


पुणे : तापमान वाढीसह उष्णतेच्या लाटेमुळे जगभरात प्रसूतींमधील गुंतागुंत आणि जोखीम वाढत आहे. त्यातून मुदतपूर्व प्रसूती, अर्भक मृत्यू, व्यंग असलेले अर्भक जन्माला येण्यासह माता मधुमेह यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत, असे अमेरिकास्थित ‘क्लायमेट सेंट्रल’ संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत गेल्या वर्षी धोक्याचा इशारा दिला होता.
‘क्लायमेट सेंट्रल’ने २०२० ते २०२४ या पाच वर्षांतील उष्णतेच्या लाटेचा गर्भवतींवर होणारा परिणाम अभ्यासला. संस्थेने या अभ्यासाचा अहवाल जाहीर केला आहे. या अभ्यासात २४७ देशांपैकी २२२ देशांचा समावेश होता. तापमान बदलामुळे मुदतपूर्व प्रसूतीची जोखीम वाढविणाऱ्या अतिउष्ण दिवसांमध्ये गेल्या ५ वर्षांत दुपटीने वाढ झाल्याचा निष्कर्ष यातून समोर आला. यात सर्वाधिक वाढ विकसनशील देशांमध्ये झाली आहे. या देशांमध्ये कॅरिबियन देश, मध्य व दक्षिण अमेरिका, आशिया आणि सहारा उपखंड यांचा समावेश आहे. या देशांमध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम नसताना हा धोका वाढल्याने त्याचे आणखी गंभीर परिणाम होत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
संशोधकांनी केवळ प्रसूतीशी निगडित गुंतागुंत वाढविणाऱ्या अतिउष्ण दिवसांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे प्रत्येक देशांमध्ये प्रत्यक्ष काय परिणाम झाला, हे तपासलेले नाही. मात्र, ‘क्लायमेट सेंट्रल’च्या संशोधकांनी ‘यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेच्या अहवालाचा दाखला दिला आहे. केवळ एका अतिउष्ण दिवसामुळे प्रसूतीशी निगडित गुंतागुंत वाढू शकते. त्यातून मुदतपूर्व प्रसूती, अर्भक मृत जन्माला येणे, बाळाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम यांसह मातामृत्यूचा धोका संभवतो, असे अहवालात नमूद करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी जून महिन्यात उष्णतेचा प्रसूतीवर होणारा परिणाम मांडणारा अहवाल सादर केला होता. त्यानुसार, जास्त तापमानामुळे मुदतपूर्व प्रसूती आणि मृत अर्भक जन्माला येणे, असे गंभीर परिणाम दिसून येतात. याचबरोबर गर्भवतींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा विकारही होऊ शकतो. उष्णतेच्या लाटेमुळे हृदयविकाराचा झटका येण्यासह श्वसनविकाराची गुंतागुंतही होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.
तज्ज्ञांचे मत
अतिउष्ण वातावरणामुळे गर्भवतींच्या प्रकृतीतील गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. घराबाहेर काम करणाऱ्या आणि उष्णतेपासून संरक्षणाची साधने नसलेल्या महिलांमध्ये हा धोका अधिक असतो. त्यामुळे कृषी, बांधकाम क्षेत्रासह उन्हात काम करावे लागणाऱ्या क्षेत्रातील महिला कामगारांवर याचा परिणाम होतो. याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. गर्भवतींना होणारा उष्णतेचा धोका कमी करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.- डॉ. गिरिजा वाघ, स्त्रीरोगतज्ज्ञ


सवाई माधोपूरमधील रणथंबोर व्याघ्रप्रकल्पातील ‘कानकटी’ ऊर्फ ‘अन्वी’ या वाघिणीने एकाच महिन्यात दोन मनुष्यबळी घेतले. या वाघिणीने १६ एप्रिलला याच व्याघ्रप्रकल्पातील त्रिनेत्र गणेश मंदिरातून आजी-आजोबांसोबत परत येणाऱ्या कार्तिक सुमन या मुलावर हल्ला केला. कार्तिक जागीच ठार झाला. या घटनेला एक महिना पूर्ण होत नाही तोच ११ मे रोजी वनसंरक्षक देवेंद्र चौधरी यांच्यावर या वाघिणीने हल्ला केला. यातील एका हल्ल्यानंतर ही वाघीण कुतलपुरा गावातील एका शेतात आली होती. लोकांनी छपरांवर चढून जीव वाचवला गावात वाघीण शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वनखात्याला कळवले. तिला जेरबंद करण्यासाठी बेशुद्ध करताना वनकर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. ती एका हॉटेलमध्ये शिरली होती. महत्प्रयासानंतर तिला बेशुद्ध करून पकडण्यात आले.
हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात आले असले तरीही तिच्याबद्दल भीती कायम आहे. तिला परत जंगलात सोडण्यावरून दोन मतप्रवाह समोर येत आहेत. वनाधिकाऱ्यांच्या मते तिच्या स्थलांतरणाचा निकाल आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे सोपवण्यात आला आहे. तर वन्यजीव अभ्यासकांच्या मते हल्लेखोर वाघीण खूप आक्रमक आहे. तिच्या मनातून माणसांची भीती निघून गेली आहे. त्यामुळे तिला खुल्या जंगलात सोडणे म्हणजे पुन्हा माणसांचा बळी देणे आहे. या वाघिणीला रणथंबोर व्याघ्रप्रकल्प सोडून इतर जंगलात सोडले तर तिथेही हल्ला करू शकते. त्यामुळे सरकारने तिला बंदिवासात सोडण्याचाच निर्णय घेतला पाहिजे. दरम्यान ‘कानकटी’ ऊर्फ‘अन्वी’ या वाघिणीला पिंजऱ्यात बंद करून ठेवण्यात आले आहे. मात्र, तिला किती काळ पिंजऱ्यात ठेवणार हा प्रश्न आहे. याचा निर्णय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण घेईल.
रणथंबोर व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ‘कानकटी’ वाघिणीने जिथे पहिला हल्ला केला, त्या त्रिनेत्र गणेश मंदिर रस्त्यावर, जोगी महाल, किल्ला आणि त्या परिसरात १७ ते १८ वाघ, वाघीण आणि बछड्यांचा वावर आहे. यात ‘टी-८४’ म्हणजेच ‘अॅरोहेड’ वाघीण व तिचे तीन बछडे, रिद्धी वाघीण आणि तिचे तीन बछडे, सुलताना वाघीण आणि तीन बछडे याशिवाय तीन नर आणि इतरही वाघ आहेत. ‘कनकटी’ ही रणथंबोर व्याघ्रप्रकल्पातील ‘टी-८४’ म्हणजेच ‘अॅरोहेड’ची मुलगी आहे. वनखात्याने या वाघिणीला अजूनही क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे वनकर्मचारी आणि पर्यटक मार्गदर्शक तिला ‘कानकटी’ असे म्हणतात.
रणथंबोर व्याघ्रप्रकल्पात आतापर्यंत गेल्या २० वर्षांत ४० जणांचा बळी गेला आहे. गेल्या १५ वर्षांत सात वनकर्मचाऱ्यांवर वाघांनी हल्ला केला आहे. यात तीन वनकर्मचारी मृत्युमुखी पडले. २०१२ मध्ये सहाय्यक वनरक्षक घीसू सिंग, २०१५ मध्ये वनरक्षक रामपाल सैनी आणि आता मे २०२५ मध्ये रेंजर देवेंद्र चौधरी यांना वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. ‘कानकटी’ या वाघिणीने एकाच महिन्यात दोन मनुष्यबळी घेतले. यात एक सात वर्षांचा मुलगा कार्तिक सुमन, तर दुसरे व्यक्ती वनखात्यातील वनसंरक्षक देवेंद्र चौधरी आहेत.
