्रति व्यक्ती ५५० ते ६०० ग्रॅम अन्नधान्य प्राप्त होते. येत्या काही वर्षांत ही गरज ७०० ग्रॅमपर्यंत जाईल. त्यामुळे ५०० ते ५५० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी देशात जास्त प्रमाणात असलेल्या कोरडवाहू जमिनीला सिंचन सुविधा पुरवून हेक्टरी २.५ ते ३ पट उत्पादन वाढवावे लागेल. मान्सूनवर आधारित असलेल्या आपल्या शेतीला शाश्वत बनवण्यासाठी नदीजोड प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो. १९२६ मध्ये सी. पी. रामस्वामी अय्यर यांनी नद्या जोडण्याची संकल्पना मांडली होती. त्याला शंभर वर्षे होत आले तरी याबाबतीत अपेक्षेइतके झालेले नाही. त्यामुळे आगामी काळात नदीजोड संकल्पनेचा प्रचार, विस्तार आणि कार्यान्वयन करावे लागेल. या बाबतीत एका कृतीतून काय साध्य होऊ शकते, याचे एक उदाहरण म्हणजे विदर्भातील ‘वैनगंगा-नळगंगा’ प्रकल्प. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने रखडला आहे. गोसीखुर्द धरणातून २ हजार ४२१ दशलक्ष घनमीटर पाणी पश्चिम विदर्भात आणण्यासाठी ४७८.२ किलोमीटरच्या कालव्याची गरज आहे. या कालव्यातून भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत पाणी पोहोचवले जाऊन त्यातून ४ लाख १३ हजार हेक्टर शेती अोलिताखाली येईल. असे छोटे-मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भ – मराठवाड्याच्या वाट्याला आलेला ‘आत्महत्याग्रस्त’ हा अभिशाप दूर होईल. शेती आणि शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी शेतीचा ‘समवर्ती सूची’मध्ये समावेश करण्याबरोबरच कृषी अनुकूल धोरण, शेतमालाला योग्य भाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन सुविधांची उपलब्धता, याेग्य मशागत, जोमदार बियाणे, बँकांचे सहकार्य तसेच उत्पादन आणि पुरवठा साखळीचे बळकटीकरण या गोष्टी प्रयत्नपूर्वक साध्य कराव्या लागतील. तसे झाल्यास देशाच्या अमृतकाळात आपल्या शेती आणि शेतकऱ्यांना नक्कीच बरकत येईल. संपर्क : ९४२२१६०९५५

drsanimbalkar@gmail.com



Source link

शिक्षण: ज्ञानाच्या बळावरच  देश बनेल ‘विश्वगुरू’

0
शिक्षण: ज्ञानाच्या बळावरच  देश बनेल ‘विश्वगुरू’


सचिन उषा विलास जोशीएका दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

देश स्वातंत्र्याची ७६ वर्षे पूर्ण करीत उद्याच्या जगाचे नेतृत्व करण्यासाठी नव्या उमेदीने पुढे निघाला आहे. हे ध्येय साध्य करायचे असेल, तर येत्या काळात काही क्षेत्रांवर जाणीवपूर्वक काम करावे लागेल. त्यामध्ये; शिक्षण, आरोग्य आणि कृषी ही तीन क्षेत्रे विशेष प्राधान्याची असतील. दोन दिवसांवर आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने या क्षेत्रांसमोरची आव्हाने आणि संधी यांचा घेतलेला हा वेध… स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ते शताब्दी हा पंचवीस वर्षांचा काळ देशाच्या शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने आव्हानांनी भरलेला आणि त्याचवेळी संधींनी भरलेला असेल. सर्वच क्षेत्रात ‘विश्वगुरू’ होण्याचं भारताचं ध्येय असेल, तर दर्जेदार शिक्षण हेच ते गाठण्याचं माध्यम असेल. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील आजची प्रतिकूल परिस्थिती अनुकूलतेत बदलावी लागेल. तसेच मोठ्या प्रमाणात नवकल्पना राबवून परिवर्तन घडवण्याची सारी धुरा युवा पिढीच्या खांद्यावर द्यावी लागेल. हे साध्य करण्यासाठी या क्षेत्राचा लेखाजोखा घेण्याची गरज आहे. काय आहे आजची परिस्थिती? काही ठिकाणी मुलांना नदी ओलांडून शाळा गाठावी लागते. अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. भारतात आजही अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण हक्क कायदा ग्रामीण भागात घराघरांपर्यंत पोहोचला असल्याचं आपण आजही छातीठोकपणे सांगू शकत नाही. वास्तविक डॉ. कस्तुरीरंगन यांनी २०२० मध्ये आणलेल्या आणि अंमलबजावणीच्या वाटेवर असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार, मुला-मुलींच्या शिक्षणाचं वय ३ ते १८ ठरवलं गेलं आहे. या वयातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण, कागदावरच्या कायद्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कृतिशील प्रयत्नांची गरज असते. त्यासाठी लागते ती इच्छाशक्ती! तीही असेल तरी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण कमी पडतो. शाळांसाठी आवश्यक सोयी-सुविधा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिक्षकांनी खूप प्रयत्न करून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण कमी झालं. आता या विद्यार्थ्यांना शाळेत टिकवण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मेकॉलेची शिक्षण पद्धती झुगारून नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंगीकारायला हवं. विनाकौशल्य मिळालेल्या पदव्या कामाच्या ठरत नाहीत. शिक्षणाचा योग्य जागी उपयोग करता येणं फार महत्त्वाचं आहे. आज सर्वांत जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या टॉप-१० देशांमध्ये आपला भारत नाही. देशातील पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना पायाभूत गणित, वाचन येत नाही. ही परिस्थिती बदलायला आपणच कंबर कसली पाहिजे. प्रत्येक तरुणाने घराजवळच्या एका विद्यार्थ्याला ‘वन टू वन’ शिकवलं, तरी हे विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करतील. प्रत्येक मुलाला त्याच्या इयत्तेचं ज्ञान देणं आपलं काम आहे. सरकारने शिक्षणावर ६ टक्के खर्च करायला हवा. काही मूलभूत बदल केले तर बरंच काही चांगलं घडू शकतं. येत्या पंचवीस वर्षांत टॉप शंभर विद्यापीठांत आपली पंचवीस विद्यापीठं असतील. इनोव्हेशनमध्ये भारत पुढे असेल. पुढचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. या क्षेत्रात भारतातील तरुण अग्रस्थानी असतील. तंत्रज्ञानाचा योग्य वापर होईल. पण त्याचवेळी, चॅट-जीपीटीसारख्या आधुनिक प्रणालींनी शिक्षणाचे आयाम बदलतील. त्या स्थितीत पायाभूत साक्षरता आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून, जोडीला विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची सवय लावून घेतली आणि या दोन्हींचा मेळ घालता आला, तर शैक्षणिक क्षेत्राची भरभराट होईल. जगाला असलेली सर्जनशील मनुष्यबळाची गरज भारत पूर्ण करू शकेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतील. अशी सर्व कौशल्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आली आहेत. आपल्यासमोर दोन आव्हानं आहेत. एक पायाभूत साक्षरता आणून इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करून देणं आणि दुसरं ज्यांना इयत्तेनुसार ज्ञान प्राप्त झालं आहे, त्यांना एकविसाव्या शतकातली कौशल्ये आत्मसात करून देणे. सर्जनशीलता, समस्या हाताळणे, संघटन आणि संवाद ही या शतकातील कौशल्ये आहेत. ती विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कारण हेच भविष्यातील शिक्षण आहे. बुद्ध्यांकाच्या (आयक्यू) इतकेच महत्त्व भावनांक (इक्यू) आणि सामाजिक गुणांकाला (एसक्यू) देणं गरजेचं आहे. चॅट-जीपीटीसारख्या प्रणाली बऱ्याच प्रमाणात आयक्यूचा ताबा घेतील. त्यामुळे आपल्याला मुलांच्या इक्यू आणि एसक्यूवर काम करावे लागेल. त्यासाठी गुणी शिक्षकांना योग्य सन्मान देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे चांगल्या शिक्षकांचं फारसं कौतुक होत नाही आणि पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा प्रयत्नांची गरज आहे. देशाने आमच्यासाठी काय केलं? असं आजवर विचारत आल्याने आपण शिक्षणात मागे राहिलो. यापुढे आपण साऱ्यांनी अशा शिक्षण पद्धतीचा आग्रह धरला तरच या क्षेत्रात बदल घडेल. ही एकट्या सरकारची जबाबदारी नाही. प्रश्न आपल्या पाल्यांचा, नव्या पिढीचा आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे, ती देशासाठी आपण काय करू शकतो, हा विचार करण्याची. त्या दृष्टीने पुढच्या पाच वर्षांत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सरकार, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग, सर्व संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि एकूणच समाजाने मनापासून केली, तर देशात निर्माण होणाऱ्या ज्ञानाची हीच ताकद स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत देशाला महाशक्ती किंवा विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न साकार करू शकेल.

espaliersachin@gmail.com



Source link

सोलापुरात शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर, सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर ट्रॅफिक जॅम

0
सोलापुरात शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर, सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर ट्रॅफिक जॅम


13th August Headlines : शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक झाली. सुमारे साडे तीन तास झालेल्या या बैठकीत विविध मुद्दे चर्चेला आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणावर आजही प्रतिक्रिया येण्याच्या शक्यता आहे. त्याचवेळी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरातल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सोलापुरात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर 

शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आज एकाच मंचावर येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमने-सामने दिसणार आहेत. दोघेही काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात दोन दिग्गज नेते आमनेसामने असतील. त्यामुळे राज्याचे लक्ष लागलेय. 

पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात हे दोघेही एकाच मंचावर होते मात्र यावेळी पंतप्रधानांसोबत राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री , अजितदादा पवार वगैरे सर्वचजण उपस्थित असल्याने या शासकीय कार्यक्रमात टोलेबाजी पाहायला मिळाली नव्हती. मात्र सांगोला येथे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण  कार्यक्रमात हे दोन नेते आमने सामने येणार असल्याने पहाटेच्या शपथविधीबाबत दोघात रंगलेले आरोप-प्रत्यारोप पुन्हा समोर दिसणार का याची उत्सुकता सर्वांना आहे . 
 
सोलापूर –  

सोलापुरातल्या डोणगाव रोड येथे आयटी पार्कचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
 
सलग सुट्टी, पर्यटक आणि ट्रॅफिक जॅम – 

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळ आणि देवस्थानावरील पर्यटकांच्या गर्दीची शक्यता आहे. सलग सुट्ट्या आल्याने अनेकजण आपल्या गावी जात असतात. तर काही जण पर्यटन आणि देवस्थानावर जात असतात. त्यामुळे मुंबई –पुणे, मुंबई – गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता आहे. पुणेमुंबई एक्सप्रेस हायवेवर तर शनिवारी सकाळपासूनच वाहनांच्या खंडाळा बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

रत्नागिरी – 16 तारखेपर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची पसंती ही कोकणला असणार आहे. सध्या पावसाने देखील विश्रांती घेतलेली आहे. शिवाय कोकणचा निसर्ग सौंदर्य देखील अधिक खुलून गेले आहे. त्यामुळे कोकणात पर्यटकांचा ओघ आणखीन वाढेल.

अहमदनगर 

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी आज सकाळी 11 वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड, खासदार सुजय विखे,  भाजप आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

नंदुरबार

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळावा होणार आहे.

 



Source link

Nagpur crime : वाळू माफियांची मुजोरी.. तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून पाय मोडला, नागपुरातील घटना

0
Nagpur crime : वाळू माफियांची मुजोरी..  तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून पाय मोडला,  नागपुरातील घटना


त्यानंतर ट्रॅक्टरचा मालक व अन्य एक व्यक्ती मोटारसायकलीने घटनास्थळी दाखल झाला. ‘तुम्ही माझा ट्रॅक्टर वारंवार कसा लावता? तुमचा बंदोबस्त लावतो’, असे म्हणून चालक आशिष काटेखाये, मालक पंकज काटेखाये व एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून घटनास्थळी असलेल्या तलाठी किरण मोरे यांचे अंगावर भरधाव वेगाने वाळूचा ट्रॅक्टर चालविला.



Source link

Special Report Doctor : डॉक्टरांवर हल्ला कराल, तर उपचारांना मुकाल! नॅशनल मेडिकल कौन्सिलचा निर्णय

0
Special Report Doctor : डॉक्टरांवर हल्ला कराल, तर उपचारांना मुकाल! नॅशनल मेडिकल कौन्सिलचा निर्णय



<p>रुग्णाकडून तोडफोड, &nbsp;डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना नेहमी घडतात. त्यामुळे डॉक्टरांवरचे हल्ले बघता त्यांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता नॅशनल मेडिकल कौन्सिलने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलाय ज्याचं इंडियन मेडिकल कॉन्सिलने स्वागत केलंय. हा निर्णय नेमका काय आहे पाहुयात या रिपोर्टमधून…</p>



Source link

Ajit Pawar Sharad Pawar Meet Special Report:अजित पवार – शरद पवार गुप्त भेट’माझा’च्या कॅमेरात थेट

0
Ajit Pawar Sharad Pawar Meet Special Report:अजित पवार – शरद पवार गुप्त भेट’माझा’च्या कॅमेरात थेट



<p>अजित पवार गाडीत लपून का गेले? गुप्त भेट ‘माझा’च्या कॅमेरात थेट</p>



Source link