‘कानकटी’ वाघिणीने दोन बळी घेतल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रणथंबोर प्रशासनाने झोन दोन आणि तीन पर्यटकांसाठी बंद केले. या पर्यटकांना झोन एक आणि चारमध्ये हलवण्यात आले. तसेच त्रिनेत्र मंदिर रस्ता पादचारी आणि दुचाकीस्वार भाविकांसाठी बंद करण्यात आला. या वाघिणीला इतरत्र हलवण्याची मागणी होत आहे. रणथंबोर वनखात्यातील वरिष्ठ अधिकारी याबाबत सरकारशी बोलत आहेत. ही वाघीणच नाही तर एकूणच वाघांचे हल्ले रोखण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

‘ईडी’कडून होणाऱ्या कारवायांचे सारे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षावर फोडले. बेहिशेबी ‘काळ्या’ पैशाच्या वापराला प्रतिबंध करणाऱ्या ‘पीएमएलए’ (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग) कायद्यात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात करण्यात आलेल्या सुधारणांना त्याच वेळी आपण विरोध करून या तरतुदींचा दुरुपयोग होण्याची शक्यता व्यक्त केली होती, पण ‘माझ्या विरोधाकडे दुर्लक्ष करण्यात आले. केंद्रात सत्ताबदल होताच या कायद्याचा सर्वात प्रथम वापर पी. चिदम्बरम यांच्याच विरोधात झाला’, याची आठवण पवार यांनी जाहीर कार्यक्रमात दिली. सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’च्या कारवायांना आधार देणारा हा ‘पीएमएलए’ कायदा वाजपेयी सरकारच्या काळात २००२ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यात वेळोवेळी बदल झालेच, पण २०१२ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अधिक कठोर तरतुदी आणल्या. काळ्या पैशाची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली. त्यामुळे काळ्या पैशांमधून जमा करण्यात आलेली संपत्ती लपविणे वा तिची कुठेही – वैध प्रकारेसुद्धा- गुंतवणूक करणे हे गुन्हेगारी कृत्य ठरले. या कठोर तरतुदीमुळेच कोणालाही अडकवण्याचा ‘ईडी’ला मार्ग मोकळा झाल्याचा आक्षेप घेतला जातो. यूपीए सरकारच्या काळात पीएमएलए कायद्यानुसार विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांवर गुन्हे दाखल झाले होते, पण कोणालाच अटक झाली नव्हती. याउलट भाजपप्रणीत सरकारच्या गेल्या ११ वर्षांत १९ विरोधी पक्षीय नेत्यांनी या कायद्यानुसार या ना त्या आरोपांत गुंतवून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पवारांनीच दिली. यातून विरोधी नेत्यांची कोंडी करण्यासाठीच या कायद्याचा काँग्रेस व भाजप या दोन्ही सरकारांच्या काळात वापर झाल्याचे सूचित होते. फरक एवढाच की, भाजप सरकारच्या काळात विरोधी नेत्यांना कोठडीत राहावे लागले.
काळा पैसा गैरमार्गाने पांढरा करण्याचे, तो सर्रास वैध व्यवसायात गुंतवण्याचे प्रकार वाढू लागल्याने त्याला आळा घालण्याकरता कठोर कायद्याची आवश्यकता होतीच. यानुसारच पीएमएलए कायदा करण्यात आला. मात्र या कायद्याच्या आधाराने राजकीय हिशेब चुकते करण्याचा झालेला प्रकार हा पूर्णत: चुकीचा. त्याचे समर्थन अजिबात करता येणार नाही. काळा पैसा बाळगणारा कोणीही असो, त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. पण भाजप सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात या कायद्याचा वापर फक्त काँग्रेस, द्रमुक, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा अशा विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधातच झाल्याचे अनुभवास येते. पीएमएलए कायद्याचा धाक दाखवत तसेच तुरुंगात डांबण्याची धमकी देत विरोधी पक्षातील अनेक प्रभावी नेत्यांना भाजपने नांगी टाकण्यास भाग पाडले. त्यात राज्यातील दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी, यशवंत जाधव अशा विरोधी नेत्यांच्या मुसक्या कधीही आवळल्या जातील, असे चित्र भाजपच्या वाचाळवीरांकडून रंगविले जात होते. ही सारी मंडळी भाजपला शरण गेली आणि चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडली. कायद्याचा असा राजकीय वापर करणे केव्हाही चुकीचे. कारवाईचा बडगा उगारला जाताच भाजपला शरण गेल्यास विरोधी पक्षातील लोक ‘स्वच्छ’ होतात, असे चित्र देशात निर्माण झाले.
स्वपक्षीय वा आघाडीतील नेत्यांवर मोठे आरोप झाल्यास त्यांच्यावरही यूपीएच्या काळात कारवाई होत होती. ए. राजा, कनिमोळी, सुरेश कलमाडी अशा अनेक ‘कलंकित’ नेत्यांना कोठडीत राहावे लागले. पुढे खटले चालून अथवा चौकशीअंती या प्रत्येकावरील कारवाई निरस्त झाली, तोवर यूपीएने सत्ता गमावली होती. भाजपप्रणीत सरकारच्या कारकीर्दीत ‘पीएमएलए’ च्या तरतुदींवर बोट ठेवून सोनिया गांधी यांच्या कुटुंबीयांना विविध गुन्ह्यांत गोवणे, तर पी. चिदम्बरम, कर्नाटकचे डी. के. शिवकुमार अशा बड्या नेत्यांना चौकशीच्या नावाखाली तिहार तुरुंगात ठेवणे असे प्रकार सुरू झाले. दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा झालेल्या आमदार-खासदारांची पदे वाचवण्यासाठी घटकपक्षांच्या दबावामुळे यूपीएने काढलेला वटहुकूम राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत फाडला होता खरा; पण २०२३ मध्ये ‘मोदी समाजाची बदनामी’ केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा सुरतच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे राहुल गांधीच खासदार म्हणून अपात्र ठरले. यातून ‘काँग्रेसने ज्या काही सुधारणा केल्या त्या त्यांच्याच अंगाशी आल्या’ असे चित्र दिसले होते!
मात्र भाजप सत्तेत आल्यापासून २०१४ पासून गेल्या दहा वर्षांत पाच हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले वा चौकशा करण्यात आल्या. पण गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमीच. यातून कायद्याचा दुरुपयोगच होत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना पुष्टी मिळते आणि कायद्याचा हेतूच धूसर होतो.


सातारा : रोहित पवारांची मला कीव येते. रावणाला राम म्हणायचे काम ते करत आहेत. नाव राम असले म्हणजे कुणी प्रभू श्रीराम होत नाही. ज्यांचे नाव राम आहे त्यांनी आजपर्यंत शकुनी मामाचीच कामे केली आहेत. रोहित पवार त्यांची वकिली का करत आहेत. सत्तेच्या विरोधात संघर्ष करूनच आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत, त्यामुळे सत्तेचे शहाणपण पवारांनी आम्हाला शिकवू नये. लवकरच आणखी काही घडामोडी घडतील आणि आज जे उन्हात आहेत ते लवकरच मांडवाखाली येतील, असा इशारा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणीप्रकरणी माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज पोलिसांनी चौकशी करताच आ. रोहित पवार यांनी एक ट्वीट केले होते. गोरे सत्तेचा गैरवापर करून रामराजेंना त्रास देत असल्याचे पवार म्हणाले होते. सत्ता येते आणि जाते; त्यामुळे गोरेंनी विचार करावा, असा इशाराही रोहित पवारांनी दिला होता.
यावर गोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘राम नाव असले, तरी कामे शकुनीसारख्या करणाऱ्या रामराजेंची बाजू घेणाऱ्या रोहित पवारांची कीव येते. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहे. आम्ही त्यात कधीही हस्तक्षेप करत नाही. जे तपासात समोर आले आहे, त्याची चौकशी केली जात आहे. ज्यांची चौकशी होतेय त्यांनी स्पष्टीकरण करावे. मी काही केले नाही, माझा आवाज नाही, माझे नाव नाही, माझा सहभाग नाही, हे रामराजेंनी सांगावे. रोहित पवार त्यांची वकिली कशासाठी करत आहेत. त्यांनी त्यांचे पाहावे. सत्ता आणि संघर्षाबाबत त्यांनी मला शिकवू नये. सत्तेच्या विरोधात संघर्ष करूनच आम्ही उभे राहिलो आहे.
आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या षड्यंत्रात बळी पडून आम्ही खूप दुःख सोसलेय. संघर्षाच्या छाताडावर उभे राहून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. त्यामुळे सत्तेचे आणि संघर्षाचे शहाणपण त्यांनी आम्हाला शिकवू नये. पवारांनी फार सोज्वळ गप्पा मारू नयेत. आम्हाला धमक्या तर अजिबात देऊ नयेत. कोणी कुणाला कॉल केले, कोणी कॉल करायला सांगितले हे तपासात समोर आले आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी दोषी असणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि लवकरच त्यातील सत्य बाहेर येईल, असेही गोरे म्हणाले.
जयकुमार गोरेंकडून दहशत – रोहित पवार
जयकुमार गोरे हे त्यांना मिळालेल्या पदाचा उपयोग दहशत आणि दडपशाहीसाठी करत आहेत. त्यांच्यावर झालेले आरोप आणि सत्य परिस्थिती लोकांना माहीत आहे. त्यांच्या दहशतीला आणि दडपशाहीला जे बळी पडलेले आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. मंत्री असतानाही राज्याच्या प्रश्नात लक्ष न घालता जिल्ह्यात बसून दहशत निर्माण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला.

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कर्तृत्ववान उद्योजक आहेत. विशेषतः गारमेंट उद्योजकांची संख्या मोठी आहे. या उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आगामी काळात दुबईमध्ये सुसज्ज व्यासपीठ तयार करण्याचा मानस भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी बोलून दाखविला आहे.
सोलापूर सोशल फाउंडेशन, उद्योग फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक उद्योजकांचे शिष्टमंडळ दुबई दौऱ्यावर गेले होते. या शिष्टमंडळाने सोलापुरात परत आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी बोलताना आमदार देशमुख यांनी दुबई भेटीचा वृत्तान्त सांगितला.
ते म्हणाले, दुबईस्थित उद्योजकांनी दर्जात्मक उत्पादन देण्याच्या अटीवर सोलापूरच्या उद्योग वाढीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे. मुंबईमध्ये पुरेशी जागा घेऊन तेथे सोलापूरच्या दर्जेदार उत्पादनांची साठवणूक करून आंतरराष्ट्रीय व्यापार विकसित करण्यास सहकार्याचा हात पुढे केला आहे.सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी दुबई भेटीची सविस्तर माहिती दिली. सोलापूरच्या उद्योजकांनी दुबईमध्ये सुरक्षा व्यवसाय प्रमुख संतोष कोरट यांच्याशी सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने सोलापूरचे आयटी हब कसे निर्माण करता येईल, यावर चर्चा केली.
जुई केमकर आणि जितेन दमानिया यांच्याशी अन्नउद्योग क्षेत्रात सोलापूरच्या कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी संवाद साधण्यात आला. सोलापूरसाठी दुबईमध्ये डिझाईन ऑटोमेशन क्षेत्रात तरुणांना संधी असल्याचे दुबईस्थित सागर कुलकर्णी यांनी सांगितले. सोलापूरच्या शिष्टमंडळाने दुबईत ३२ उद्योजकांची भेट घेऊन संबंधित उद्योगाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा केली. या चर्चेतून सोलापूर दुबई बिझनेस फोरम तयार करण्याचे ठरले, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सोलापूर : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बार्शी येथील एसटी बस स्थानकावर उजेडात आली.
या संदर्भात मनीषा सूर्यकांत गाजरे (वय ४०, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, बार्शी एसटी बस स्थानकावर सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा प्रकार सकाळी उजेडात आला. मनीषा गाजरे यांचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील आहे. गावात काही दिवस मुक्काम करून त्या सकाळी धाराशिव-ठाणे एसटी बसमध्ये बसून नेरूळकडे परत निघाल्या होत्या.
धाराशिवनंतर बार्शीमध्ये एसटी बस आली असता मनीषा गाजरे यांना आपल्या जवळील दहा तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी गायब झाल्याचे लक्षात आले. गायब झालेल्या पिशवीमध्ये पाच तोळे सोन्याच्या बिलवरी बांगड्या आणि पाच तोळे पाटल्या होत्या.
एसटी बसमधील गर्दीत अज्ञात चोरट्यांनी लक्ष विचलित करून गाजरे यांची सोन्याचे दागिने असलेली पिशवी अलगदपणे चोरून नेल्याचे दिसून आले. या गुन्ह्याचा तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.

अहिल्यानगरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ केंद्र उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी भाजपच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीवर नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली. १०० फूट लांबीचा भारतीय ध्वज हे रॅलीचे आकर्षण होते.
शहरातील चौपाटी कारंजा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीस सुरुवात करण्यात आली. चितळे रस्ता, नेताजी सुभाष चौक, तेलीखुंट, इमारत कंपनीतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कापड बाजारात रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये तरुणांनी भारतीय सैन्याच्या अभिनंदनचे फलक हाती घेतले होते.
रॅलीत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या तसेच पाकिस्तानचा निषेध केला जात होता. नागरिकही रॅलीमध्ये तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. देश व सैन्याबद्दल असलेली भावना आणखी दृढ करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले.
या वेळी निवृत्त लष्करी अधिकारी मेजर विनोदसिंह परदेशी, निवृत्त नौदल अधिकारी अनिल जोशी, राहुल जाधव, संजय पाटेकर, मेजर निळकंठ वलारे, मेजर गोरख पालवे, मेजर शिवाजी पालवे, शिवसेना शिंदे गटाचे संभाजी कदम, अशोक चौधरी, डॉ. दामोदर कळमकर, संजय म्हस्के, जालिंदर वाळके, शरद कामोठे, प्रसाद पुराणिक, राजेंद्र काळे, हिंदुराष्ट्र सेनेचे संजय आडोळे, वसंत लोढा, सचिन पालखी, सुनील रामदासीर महेंद्र गंधे, दामोदर बठेजा, धनंजय जाधव, बाबासाहेब वाकळे, सचिन जाधव, अनिल बोरुडे, अनिल शिंदे, सुरेखा कदम, शीला शिंदे, गीतांजली काळे, प्रिया दानवे, सुरेखा विद्ये यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते.